"सर, काही गिऱ्हाईक आलेत. त्यांना काय हवं ते बघू का? माझे इअरफोन चालू आहेत, मी तुमचं बोलणं ऐकत राहीन." आपल्या ठेल्याभोवती भाज्या विकत घ्यायला जमलेल्या गिऱ्हाईकांकडे लक्ष देण्याआधी काही काळ स्वतःला अनम्यूट करून मुझफ्फरने बिचकत त्याच्या मास्तरांची परवानगी घेतली. स्मार्टफोनवर सुरू असलेल्या विज्ञानाच्या तासाला परत जाण्यापूर्वी तो एकदा मोठ्याने ओरडला "ताजी… सब्जी ले लो…"
१५ जून रोजी मुझफ्फर शेखच्या ऑनलाईन वर्गाचा पहिला दिवस होता. "मागे सतत ट्रॅफिकचा आवाज, गिऱ्हाईकांची कलकल ऐकू येत होती. मला वर्गात लक्ष द्यावं की भाज्या विकाव्या हेच कळत नव्हतं," इयत्ता ८वीत असलेला १४ वर्षीय मुझफ्फर म्हणाला. त्या दिवशी सकाळी १०:०० च्या सुमारास उत्तर मुंबईच्या मालाडमधील मालवणी वस्तीत वर्दळीच्या वेळी आपल्या ठेल्यावर वांगी, बीट, काकडी अन् पत्ताकोबी इत्यादी भाज्या विकत त्याने त्या ऑनलाईन वर्गाला 'हजेरी' लावली.
मुझफ्फरने त्या वर्गासाठी एका मित्राकडून काही तासांसाठी फोन मागितला होता. त्याच्याकडे स्वतःचा फोन नाहीये. "त्याच वेळी माझा मोठा भाऊ, मुबारक, [इयत्ता ९ वीचा विद्यार्थी] हासुद्धा त्याच्या मित्राच्या घरी ऑनलाईन क्लासमध्ये होता. पप्पा कामावर गेले होते. मला ठेला बंद ठेवता आला नसता. आम्ही तीन महिन्यांनी नुकतंच १० जूनला [काम] पुन्हा सुरू केलं होतं," तो म्हणतो.
त्याचे वडील, इस्लाम, यांनी जानेवारीत हा ठेला भाड्याने घेतला होता. कुटुंबाचे खर्च वाढत होते आणि त्यांना कमाईचं आणखी एक साधन हवं होतं. चाळिशीचे असलेले इस्लाम ट्रकवर क्लीनर म्हणून कामाला होते, पण पगार कमी असल्याने त्यांनी ते काम सोडून दिलं (जूनमध्ये मात्र ते काम पुन्हा सुरू केलं). त्याची आई, ३५ वर्षीय मोमिना, हेअरक्लिप तयार करते आणि गाऊन शिवते. या सात जणांच्या कुटुंबात दोन वर्षीय हसनैन, आणि दोन मुली, इयत्ता ७ वीत असलेली फरझाना, वय १३ आणि इयत्ता ६ वीत असलेली अफसाना, वय १२ देखील आहेत.
पण ठेला भाड्याने घेण्याच्या दोन महिन्यांच्या आतच २५ मार्च रोजी कोविड-१९ टाळेबंदी झाली आणि या कुटुंबाचा तेजीत असलेली भाज्यांचा धंदा बंद झाला. "आधी पप्पाच ठेला सांभाळायचे," मुझफ्फर म्हणतो. तेव्हा तो आणि १७ वर्षांचा मुबारक सकाळी ७:०० ते १२:०० दरम्यान शाळेत जायचे. शाळा झाल्यावर दोघंही मुलं आपल्या वडिलांना बाजारात भाज्या विकण्यात मदत करायचे.











