01-008-PS- Kalliasseri-In Search of Sumukan.jpg

सुमुखनचे वंशज आजही अळ्ळिकोडेत राहतात


कल्लियसेरीची लढाई खरं तर कधी थांबलेलीच नाहीये. १९४७ नंतरही नाही. केरळच्या उत्तर मलबारमधल्या या गावाने अनेक आघाड्यांवर लढे दिले आहेत. स्वातंत्र्य चळवळ भरात असताना, त्यांनी इंग्रजांना आव्हान दिलं. शेतकरी चळवळ जोरात चालू असताना त्यांनी जनमींना (सरंजामी जमीनदार) शिंगावर घेतलं. आणि डाव्या प्रतिरोधाच्या केंद्रस्थानी असताना ते जातीव्यवस्थेशी भिडले.

“स्वातंत्र्याचा लढा १९४७ मध्ये कायमचा संपला असं आपण कसं म्हणणार?” या सगळ्या लढ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले के पी आर रायरप्पन आपल्याला सवाल करतात. “जमीन सुधारणेचा लढा बाकी राहिलाच की.” आज ८६ व्या वर्षीही त्यांना अनेक लढाया साद घालतायत. आणि त्यांना त्या सगळ्यात भाग घ्यायचाय. ८३ व्या वर्षी कासारगोड ते तिरुअनंतपुरम हे ५०० किमी अंतर चालत ते देशाच्या स्वावलंबनासाठी निघालेल्या एका मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

कल्लियसेरीमध्ये ज्यामुळे बदलाचं वारं वाहू लागलं त्या दोन घटना त्यांच्या मनात पक्क्या घर करून आहेत. एक, १९२० मधली गांधींची मंगळूर भेट. अगदी शाळकरी पोरांपासून सगळे त्यांचं बोलणं ऐकायला तिथे पोचले होते. “तेव्हा आम्ही सगळे काँग्रेससोबत होतो,” रायरप्पन सांगतात.

दुसरी घटना म्हणजे, राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सुमुखन या छोट्या दलित मुलाला झालेली मारहाण. शाळेत यायचं धाडसच कसं केलं यावरून वरच्या जातीच्या काहींनी त्याला आणि त्याच्या भावाला बेदम मारलं होतं.

जातीय अत्याचार आणि संसाधनांची मालकी यांचा फार जवळचा संबंध होता. मुख्यतः जमिनीच्या मालकीचा. मलबार जिल्ह्यातल्या चिरक्कल तालुक्यातल्या जनमींच्या दहशतीचा बालेकिल्ला म्हणजे कल्लियसेरी. १९२८ मध्ये जवळ जवळ ७०% जमीन वरच्या जातीच्या नायरांच्या ताब्यात होती. थिय्या आणि इतर मागास जाती एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के असूनही त्यांच्या मालकीची जमीन केवळ ६.५५ टक्के. असं असतानाही इथे जमीन सुधारणेची चळवळ – जी अगदी १९६० पर्यंत चालू राहिली - यशस्वी झाली.

आजमितीला, थिय्या, इतर मागास जाती आणि दलितांकडे मिळून ६० टक्क्यांहून अधिक जमीन आहे.

“आम्ही आधी गुलामच होतो,” ६३ वर्षांचे कुन्हंबू सांगतात. त्यांचे वडील थिय्या शेतकरी होते. “आम्हाला अंगात सदरा घालायची देखील परवानगी नव्हती. काखेत फक्त एक पंचा असे. पायात वहाणाही नाहीत. आणि धोतरही फक्त गुडघ्यांपर्यंत, आंघोळीच्या पंच्यासारखं.” काही भागांमध्ये खालच्या जातीच्या स्त्रियांना चोळी/ब्लाउज घालण्याची परवानगी नव्हती. “आम्हाला काही रस्त्यांनी जायला मनाई होती. वरच्या जातीच्या पुरुषांपासून आम्हाला ठराविक अंतर दूर रहावं लागे. तेही जातीच्या उतरंडीतल्या त्याच्या स्थानाप्रमाणे ठरत असे.”

खालच्या जातींना शाळेपासून लांब ठेवणं हा या सगळ्याचा एक भाग होता. कोणत्याही संसाधनांपासून त्यांना तोडून टाकणे हा खरा उद्देश. म्हणूनच त्यांना कसलाही मान न देणं या सगळ्यात बसत होतं. जनमींची गरिबांवरची दहशत सवयीची झाली होती.

सुमुखनला झालेली मारहाण मात्र एक निर्णायक घटना ठरली.

रायरप्पन सांगतात, “सगळे राष्ट्रवादी नेते इथे मलबारमध्ये आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केलप्पन काही दिवस राहिले. सर्वांनी जातीपातीच्या विरोधात आवाज उठवला. सी एफ अँड्र्यूजदेखील आले. इंग्लंडच्या संसदेत हा प्रश्न उठवण्यात त्यांना यश आलं. पुढे कल्लियसेरी दलित शिक्षणाचं मुख्य केंद्र बनलं.”

पण त्याआधी मात्र फार मोठा संघर्ष करावा लागला. इथून जवळच असणाऱ्या अजानूरमध्ये तीस आणि चाळीसच्या दशकात तीन वेळा शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. आधी जनमींकडून, नंतर पोलिसांकडून आणि परत एकदा जनमींकडून. ही शाळा अनुसूचित जातींच्या मुलांना प्रवेश देत होती. तसंच शाळेने राष्ट्रवादी आणि साम्यवादी नेत्यांना आश्रय दिल्याचा संशय होता.

ही शंका साधार होती. १९३० मध्ये या भागात डाव्या चळवळींनी विशिष्ट प्रकारे आपली मुळं रोवायला सुरूवात केली होती. एक निवृत्त शिक्षक, अग्नी शमन नंबुदिरी माहिती देतात. आता जवळच करिवेल्लुरमध्ये पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ते असलेले नंबुदिरी सांगतात, “एखाद्या गावात आलो की आम्ही नेहमी एक रात्रशाळा, एक वाचनालय आणि शेतकऱ्यांची संघटना सुरू करत असू. उत्तर मलबारमध्ये डावे अशाच पद्धतीने पाय रोवत गेले.” रायरप्पन भर घालतात, “कल्लियसेरीमध्ये जे घडलं ते घडण्यामागे आणि त्यात यश मिळण्यामागे या गोष्टीही कारणीभूत आहेत.”

३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत उत्तर मलबारमध्ये काँग्रेसवर डाव्यांनी ताबा मिळवला होता. १९३९ पर्यंत रायरप्पन आणि त्यांचे दोस्त कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून पुढे आले. ज्या भागात दलितांना शिक्षण नाकारणं हे एक प्रमुख शस्त्र होतं तिथे शिक्षकांच्या संघटनेने फार मोठी राजकीय भूमिका निभावल्याचं दिसून येतं.

“म्हणूनच तुम्हाला रात्रशाळा-वाचनालय आणि शेतकऱ्यांची संघटना ही कार्यपद्धत दिसते,” पी यशोदा सांगतात. “कारण शेवटी आम्ही सगळे शिक्षकच ना!” आज ८१ व्या वर्षीदेखील त्यांच्यामधली ६० वर्षांपूर्वीची संघटनेच्या नेत्या म्हणून असणारी धमक आणि आग कमी झालेली नाही. १५ व्या वर्षी त्या त्यांच्या तालुक्यातल्या एकमेव स्त्री शिक्षक तर आणि मलबारमधल्या सगळ्यात तरुण शिक्षिका होत्या. त्यांच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी असण्याचा मानही त्यांनाच जातो.

“माझं राजकीय शिक्षण कधी सुरू झालं? माझ्या शाळेतल्या दोन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना आम्हा सगळ्यांसमोर झोडपलं तेव्हा.” आणि त्यांचा गुन्हा? “त्यांनी महात्मा गांधी की जयच्या घोषणा दिल्या. प्रत्येकाला ३६ छड्या मारण्यात आल्या. नियमाप्रमाणे फक्त १२ छड्या मारायला परवानगी होती. म्हणून त्यांना पुढचे तीन दिवस रोज १२ छड्या खाव्या लागल्या. आणखी एका घटनेत एका कुटुंबाला त्यांच्या घरातून हाकलून देताना मी पाहिलं होतं. त्यांचं दुःख कायम माझ्या मनात घर करून राहिलं.”

“अर्थात गेल्या ५० वर्षांत आपण खूप मोठी मजल मारलीये,” यशोदा टीचर सांगतात. त्यांना सगळे याच नावाने ओळखतात. “स्वातंत्र्याने खरंच फार मोठा बदल घडवून आणला.”

जिथे शिक्षण हा मूठभरांचाच विशेषाधिकार होता, त्या कल्लियसेरीने नंतर बरीच प्रगती केली. इथे साक्षरता जवळ जवळ १००% आहे, स्त्रिया आणि पुरुष, दोघांसाठी. गावातलं प्रत्येक मूल शाळेत जातंय.

“२१००० लोकसंख्येच्या या गावात १६ ग्रंथालयं आहेत,” कृष्णन पिल्लै वाचनालयाचे ग्रंथपाल अभिमानाने सांगतात. सगळी १६ ग्रंथालय-वाचनालयं संध्याकाळी गजबजलेली असतात. बहुतेक पुस्तकं मल्याळममध्ये असली तरी काही इंग्लिशमधलीही आहेत. हॅन सुइयान, चार्ल्स डिकन्स, टॉलस्टॉय, लेनिन, मारलो, इत्यादी. अशी वैविध्यपूर्ण अभिरुची वेगवेगळ्या मार्गांने व्यक्त होते. भारतातल्या या गावात घरांवर तुम्हाला शांग्री ला सारखी नावंही दिसतात ती यामुळे.

कल्लियसेरी हे असं एक गाव आहे जिथे एखादा आठवीत शाळा सोडलेला मुलगाही तुमच्याशी पश्चिम आशियाबाबत अराफत कसे आणि का चुकलेत याबद्दल वाद घालू शकतो. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीबाबत स्वतःचं असं मत आहे आणि ते मांडायला कुणीही कचरत नाही.

“स्वातंत्र्य आणि शिक्षण याचसोबत जमीन सुधारणेसाठी उभ्या राहिलेल्या संघटित चळवळीमुळे सगळं चित्रच पालटलं,” रायरप्पन सांगतात. थिय्या शेतकरी के कुन्हंबूंनी याची फळं चाखली आहेत. ते याच्याशी सहमत आहेत. “जमीन सुधारामुळे इथली जातीची उतरंड ढासळली. आम्हाला एक नवी पत मिळाली. पूर्वी आम्हाला केवळ जनमींच्या कृपेनेच जमिनीचा एखादा तुकडा मिळत असे. पण कसणाऱ्याला जमीन धोरणामुळे सगळंच बदललं. आता आम्ही स्वतःला जमीन मालकांच्या बरोबरीचे मानू शकत होतो.” महत्त्वाचं म्हणजे जमीन सुधारणेमुळे गरिबांची अन्न, शिक्षण आणि आरोग्यापर्यंतची पोहोच लक्षणीय पद्धतीने वाढलेली दिसते.

“१९४७ ते ५७ आणि त्यानंतरही आम्ही जमीन सुधारणेसाठी लढत राहिलो. आमच्या लक्षात आलं की काँग्रेस वरच्या जातींच्या आणि जमीनदारांच्या बाजूने.” आणि म्हणून कल्लियसरी ही अशी भूमी आहे जिथे “८५ टक्क्यांहून अधिक जण आज डाव्यांसोबत आहेत.”

सुमुखनची विधवा पत्नी पन्नइयन जानकीच्या मते “गेल्या ५०-६० वर्षांत खूप मोठे बदल झालेत. माझ्या पोटच्या मुलांना शाळेत घालणं माझ्यासाठी मुश्किल होतं. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात खरंच खूप बदल झालेत.”

सुमुखन १६ वर्षांपूर्वी मेला. त्याचं कुटुंब अजूनही तिथेच अळ्ळिकोडेमध्ये राहतं. सुमुखनची मुलगी दूरसंचार केंद्रात पर्यवेक्षक म्हणून काम करते. त्याचे जावई, कुन्हीरमण कालिकतमध्ये पोस्ट ऑफिसमधून अधीक्षक म्हणून निवृत्त झाले. ते म्हणतात, “सामाजिक स्तरावर आता भेदभाव होत नाही, निदान इथे तरी. आमच्या घरात दोन एमबीबीएस, दोन एलएलबी आणि एक जण बी एससी आहे...”


02-007-PS- Kalliasseri-In Search of Sumukan.jpg

के पी आर रायरप्पन (सर्वात उजवीकडे) सुमुखनच्या काही नातवंडांसोबत. या घरात दोन एमबीबीएस, दोन एलएलबी आणि एक जण बीएससी आहे...


ही आहेत सुमुखनची – कधीही शाळेत न जाऊ शकलेल्या एका मुलाची - नातवंडं.


पूर्वप्रसिद्धी – २८ ऑगस्ट १९९७, द टाइम्स ऑफ इंडिया.

ਪੀ ਸਾਈਨਾਥ People’s Archive of Rural India ਦੇ ਮੋਢੀ-ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ ਕਈ ਦਹਾਕਿਆਂ ਤੋਂ ਦਿਹਾਤੀ ਭਾਰਤ ਨੂੰ ਪਾਠਕਾਂ ਦੇ ਰੂ-ਬ-ਰੂ ਕਰਵਾ ਰਹੇ ਹਨ। Everybody Loves a Good Drought ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਕਿਤਾਬ ਹੈ। ਅਮਰਤਿਆ ਸੇਨ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਲ (famine) ਅਤੇ ਭੁੱਖਮਰੀ (hunger) ਬਾਰੇ ਸੰਸਾਰ ਦੇ ਮਹਾਂ ਮਾਹਿਰਾਂ ਵਿਚ ਸ਼ੁਮਾਰ ਕੀਤਾ ਹੈ।

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale