राजिंदर यांना फक्त दोन पानं आणि एक कळी हवीये. डोंगरउतारावर एका रांगेत लावलेल्या चहाच्या रोपांवरून त्यांची बोटं सफाईने फिरतात. त्यांची पत्नी सुमना देवी शेजारीच एक करंडी घेऊन उभ्या आहेत. उंचच उंच ओहीच्या झाडांखाली चहाची रोपं आणि सोबत उभी माणसंसुद्धा अगदी इटकुशी दिसू लागतात. हिमालयाच्या धौलाधार पर्वतरांगांमधलं हे दृश्य.
चहा तोडणीचा हंगाम सुरू झालाय पण राजिंदर सिंग यांना मात्र हवी तशी पानं आणि कळ्या मिळतच नाहीयेत. कांग्रा जिल्ह्याच्या तांडा गावातल्या या मळ्यात ते रोज येतात. सोबत त्यांची पत्नी सुमना किंवा २० वर्षांचा मुलगा आर्यन असतो. एप्रिल आणि मे म्हणजे चहा खुडण्याचा हंगाम. पण त्यांना हवी तितकी पानंच मिळत नाहीयेत.
“उष्मा तुम्हाला जाणवतोय. पाऊस कुठे गेलाय तेच माहित नाही!” हिमाचल प्रदेशातल्या पालमपूर तालुक्यातल्या आपल्या चहाची पानं सुकून चाललीयेत याची चिंता त्यांच्या आवाजात जाणवत राहते.
गेली दोन वर्षं या भागात पाऊस अगदीच तुरळक होता आणि त्यामुळेच राजिंदर सिंग यांना वाटत असलेली चिंता समजून येते. २०१६ साली आलेला एफएओ इंटरगव्हर्नमेंटल रिपोर्ट म्हणतो, “लहरी पावसामुळे चहाच्या मळ्यांचं मोठं नुकसान होतं.” या अहवालात वातावरण बदलाचे चहावर काय काय परिणाम होतात त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. या झाडांना फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पावसाची गरज असते. कारण यानंतर एप्रिल महिन्यात जो माल हाती येतो त्याला सर्वात जास्त भाव मिळतो – किलोमागे ८०० रुपये किंवा जास्तीत जास्त म्हणजे १२०० रुपये.
२०२२ हे वर्ष राजिंदर सिंग यांच्यासाठी खरं तर खास असणार होतं. त्यांनी आणखी दोन हेक्टर जमीन खंडाने करायला घेतली होती. “मला वाटत होतं माझी कमाई आता वाढणार.” एकूण तीन हेक्टर मळ्यातून हंगामाच्या शेवटी ४,००० किलो चहा येईल असा त्यांचा अंदाज होता. २०,००० रुपये जमिनीचं भाडं गेलं. एकूण उत्पादन खर्च काढला तर त्यातला ७० टक्के खर्च मजुरीवरच होतो. “एखाद्या मळ्याची निगा राखायची तर मजुरी भरपूर लागते,” ते म्हणतात. चहाच्या पानांवर प्रक्रिया करण्यासाठी खर्च येतो तो तर वेगळाच.


















