एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रात लॉकडाउनसारखे निर्बंध लागणार हे जवळपास निश्चित झालं आणि पुन्हा एकदा मुंबई सोडून परत जायचा निर्णय गोपाल गुप्तांनी घेतला.

असं घडलं विपरितच. त्यांचे कुटुंबीय उत्तर प्रदेशातल्या कुसौरा तालुक सहतवार या गावी जाण्यासाठी रेल्वेत बसले. हातात गुप्तांच्या अस्थींचा कलश होता.

“माझ्या वडलांच्या मृत्यूला फक्त करोना जबाबदार असं काही मी म्हणणार नाही... ते जगले जरी असते ना, त्यांचा एक पाय काढावा लागला होता,” गोपाल यांची मुलगी, २१ वर्षीय ज्योती सांगते.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोपाल यांनी थोडासा सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवायला लागला होता. पालवणीमधल्या वस्तीतल्या एका दवाखान्यातून त्यांनी काही औषधं आणली आणि त्यांना बरं वाटायला लागलं. इथेच त्यांचं दोन खोल्यांचं घर आहे.

उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातल्या बांसडीह तालुक्यातल्या आपल्या गावाहून ते जानेवारी महिन्यातच मुंबईला परतले होते. कामाची घडी जराशी बसायला लागली आणि कोविडची दुसरी लाट पसरायला लागली. “माझ्या वडलांना परत वाट पाहत बसण्याची जोखीम घ्यायची नव्हती,” ज्योती सांगते. म्हणून मग या कुटुंबाने गावी परतण्याची तयारी सुरू केली.

पण १० मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास, गोपाल यांना धाप लागायला लागली. जवळच्याच दवाखान्यात नेलं आणि त्यांना कोविडची लागण झाल्याचं निदान झालं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका मैदानात नेलं. इथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलं होतं. पण त्यांची तब्येत बिघडायला लागली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विनंती केली की चांगल्या सुविधा असणाऱ्या रुग्णालयात त्यांना हलवा. त्या दिवशी दुपारी गोपाल यांना कल्याणमधल्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं.

“आम्हाला खरंच समजत नव्हतं, कुठे जायचं. आम्हाला विचार करायला फारसा वेळ नव्हता. माझ्या वडलांची तब्येत बिघडत होती आणि भावाची पण,” ज्योती सांगते. तिचा भाऊ, विवेक, वय २६ याला देखील कोविडची लागण झाली होती आणि त्याला भिवंडीजवळच्या एका केंद्रामध्ये १२ दिवसांसाठी क्वारंटाइन व्हायला सांगितलं होतं.

Jyoti (with Gopal and Shashikala): 'We had little time to think and were scared with my father's condition getting bad'
PHOTO • Courtesy: Gupta family
Jyoti (with Gopal and Shashikala): 'We had little time to think and were scared with my father's condition getting bad'
PHOTO • Courtesy: Gupta family

ज्योती (गोपाल आणि शशिकलांसोबत): ‘आम्हाला विचार करायला फारसा वेळच नव्हता, माझ्या वडलांची तब्येत बिघडत चालली होती’

खाजगी दवाखान्यात पोचल्यावर त्यांना आधी ५०,००० रुपये कॅश डिपॉझिट भरायला सांगण्यात आलं. गोपाल यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली महागडी औषधं आणण्यासाठी बाकीच्यांनी हॉस्पिटलमधल्या दुकानात धाव घेतली. “आमच्याकडे जी काही शिल्लक होती, ती खर्चायला सुरुवात झाली. रोज नवीन बिल यायचं आणि सगळंच बिनसायला लागलं,” गोपाल यांच्या पत्नी शशिकला सांगतात. त्यादेखील घरच्या भाजी विक्रीच्या धंद्यात हातभार लावायच्या. मंडईतून भाजी विकत आणण्याचं काम करायच्या.

गोपाल आणि त्यांचा मुलगा विवेक दोघं भाजी विकायचे. गेल्या वर्षी टाळेबंदी लागली त्या आधी त्यांची दिवसाला ३००-७०० रुपयांपर्यंत कमाई व्हायची. सहा जणांच्या कुटुंबाचं यात भागत होतं. हे कुटुंब तेली समाजाचं (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) आहे.

गोपाल आणि शशिकलांचा धाकटा मुलगा, १९ वर्षीय दीपक १२ वीत प्रवेश घेणार होता. पण २०२० च्या टाळेबंदीमध्ये त्याला शिक्षण थांबवावं लागलं. ज्योतीने सामाजिक संस्था आणि मित्रमंडळींच्या मदतीने काही तरी करून बी कॉमच्या तिसऱ्या वर्षाची फी भरली आहे आणि तिचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.

तिच्या बहिणीला, २२ वर्षीय खुशबूला अशाच आर्थिक संकटामुळे नववीनंतर शाळा सोडावी लागली होती. “माझ्या वडलांची तशी इच्छा नव्हती, पण दुसरा काही इलाजच नव्हता...” ज्योती सांगते. तिच्या दुसऱ्या दोघी बहिणींचं लग्न झालं आहे आणि त्या उत्तर प्रदेशात असतात.

गेल्या वर्षी, जून महिन्यात ते गावी परत गेले आणि आपल्या आजोबांच्या छोट्याशा घरी त्यांनी मुक्काम केला. नोव्हेंबर महिन्यात ज्योतीची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा होती म्हणून ती विवेकसोबत मुंबईला परत आली. त्याने भाजी विकायला सुरुवात केली आणि दिवसाची २००-३०० रुपये कमाई व्हायला लागली. ज्योतीला कल्याणच्या एका हॉस्पिटलमध्ये तात्पुरती नोकरी मिळाली. घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओचे थेंब द्यायचे आणि कोविड-१९ ची शक्यता तपासण्यासाठी तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजायची. तिने तीन महिने हे काम केलं आणि त्याचे तिला एकूण २,५०० रुपये मिळाले.

जानेवारी २०२१ मध्ये गोपाल आणि बाकीची मंडळी मुंबईला परत आली. गावात काहीही काम नव्हतं आणि जवळची पुंजी संपत चालली होती. गेल्या वर्षी त्यांना एका संस्थेकडून धान्याची मदत झाली होती. पण घरभाडं ३००० रुपये आणि विजबिल होतंच. त्यामुळे शिलकीला टाकलेले पैसे त्यासाठी वापरले होते.

With their savings draining out even last year, Jyoti found a temporary job going door-to-door giving polio drops to children and doing Covid checks
PHOTO • Courtesy: Gupta family
With their savings draining out even last year, Jyoti found a temporary job going door-to-door giving polio drops to children and doing Covid checks
PHOTO • Courtesy: Gupta family

गेल्या वर्षी शिलकीला असलेले पैसे संपत चालल्यावर ज्योतीने घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओचे थेंब देणं आणि कोविडसाठी तपासणी करण्याचं एक तात्पुरतं काम घेतलं

आणि मग मार्च महिन्यात गोपाल १० दिवस खाजगी दवाखान्यात दाखल होते आणि बिलाचा आकडा वाढतच चालला होता – रु. २,२१,८५० रुपये हॉस्पिटलचं बिल, शिवाय रु. १,५८,००० औषधांचा खर्च (ही सगळी बिलं रिपोर्टरने स्वतः पाहिली आहेत.) सीटी-स्कॅन, प्रयोगशाळेतल्या तपासण्या, अँब्युलन्सचा खर्च – सगळा मिळून रु. ९०,००० इतका झाला होता.

भाजीविक्रेत्यांच्या या कुटुंबाने गेल्या वर्षी टाळेबंदीचा फटका सहन केला होता आणि आता गोपाल यांच्या उपचारावर त्यांना तब्बल ५ लाख रुपये खर्च करावे लागले होते.

मे २०२० मध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी असं जाहीर केलं होतं की कोविड-१९ च्या सर्व रुग्णांवर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातील याची गुप्ता कुटुंबियांना कल्पना नव्हती. कल्याणमध्ये या योजनेअंतर्गत चार खाजगी रुग्णालयं (आणि एक सरकारी) समाविष्ट आहेत. “आम्हाला माहित असतं तर आम्ही दुसऱ्या दवाखान्यात कशासाठी गेलो असतो?” ज्योती विचारते. “आमच्यापैकी कुणालाच काहीच माहिती नव्हतं.”

मे २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने कोविड-१९ च्या उपचारांसाठी सर्व खाजगी दवाखान्यात अतिदक्षता खाटेसाठी प्रतिदिन रु. ७,५०० आणि व्हेंटिलेटर बेडसाठी रु. ९,००० अशी मर्यादा देखील घालून दिली होती.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि खर्चावरील सवलतींबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी सांगतातः “या योजनेखाली नावनोंदणी करण्यासाठी काही अटी आहेत. गेल्या वर्षी आम्ही [कल्याण डोंबिवली मनपाच्या अखत्यारीतल्या] सगळ्या खाजगी दवाखान्यांना नोंदणीसाठी आवाहन केलं होतं. पण या योजनेच्या अटींची पूर्तता होऊ शकत नसल्याने त्यातल्या काही हॉस्पिटल्सनी यात भाग घेतला नसावा. निम्न आर्थिक स्तरातल्या कुटुंबांना तसाही खर्चाच्या सवलतीतल्या दरांचा फारसा उपयोग होत नाहीये.”

अशा योजनांविषयी इंडिया एक्स्क्लूजन रिपोर्ट, २०१९-२०२० म्हणतो की “प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसारख्या योजना अस्तित्वात असताना देखील आरोग्यसेवांवर गरिबांना कराव्या लागणाऱ्या खर्चात जाणवण्याइतकी घट झालेली नाही.” सेंटर फॉर इक्विटी स्टडीज, नवी दिल्ली या संस्थेने तयार केलेल्या या अहवालात असंही नमूद केलं आहे की “... सार्वजनिक आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधांचं जाळं उपलब्ध नाही आणि महागडी खाजगी रुग्णालयं मात्र आहेत... अशा परिस्थितीत गरिबांकडे दुसरा काहीच पर्याय राहत नाही.”

सूर्यवंशी सांगतात की कल्याण-डोंबिवली मनपा सार्वजनिक आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि गेल्या वर्षी केवळ दोन सरकारी रुग्णालयं होती, पण आता सहा आहेत. “आम्ही आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड देखील वाढवत आहोत,” ते म्हणतात.

At KEM, Jyoti stayed in the hospital (near the ICU unit in the photo), while her siblings were in Kalyan looking after their mother
PHOTO • Aakanksha

केईएममध्ये ज्योती हॉस्पिटलमध्ये रहायची (छायाचित्रातील आयसीयूशेजारी) तिची भावंडं आईची काळजी घेण्यासाठी कल्याणलाच होती

त्यांनी असंही सांगितलं की कल्याण-डोंबिवली मनपाच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून जादा पैसे घेतले जाऊ नयेत यासाठी त्यांनी ऑडिटर्सची एक टीम देखील तयार केली आहे. पण, ते सांगतात, “पण तरीही त्यात काही त्रुटी आहेत ज्याचा फायदा काही खाजगी रुग्णालयं घेत आहेत. सरकारी दरांमध्ये सगळ्या तपासण्या आणि औषधांचा समावेश नाहीये [उदा. सीटी-स्कॅनसारख्या तपासण्या] आणि काही दवाखाने ही बिलं वाढवत आहेत. आम्ही एका कृती दलाची स्थापना केली आहे. ज्या रुग्णालयांमध्ये बिलं खूप जास्त येतायत, तिथे जाऊन ते बिलातील गोष्टी गरजेच्या होत्या का नाही, याची शहानिशा करत आहेत. आता हे तितकंसं सोपं नाही, आणि प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत शंका घेऊ शकत नाही, पण आम्ही किमान तपासू तरी शकतो.” अशा गोष्टी आढळून आल्या तर संबंधित कुटुंबाला परतावा मिळू शकतो.

मार्च महिन्यात गोपाल यांच्या दवाखान्याचं बिल भरण्याकरिता शशिकलांनी आपली सोन्याची फुलं देखील कल्याणच्या एका दुकानात विकली. त्याचे ९,००० रुपये आले. या कुटुंबाने जमेल त्या मार्गाने पैसे उभे केले – शेजारी-पाजारी, मित्रमंडळी आणि नातेवाईक. “आम्ही रोज कुठलं ना कुठलं तरी बिल भरतच होतो. आमच्या ओळखीतल्या प्रत्येकाला आम्ही संपर्क केला आणि अगदी १००-२०० रुपयांची सुद्धा मदत मागितली,” फोनवर शशिकला सांगतात. त्यांना रडू कोसळतं. “हा सगळा खटाटोप केवळ ते आमच्यात असावेत यासाठी होता. मला तर सारखी भीती वाटत असायची. विवेक अजून [क्वारंटाइन] सेंटरला होता. त्याची तब्येतसुद्धा इतकी बिघडू नये एवढीच माझी इच्छा होती. मला बिलाची काळजी नव्हती. एकदा यातनं सगळे बरे झाले असते की आम्ही आणखी जास्त कष्ट केले असते आणि सगळं परत उभं केलं असतं. पण हळू हळू करत सगळंच ढासळायला लागलं.”

गोपाल गुप्तांना कल्याणच्या खाजगी दवाखान्यात दाखल करून आठ दिवस झाले होते, तेव्हाच १८ मार्च रोजी त्यांच्या घरच्यांना फोन आला, की त्यांना प्रचंड वेदना होतायत. तपासण्यांमध्ये संसर्ग झाल्याचं निदान झालंय. “हे कशामुळे झालं ते काही आम्हाला माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच उपचार करावे लागतील आणि २ लाख रुपये खर्च येईल,” ज्योती सांगते. “तेव्हा मात्र आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे परवडणारं नाहीये. मग त्यांनी आम्हाला सरकारी दवाखान्यात जायला सांगितलं. पण त्या आधी तिथलं पूर्ण बिल भरावं लागणार होतं.”

(मी रुग्णालयाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी याबद्दल बोलायची तयारी दाखवली पण तीही प्रत्यक्ष भेटीत आणि कुटुंबियांपैकी कुणी तरी असताना. गुप्ता कुटुंबीय अजूनही उत्तर प्रदेशात आहेत).

संपूर्ण बिलावर हॉस्पिटलने थोडी फार सवलत दिली पण १९ मे चा संपूर्ण दिवस पैशाची तजवीज करण्यात गेला. नुसती तोंडओळख असणाऱ्यांनाही त्यांना पैसे मागावे लागले. ज्योती आणि तिच्या आईने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तरीही त्यांनी काही तरी करून पैशाची सोय केली. “आम्ही काय दिव्य पार केलं ते फक्त आम्हाला माहित आहे. आमच्या वडलांसाठी पैसे साठावे म्हणून आम्ही किती तरी दिवस जेवणही केलं नाहीये,” ज्योती सांगते.

In the daytime, she 'attended' online classes in the hospital staircase near the ICU, and at night slept on the footpath outside
PHOTO • Aakanksha

दिवसा ती आयसीयू शेजारच्या पायऱ्यांवर बसून ऑनलाइन क्लास ‘अटेंड’ करायची आणि रात्री हॉस्पिटल बाहेरच्या फूटपाथवर निजायची

२० मार्च रोजी संपूर्ण बिलाचा भरणा केल्यानंतर ऑक्सिजनची सुविधा असलेल्या एका खाजगी अँब्युलन्सने गोपाल यांना केईएम या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यासाठी त्यांच्याकडून ९,००० रुपये घेण्यात आले. तिथे तपासण्या केल्यानंतर असं दिसून आलं की गोपाल यांना अजूनही कोविडचा संसर्ग आहे. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. केईएममधल्या डॉक्टरांनी (ज्यांनी स्वतःचं नाव उघड करण्याची इच्छा नाही) मला सांगितलं की “जेव्हा पेशंट आला तेव्हाच त्यांना थ्रॉम्बोसिस [रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी] झाला होता, ज्यामुळे रक्त पुरवठा थांबला होता. यामुळे गँगरीन झालं होतं. संसर्ग पसरत चालला होता आणि त्यांचा डावा पाय काढून टाकावा लागला असता.”

“माझ्या वडलांना गँगरीनसारखं काही तरी झालंय हे मला तेव्हा पहिल्यांदा समजलं,” ज्योती सांगते. “त्यांनी तब्येतीची फारशी कधीच काही तक्रार नव्हती. १० मार्चला आमच्या इथल्या दवाखान्यात ते स्वतः चालत गेले होते. आणि आता काही दिवसांत त्यांचा पाय कापावा लागणार होता. हे ऐकल्यावर आम्ही हादरलोच.”

या सगळ्या काळात शशिकलांना घेरी यायची, भीतीने त्यांचा थरकाप व्हायचा. केईएम हॉस्पिटलमध्ये केवळ एका नातेवाइकास राहण्याची परवानगी होती आणि विवेक देखील क्वारंटाइन सेंटरमधून घरी यायचा होता. त्यामुळे पुढचा एक आठवडा ज्योतीने हॉस्पिटलमध्येच मुक्काम केला आणि तिची बाकी दोन भावंडं आईची काळजी घेण्यासाठी घरी राहिली.

दिवसाचा वेळ ती अतिदक्षता विभागाशेजारी असलेल्या जिन्यामध्ये ऑनलाइन क्लास ‘अटेंड’ करायची कारण अंतिम परीक्षा जवळ येत होती. आणि जेव्हा केव्हा डॉक्टर औषधं आणायला सांगायचे तेव्हा त्यासाठी धावपळ करण्यात जायचा. “इथे त्यांनी आमच्याकडून कसलेच पैसे घेतले नाहीत. कधी तरी लागली तर औषधं आणायला लागायची,” ज्योती सांगते. तीन-चार दिवसांत ८००-१००० रुपयांची औषधं लागत होती. रात्री ज्योती हॉस्पिटलच्या बाहेर फूटपाथवर झोपायची. केईएमच्या कॅन्टीनमध्ये स्वस्तात जेवण मिळायचं आणि हॉस्पिटलचंच शौचायल ती वापरत होती.

“मी घरी गेलेच नाही कारण माझ्या मनात भीती होती. त्यांना माझी गरज लागली आणि मी तिथे नसले तर? माझ्या घरून केईएमला पोचायचं तर दीड तास मोडतो. मला एक मिनिटसुद्धा वेळ वाया घालवायचा नव्हता,” ती म्हणते.

“मला माझ्या वडलांना भेटता आलं नाही, बोलता आलं नाही. ते माझ्याशी आणि घरच्यांशी फोनवर बोलायचे. आमचं शेवटचं बोलणं झालं त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यांना तहान लागली होती आणि सकाळी पाणी घेऊन यायला त्यांनी सांगितलं. मी पळतच खाली गेले आणि दुकानातून त्यांच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आले. पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की त्यांना आतमध्येच पाणी देतील म्हणून.”

२८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता बाप-लेकीमध्ये झालेला हा शेवटचा संवाद. दुपार होता होता डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी ज्योतीला सांगितलं की तिचे वडील वाचतील याची शक्यता फारच धूसर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. “दोन तासांनी त्यांनी मला सांगितलं [त्यांच्या मृत्यबद्दल]...” ती म्हणते. “मला ते काहीही ऐकायचं नव्हतं. कान बंद करून कुठे तरी पळून जावंसं वाटत होतं. घरच्यांना फोन करून मी ती बातमी दिली.”

Family photo: Vivek, Shashikala, Khushboo, Jyoti, Deepak. Right: 'If I got medals in sports or 85 per cent in 12th, he would go and show my medals and marksheet to everyone in the village. He said study so much that you don’t need to bow down before anyone'
PHOTO • Courtesy: Gupta family
Family photo: Vivek, Shashikala, Khushboo, Jyoti, Deepak. Right: 'If I got medals in sports or 85 per cent in 12th, he would go and show my medals and marksheet to everyone in the village. He said study so much that you don’t need to bow down before anyone'
PHOTO • Courtesy: Gupta family

फॅमिली फोटोः विवेक, शशिकला, खुशबू, ज्योती, दीपक. उजवीकडेः ‘मला जर खेळात पदकं मिळाली किंवा बारावीला ८५ टक्के मिळाले, तर ते गावातल्या सगळ्यांना ती मेडल्स किंवा मार्कशीट दाखवायचे. ते म्हणायचे की इतकं शिक्षण घे की तुला कुणापुढे मान झुकवावी लागली नाही पाहिजे’

दादरच्या स्मशानभूमीत गोपाल यांचा दहनविधी करण्यात आला. ज्योतीच्या नातेवाइकांनी अंतिम संस्कारासाठी गावी जायला रेल्वेच्या तिकिटांसाठी पैशाची मदत केली. ३० मार्च रोजी ते मुंबईहून निघाले आणि १ एप्रिलला त्यांच्या अस्थी घेऊन गावी पोचले. तिथून ते अजून मुंबईला परतले नाहीयेत.

ज्योतीची परीक्षेची तयारी सुरू आहे. “मी स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलंय,” ती म्हणते. “माझ्या वडलांना त्यांच्या वडलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सुरू ठेवता आलं नाही. ९-१० वर्षांचे असतानाच त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. आम्ही शिकावं अशी त्यांची इच्छा होती. आपल्या सगळ्या मुलांना शिक्षण देता आलं नाही याचं मात्र त्यांना वाईट वाटायचं,” ती सांगते. “मी काही जरी जिंकून आले, साध्य केलं तर त्याचा त्यांना अभिमान वाटायचा. मला खेळात पदकं मिळाली किंवा बारावीत ८५ टक्के मार्क मिळाले तर ते ती मेडल्स किंवा मार्कशीट अख्ख्या गावात जाऊन दाखवायचे. ते म्हणायचे की इतकं शिका, की कुणापुढे मान झुकवावी लागू नये.”

ज्योतीला सनदी लेखापाल व्हायचं होतं पण क्लासची फी माहित असल्यामुळे तिने त्या वाटेने जायचं नाही असं ठरवलं. “सध्या मला कसंही करून नोकरी शोधायचीये आणि पैसे कमवायचेत,” ती सांगते. आम्हाला सगळी कर्जं फेडायची आहेत. भाईला [विवेक] मुंबईला परत यायचंय आणि काम करायचंय. इथे काम मिळणं अवघड आहे. कुणाकुणाचे पैसे परत करायचेत त्याची अजून आम्ही बसून यादी देखील केलेली नाहीये. आणि ती यादी खूप मोठी आहे.

सध्या तरी ज्योतीच्या मोठ्या मेव्हण्यांची या कुटुंबाला मदत होतीये. मुंबईतल्या त्यांच्या घराचं भाडंसुद्धा अनेक महिने थकलेलं आहे.

तिची आई शशिकला अजूनही धक्क्यातून सावरली नाहीये. “आमचं सगळंच हिरावून घेतलंय, जे काही थोडं फार आम्ही उभं केलं होतं, ते सगळं,” त्या म्हणतात. “माझ्या मनात एकच विचार येत राहतो, की मी काय करायला पाहिजे होतं म्हणजे ते आजही आमच्यात असते. आमचं आयुष्य सरळ साधं आहे आणि आमची स्वप्नंही साधीच आहेत. पण ती तरी पाहण्याचा आम्हाला काही अधिकार आहे का?”

टीपः २०२० च्या सुरुवातीपासून माझी ज्योती गुप्ताशी ओळख आहे. आम्ही एका प्रशिक्षणात एकत्र होतो. या वार्तांकनासाठी तिच्याशी आणि तिच्या आईशी फोनवरून संवाद साधला आहे. केईएममधल्या डॉक्टरांशी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती घेतली गेली.

अनुवादः मेधा काळे

Aakanksha

ਆਕਾਂਕਸ਼ਾ ਪੀਪਲਜ਼ ਆਰਕਾਈਵ ਆਫ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਦੀ ਰਿਪੋਰਟਰ ਅਤੇ ਫੋਟੋਗ੍ਰਾਫਰ ਹਨ। ਉਹ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਟੀਮ ਦੇ ਨਾਲ਼ ਇੱਕ ਸਮੱਗਰੀ ਸੰਪਾਦਕ ਵਜੋਂ ਅਤੇ ਪੇਂਡੂ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੂੰ ਉਹਨਾਂ ਦੇ ਆਲ਼ੇ-ਦੁਆਲ਼ੇ ਦੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਨੂੰ ਦਸਤਾਵੇਜ਼ੀਕਰਨ ਲਈ ਸਿਖਲਾਈ ਦਿੰਦੀ ਹਨ।

Other stories by Aakanksha
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale