सीतापूरमध्ये रुग्णालयात दाखल असलेले, प्राणवायू लावावा लागलेले आणि जिवंत राहण्यासाठी आटापिटा सुरू असलेल्या रितेश मिश्रांचा फोन काही वाजायचा थांबत नाहीये. हे फोन होते राज्य निवडणूक आयोग आणि सरकारी अधिकाऱ्यांचे. तब्येत ढासळत चाललेला हा शिक्षक २ मे रोजी मतमोजणीसाठी हजर राहणार का हे पक्कं कळवा असा त्यांचा तगादा होता.
“फोन थांबतच नव्हते,” त्यांच्या पत्नी अपर्णा सांगतात. “जेव्हा मी तो फोन घेतला आणि त्यांना सांगितलं की रितेश रुग्णालयात दाखल आहेत आणि हे काम करू शकणार नाहीत – तेव्हा त्यांनी मला रुग्णालयातल्या खाटेवर असलेला त्यांचा फोटो पाठवायला सांगितलं. मी पाठवला. तोच फोटो मी पाठवते तुम्हाला,” त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि फोटो पाठवला देखील.
अपर्णा मिश्रा सतत सांगत राहतात की त्यांनी आपल्या नवऱ्याला निवडणुकीच्या कामाला जाऊ नका असं खूप ठासून सांगण्याचा प्रयत्न केला होता. “त्यांच्या कामाचं वेळापत्रक हाती आलं तेव्हापासून मी त्यांना सांगत होते,” त्या म्हणतात. “पण ते एकच गोष्ट सतत सांगत राहिले, निवडणुकीचं काम रद्द नाही होत. आणि ते कामावर रुजू झाले नाहीत तर वरचे अधिकारी त्यांच्या विरोधात एफआयआरसुद्धा दाखल करू शकतात.”
२९ एप्रिल रोजी रितेश कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडले. पंचायत निवडणुकांसाठी कामावर असलेल्या इतर ७०० शिक्षकांचा जीव या आजाराने घेतला आहे. पारीकडे सगळ्यांची पूर्ण यादी आहे आणि आता आकडा ७१३ वर जाऊन पोचलाय – ५४० शिक्षक, १७३ शिक्षिका. आणि आकड्यात अजूनही भरच पडतीये. या राज्यात शासकीय प्राथमिक शाळांमध्ये ८ लाख शिक्षक आहेत आणि यातल्या हजारो शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर पाठवलं गेलं होतं.
सहाय्यक अध्यापक असलेले रितेश आपल्या कुटुंबासोबत सीतापूर या जिल्ह्याच्या गावी रहायचे आणि लखनौच्या गोसाईगंज इथल्या प्राथमिक शाळेत शिकवायचे. १५, १९, २६ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यात घेण्यात आलेल्या पंचायतीच्या निवडणुकांमध्ये जवळच्याच गावात एका शाळेत त्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.













