दोन आठवड्याचा मुसळधार पाऊस शेतकऱ्यांची चार महिन्यांची मेहनत पाण्यात जायला पुरेसा होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतशिवारांनी पावसाचा अक्षरशः रुद्रावतार पाहिला. ढग बरसले नाही तर फुटले, जोराच्या वाऱ्यानी घरांची छपरं रानोमाळ झाली, गुरं गतप्राण केली आणि अनेक शिवारातली पिकं वाहून नेली.
उस्मानाबादच्या महालिंगी गावातल्या शारदा आणि पांडुरंग गुंड या शेतकरी दांपत्यानेही पावसाचा फटका सोसला. “काढून ठेवलेलं ५० क्विंटल सोयाबीन वाया गेलं,” ४५ वर्षीय शारदा सांगतात. “रानात गुडघाभर पाणी साचून राहिलं होतं. त्यात सगळंच गेलं.”
भारतीय वेधशाळेच्या आकडेवारीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये २३०.४ मिमी पाऊस झाला. एरवी या महिन्यात होणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा तब्बल १८० टक्के जास्त.
यात सर्वात जास्त नुकसान झालं ते शारदा आणि पांडुरंग यांच्यासारख्या शेतकऱ्यांचं.
५० वर्षीय पांडुरंग हताशपणे पावसाचं हे तांडव पाहत होते. सोयाबीनचा दाणा न दाणा या पावसाने पाण्यात घातला. अडतीवर तेव्हा क्विंटलमागे ३,८८० भाव सुरू होता. म्हणजेच गुंड दांपत्याचं १,९४,००० रुपयांचं नुकसान झालं. “८०,००० रुपये खर्च केला होता,” शारदा सांगतात. “बी आणायचं, खाद, औषधं काय कमी लागतेत का? चार महिने आम्ही शेतात राबराब राबलो, ते तर गेलं कुठल्या कुठं. पाऊसच असला होता की आम्ही काय सुद्धा करू शकलो नाही.”











