बेलडांगा टाउनहून कोलकात्याला जाणारी हजारदुआरी एक्सप्रेस नुकतीच प्लासी स्थानकातून बाहेर पडली आणि डब्यात एकताऱ्याचा आवाज भरून गेला. संजय बिस्वास एका मोठ्या टोपलीत लाकडी खेळणी घेऊन चालले होते. त्यात होता एक चरखा, टेबल लँप, गाडी, बस आणि एक एकतारा.
अतिशय नजाकतीने तयार केलेली ही खेळणी आजूबाजूच्या चिनी वस्तूंच्या - खेळणी, कीचेन, छत्र्या, विजेऱ्या, लायटर – आणि रुमाल, दिनदर्शिका, मेंदीची पुस्तकं, झाल-मुडी, उकडलेली अंडी, चहा, खारमुरे, समोसे, पाणी इतरही असंख्य वस्तू विकणाऱ्यांच्या गर्दीत उठून दिसत होती. या मार्गावर प्रत्येक विक्रेत्याचा डबा आणि मार्ग ठरलेला आहे.
कमीत कमी पैशात वस्तू खरेदी करण्यावर गिऱ्हाइकांचा भर असतो. मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या बेहरामपूर तालुक्यातल्या बेलडांगापासून रानाघाटपर्यंतच्या १०० किलोमीटर आणि दोन तासांच्या प्रवासात हे सगळे फिरते विक्रेते चांगला धंदा करत असतात. बहुतेक सगळे विक्रेते रानाघाटला उतरतात आणि काही कृष्णानगरला. ही दोन्ही या मार्गावरची मोठी स्थानकं आहेत. तिथूनच अनेक जण लोकल गाड्या पकडून आपापल्या गावी जातात.
कुणी तरी एकताऱ्याची किंमत विचारतं. ३०० रुपये, ते सांगतात. गिऱ्हाइक जरा बिचकतो. “हे काही स्वस्तातलं खेळणं नाहीये, मी फार मन लावून ही खेळणी तयार करतो,” संजय सांगतात. “कच्चा मालसुद्धा एकदम भारी. आणि एकताऱ्याच्या बुडाचं कातडं पण एकदम खरंखुरं.” दुसरा एक प्रवासी म्हणतो, “आमच्या गावातल्या जत्रांमध्ये तर हे अगदी स्वस्तात मिळतात.” संजय उत्तरतात, “तुम्हाला जत्रेत मिळतात तसला स्वस्तातला माल नाही हा. आणि मीही काही लोकांना लुबाडून धंदा करणाऱ्यातला नाही.”
ते दोन्ही बाजूच्या खुर्च्यांच्या मधल्या जागेतून हळू हळू आपली खेळणी दाखवत पुढे जात राहतात. काही छोटीमोठी खेळणी विकली जातात. “घ्या, हातात घेऊन नीट पहा. माझी कला पाहण्याचे काही तुम्हाला पैसे पडायचे नाहीत.” थोड्याच वेळाने एका उत्सुक जोडप्याने कसलीही घासाघीस न करता त्यांच्याकडचा एकतारा विकत घेतला. “हा करायला खूप कष्ट पडतात – त्यातनं येणारे सूर तर ऐकून पहा.”




