हिवाळ्यातल्या दुपारी, जेव्हा रानातलं काम उरकलेलं असतं, आणि घरातली तरुण मंडळी आपापल्या कामांवर गेलेली असतात तेव्हा हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यातली गडी माणसं बहुतेक वेळा गावातल्या चौपाल किंवा चावडीवर सावलीत निवांत बसलेली असतात किंवा पत्ते खेळताना दिसतात.
बाया मात्र तिथे कधीच दिसत नाहीत.
“बायांचं इथे काय काम?” गावचा रहिवासी विजय मंडल विचारतो. “त्यांना त्यांच्या कामातून सवड मिळत नाही. वह क्या करेंगी इन बडे आदमियों के साथ बैठ कर?”
दिल्लीपासून अगदी ३५ किलोमीटरवर असणाऱ्या, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात येणाऱ्या सुमारे ५,००० वस्तीच्या या गावात अगदी काही वर्षूंपर्वीपर्यंत काटेकोरपणे पडदा पाळला जात असे.
“बाया चौपालकडे बघतही नसत,” मंडल सांगतो. साधारणपणे गावाच्या मध्यभागी असणाऱ्या चावडीवर बैठका होतात, इथेच तंटे सोडवण्यासाठी पंचायत भरते. “पहले की औरत संस्कारी थी,” हरसाना कलानचे माजी सरपंच सतीश कुमार म्हणतात.
“त्यांना मान, इज्जत समजायची,” मंडल म्हणतात. “चावडीच्या जवळून जरी जायचं असलं ना तरी त्या पडदा घ्यायच्या,” हलकसं हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटतं.
३६ वर्षीय सायरासाठी यातलं काहीही नवीन किंवा नाविन्यपूर्ण नाही. दिल्लीजवळच्या माजरा दबस गावातून लग्न होऊन २० वर्षांपूर्वी ती इथे आली, जेव्हापासून गेली १६ वर्षं ती हे सगळे आदेश, बंधनं पाळत आलीये. इथल्या पुरुषांसारखं ती पूर्ण नाव नाही, फक्त तिचं नाव सांगते.
“मी जर लग्नाच्या आधी माझ्या नवऱ्याला भेटले असते ना, तर मी या लग्नाला मंजुरीच दिली नसती. इस गांव में तो कट्टे ना आती [मी या गावात तर अजिबातच आले नसते],” शिलाई मशीनवर एक जांभळं कापड सरसर सुईखाली सरकवत सायरा सांगते. (तिचं आणि तिच्या घरच्या सगळ्यांची नावं बदलली आहेत.)











