२२ वर्षांचा गुरप्रीत मेला त्याच्या आदल्या दिवसापर्यंत तो त्याच्या गावात नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करत होता. पंजाबच्या वायव्येला असलेल्या आपल्या गावी त्यांची पाच एकर शेती आहे. त्याच्या वडलांना, जगतार सिंग कटारियांना आपल्या मुलाचं शेवटचं भाषण अजूनही लक्षात आहे. पंधरा एक शेतकरी गोळा झाले होते आणि त्याचं भाषण अतिशय उत्कंठेने ऐकत होते. दिल्लीच्या वेशीवर इतिहास घडत असल्याचं आणि आपण त्यात हातभार लावला पाहिजे असं तो त्यांना सांगत होता. २०२० साली डिसेंबर महिन्यातल्या त्या भाषणानंतर तिथले सगळे बाह्या सावरून दिल्लीला कूच करायला सज्ज झाले होते.
गेल्या वर्षी १४ डिसेंबरला ते पंजाबच्या शहीद भगत सिंग नगर जिल्ह्याच्या बालाचुर तालुक्यातल्या माकोवाल या आपल्या गावाहून निघाले. पण साधारणपणे ३०० किलोमीटरवर हरयाणाच्या अंबाला जिल्ह्यातल्या मोहराजवळ त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका अवजड वाहनाची धडक बसली. “खूप जोराची धडक बसली. गुरप्रीत गेला,” जगतार सिंग सांगतात. गुरप्रीत पतियाळाच्या मोदी कॉलेजमध्ये बीए करत होता. “आंदोलनासाठी त्याने काय द्यावं? स्वतःचा जीव.”
२०२० साली सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे सदनात मांडले व पारित केले. या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. हे कायदे लागू झाले तर किमान हमीभावाची सगळी यंत्रणा कोलमडून पडेल आणि बड्या कंपन्या पिकांचे भाव ठरवू लागतील तसंच बाजारातही त्यांना गैरप्रकारे लाभ मिळेल अशी देशभरातल्या शेतकऱ्यांना खात्री वाटली. त्यानंतरच्या आंदोलनात देशभरातले – खास करुन पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातले शेतकरी २६ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या वेशीवर जमा झाले. दिल्लीत प्रवेश नाकारल्याने त्यांनी दिल्ली-हरयाणा सीमेवर सिंघु आणि टिक्री इथे आणि दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर इथे तळ ठोकला.
आंदोलनाला जवळ जवळ एक वर्ष पूर्ण होत आलं आणि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. कृषी कायदे रद्द करणे विधेयक, २०२१ २९ नोव्हेंबर रोजी संसदेत पारित करण्यात आलं. त्यानंतर शेतकरी संघटनांच्या बहुतेक मागण्या शासनाने मान्य केल्यानंतर ११ डिसेंबर २०२१ रोजी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली.
ज्यांचे जिवलग या वर्षभर चाललेल्या आंदोलनात मरण पावले अशा काही कुटुंबाशी मी प्रत्यक्ष आणि फोनवर संवाद साधला. या आंदोलकांची कुटुंबं उद्ध्वस्त झालीयेत, दुःखी आहेत तशीच संतप्तही. ध्येयासाठी शहीद झालेल्या आपल्या या आप्तांच्या आठवणी त्यांच्या मनात धगधगत आहेत.
“आम्ही शेतकऱ्यांच्या विजयाचा आनंद जरुर साजरा करी. पण पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तरी आम्ही काही त्यामुळे खूश झालो नाही,” जगतार सिंग कटारिया म्हणतात. “या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांचा आणि मृतांचाही केवळ अपमान केला आहे.”

















