“आज काल तुम्हाला दुकानामध्ये कुठलीही गोष्ट मिळू शकते. मात्र आमच्या आदिवासी जमातींच्या विधींमध्ये वापरली जाणारी मातीची भांडी फक्त आम्ही कोटा जमातीच्या स्त्रियाच घडवतो,” सुगी राधाकृष्णन सांगतात. वय ६३, थिरुचीगडी, त्यांच्या भाषेत थ्रिचकाड या आदिवासी पाड्यावरच्या कुंभार स्त्रियांच्या दीर्घ परंपरेतल्या त्या एक. कोटा लोकांची गाव पाड्यांची स्वतःची अशी वेगळी नावं आहेत. हा पाडा तमिळ नाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या उदगमंडलम तालुक्यात येतो, कोटागिरी शहराच्या जवळ.
घरी असताना सुगी त्यांच्या कोटा जमातीच्या खास वेषात दिसतात – एक नेसूसारखा जाड पांधरा कपडा, याला कोटा भाषेत दुपिट्ट म्हणतात आणि वरती एक सफेद शाल – वराद. कोटागिरी किंवा जवळपासच्या इतर भागात काम करत असताना थिरुचीगडीचे स्त्री पुरुष त्यांच्या पारंपरिक वेषात दिसत नाहीत. सुगींनी तेल लावून केसांचा आडवा अंबाडा घातलाय, ही इथल्या कोटा स्त्रियांची खास केशभूषा. त्यांच्या घराजवळच असणाऱ्या कुंभारकामाच्या छोट्या खोलीत त्या आम्हाला घेऊन जातात.
“मातीची भांडी कशी बनवायची हे काही मला कुणी बसवून शिकवलेलं नाही. मी माझ्या आजीचे हात पहायची, ते कसे फिरतात तेही बघायची. एखाद्या लांबुळक्या घड्याला गोल आकार देण्यासाठी तास न् तास त्याला बाहेरून लाकडी फळीने गुळगुळीत करावं लागतं आणि त्याच वेळी आतून एखाद्या गोट्याने घासावं लागतं. त्यामुळे छिद्रंही कमी होतात. पण लाकडी फळी आणि आतला दगड एकाच वेळी फिरवावे लागतात. नाही तर मग त्याच्यावर चिरा पडू शकतात. अशा भांड्यातला भात अतिशय चविष्ट बनतो. थोड्या अरुंद तोंडाचं भांडं सांबारसाठी वापरतो आम्ही. त्याची चवही काही औरच. एकदा चाखून बघाच.”









