मोहम्मद शमीमच्या कुटंबात तिघं जण आहेत पण रेल्वेच्या तिकिट एजंटला त्याची एकच विनंती आहे की एक तिकिट कन्फर्म झालं तरी बास. “बस मेरी बीवी को सीट मिल जाये,” शमीम म्हणतो. उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी जाण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. “मी काही तरी करून गाडीत शिरेन. मी काय कसाही प्रवास करू शकतो. इथे गोष्टी अजून वाईट व्हायच्या आता आम्हाला निघायला पाहिजे,” शमीम म्हणतो.
“पक्कं तिकिट मिळण्यासाठी प्रत्येक तिकिटामागे एजंट १८०० रुपये मागतोय. मी त्याला १४०० पर्यंत खाली आणलंय,” तो सांगतो. “एक जरी तिकिट मिळालं तरी आम्ही गाडी पकडू आणि मग जो काही दंड आहे तो भरता येईल.” मुंबई ते उत्तर प्रदेश प्रवासाचं सगळ्यात स्वस्त तिकिट एरवी ३८०-५०० रुपयांत मिळतं. उत्तर प्रदेशच्या फैझाबाद जिल्ह्यातल्या मसोधा तालुक्यातलं अब्बू सराई हे शमीमचं गाव. त्याचे दोन भाऊ तिथे जमीनदारांकडे शेतमजुरी करतात. तेही फक्त शेतीच्या हंगामात.
२२ वर्षीय शमीमप्रमाणेच मुंबईतल्या हजारो-लाखो स्थलांतरित कामगारांसाठी गेल्या १० महिन्यांच्या काळातला हा असा दुसरा प्रवास आहे. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्बंध लागू केले आणि त्यानंतर कारखाने बंद झाले, लोकांना कामावरून कमी करण्यात आलं आणि बांधकामं थांबली.
मुंबईतल्या सगळ्याच मोठ्या रेल्वे स्थानकांवर, बांद्रा टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर ११-१२ एप्रिलपासून मोठी गर्दी उसळली आहे. या दोन्ही स्थानकांवरून खास करून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. १४ एप्रिल रोजी निर्बंध लागू होण्याआधी स्थलांतरित कामगारांची शहर सोडून जाण्याची लगबग सुरू झाली होती. आणखी जास्त निर्बंध लागतील या भीतीने अनेक जण परत चालले आहेत.
शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या राज्य शासनाने या निर्बंधांना लॉकडाउन म्हटलेलं नसलं तरी शमीमला शब्दांनी फारसा फरक पडत नाही. “आमच्यासाठी पुन्हा एकदा हाताचं काम गेलंय. आणि त्याचा फटका आधीच बसलाय.”






