उत्तर प्रदेशातल्या पंचायत निवडणुकांच्या कामाची शिक्षकांना सक्ती करण्यात आली आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात कोविड-१९ ची लागण होऊन आतापर्यंत १६२१ शिक्षकांना – ११८१ शिक्षक, ४४० शिक्षिका – आपले प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेश शिक्षक महासंघ आणि त्याशी संलग्न शिक्षक संघटनांनी तयार केलेल्या अद्ययावत यादीवरून ही माहिती मिळते. पारीच्या ग्रंथालयात ही संपूर्ण यादी हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहेत.
१० मे रोजी आम्ही हे सुलतानी संकट कसं उद्भवलं त्याचं वार्तांकन प्रसिद्ध केलं होतं. शिक्षक संघटना या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी कळकळीची मागणी करत होत्या. मात्र उप्र शासन आणि राज्य निवडणूक आयोगाने याकडे पूर्ण काणाडोळा केला. तेव्हा निवडणुकांसाठी काम केल्यानंतर मरण पावलेल्या शालेय शिक्षकांची संख्या होती ७१३ – ५४० शिक्षक आणि १७३ शिक्षिका.
या राज्यात सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ८ लाखांहून अधिक शिक्षक काम करतात आणि यातल्याच हजारो शिक्षकांना निवडणुकांचं काम लावण्यात आलं होतं. निवडणुकाही अतिभव्य. आठ लाख जागांसाठी १३ लाख उमेदवार. १३ कोटी मतदार भाग घेणार असल्याने निवडणूक अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांचा अर्थातच हजारो जणांशी संपर्क येणं साहजिकच होतं. त्यात कसलेही नियम नियमावली अस्तित्वात नाहीत.
या पूर्वी उत्तर प्रदेशातल्या पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. उदा. सप्टेंबर १९९४ च्या निवडणुका एप्रिल १९९५ मध्ये घेण्यात आल्या होत्या. “अभूतपूर्व अशी महामारी आणि मनुष्यजातीसमोरच संकट उभं राहिलेलं असताना ही अशी घाई करण्याचं कारणच कायहोतं?” राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त सतीश कुमार अगरवाल खडा सवाल करतात.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र निवडणुकांचं आयोजन आणि शिक्षक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये काहीही संबंध आहे हे मान्य नाही. “दिल्लीमध्ये निवडणुका होत्या का? महाराष्ट्रात निवडणुका होत्या?” नोएडामध्ये १२ मे रोजीपत्रकारांना त्यांनी हा प्रश्न विचारला. या सगळ्याचं पातक अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माथी मारण्याचे प्रयत्नही झाले. मुख्यमंत्री आदित्यनाथ पत्रकारांसमोर जाहीर करतातः “उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका पार पाडण्यात आल्या.”
पण हे अर्धसत्य आहे. न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका नाकारली हे खरं आहे. पण ही खाजगी याचिका होती, राज्याने दाखल केलेली नव्हती. (संवैधानिक अटींनुसार पंचायतीच्या निवडणुका जानेवारी २०२१ च्या आत पूर्ण व्हायला पाहिजे होत्या). पण न्यायालयाने कोविड-१९ नियमावलीचं काटेकोर पालन करूनच निवडणुका घेण्याचे आदेशही दिले होते.
६ एप्रिल रोजी अलाहाबाद उच्च न्यायालय म्हणतं की राज्य सरकार सगळ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करेल असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि खरं तर उत्तर प्रदेश शासनाने “निवडणूक प्रचारांसाठी आधीच नियमावली जाहीरकेली होती.” आदेशात पुढे म्हटलं आहे की “पंचायतीच्या निवडणुकांचं आयोजन करताना कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अर्ज दाखल करणे, प्रचार किंवा प्रत्यक्ष मतदानादरम्यान देखील कोविड-१९ चे नियम पाळले जातील याकडे लक्ष दिले जावे.” म्हणजे, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका घेण्यात आल्या या म्हणण्यात काहीच तथ्य नाही. न्यायालयाच्या या आदेशांची पायमल्ली शिक्षकांसाठी जीवघेणी ठरली, संघटना सांगतात.
शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ अगदी अलिकडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की “सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी देखील महासंघाने आपल्या वकिलामार्फत आपलं म्हणणं कोर्टाला सादर केलं होतं. पण शासनाने आदरणीय सर्वोच्च न्यायाला अशी ग्वाही दिली होती की कोविडची संसर्ग होऊ नये यासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचं मतमोजणीच्या वेळी पालन करण्यात येईल.”
पत्रातलं एक वाक्य हृदयाला भोकं पाडतं. “इतक्या मोठ्या संख्येने शिक्षकांचा जीव गेला पण प्राथमिक शिक्षण विभाग किंवा उत्तर प्रदेश सरकार, कुणीच आजपर्यंत त्याबद्दल कणही दुःख व्यक्त केलेलं नाही ही दुर्भाग्याची बाब आहे.”
२६ एप्रिल रोजी कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला या नियमावलीचा “भंग” केल्याप्रकरणी नोटीस पाठवली. यात तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतर या नियमांचं पालन “भावभक्तीने करायचं असतानाही” केलं गेलं नाही याचाही उल्लेख होती. जर शासन किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे आदेश मान्य नव्हते तर त्यांनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायला पाहिजे होती. त्यांनी तसं काहीही केलं नाही. त्या आधी देखील मार्चच्या अखेरच्या आठवड्यात राज्य शासनाने होळीच्या सोहळ्यादरम्यान देखील कोविड-१९ च्या नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी कसलेही प्रयत्न केल्याचं दिसत नाही.
महत्त्वाचं म्हणजे १२ मे रोजी अलाहाबाद न्यायालयाने सांगितलं की राज्य शासनाने ज्या निवडणूक अधिकाऱ्यांचा (शिक्षक आणि इतर शासकीय कर्मचारी) निवडणुकीच्या कामानंतर कोविड-१९ मुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई म्हणून किमान १ कोटी रुपयेदिलेच पाहिजेत. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठाच्या शब्दातः “इथे कुणी स्वतःहून सेवाभावीपणे निवडणुकीचं काम मागून घेतलेलं नाही. उलट ज्यांना हे काम लावण्यात आलं, त्यांची नाराजी असतानाही त्यांना निवडणुकीदरम्यान काम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.”
लक्षात घेण्याजोगी आणखी एक गोष्टः कोणत्याही न्यायालयाने उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाच्या सरकारला कुंभ मेळा एक वर्ष अलिकडे घेण्याचे आदेश दिले नव्हते. हरिद्वारचा कुंभ मेळा दर १२ वर्षांनीभरतो आणि यंदाचा कुंभ २०२२ साली होणार होता. कुंभ मेळ्यातही मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि हा उत्सवही पंचायत निवडणुकींच्या काळातच भरवला गेला. २०२२ ऐवजी एक वर्ष आधी २०२१ साली कुंभमेळ्याचं आयोजन करण्यामागे ग्रहतारकांच्या स्थितीची आणि धार्मिक कारणं जोरकसपणे मांडण्यात येत आहेत. मात्र पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या आधी कुंभ मेळा आणि पंचायत निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्याची राजकीय निकड मात्र कुणाच्याच चर्चेत नाही. याच दोन्ही घटना जर अशा जीवघेण्या ठरल्या नसत्या तर उत्तम कामगिरी म्हणून मिरवल्या गेल्या असत्या हे निश्चित.
या संहाराचं पारीचं मूळ वार्तांकन (१० मे):














