“ती तासंतास रडत असते, आईला घेऊन या म्हणून मला सांगते,” शिशुपाल निषाद आपल्या नऊ वर्षांच्या नव्याबद्दल बोलत असतात. “आता तिला कुठून परत घेऊन येऊ? मला सुद्धा आता काही सुधरेनासं झालंय. गेले कित्येक आठवडे आमचा डोळ्याला डोळा नाहीये,” उत्तर प्रदेशातल्या सिंगतौली गावात मजुरी करणारे ३८ वर्षीय निषाद सांगतात.
शिशुपाल यांची पत्नी, नव्याची आई मंजू जालौन जिल्ह्याच्या कुठौंद तालुक्याच्या सिंगतौलीमधल्या प्राथमिक शाळेत शिक्षा-मित्र म्हणून काम करत होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणुकींदरम्यान सक्तीचं काम लावल्यानंतर कोविड-१९ चा संसर्ग होऊन जे शिक्षक मरण पावले त्या १,६२१ जणांच्या यादीत त्यांचा क्रमांक १,२८२. त्यांच्या मृत्यूआधी पाच जणांच्या या कुटुंबासाठी मात्र मंजू निषाद एका आकड्यापेक्षा खूप अधिक काही होत्या.
त्या तीन मुलांची आई होत्या आणि घरातल्या एकट्या कमावत्या. शिक्षा मित्र म्हणून कंत्राटी पदाचा त्यांना महिन्याला १०,००० रुपये असा तुटपुंजा पगार मिळत होता. नोकरी किती काळासाठी याची कुठलीही हमी नव्हती. मंजू तर या पदावर १९ वर्षं काम करत होत्या, तरीही. शिक्षा मित्र शिकवायचंच काम करतात पण त्यांना शिक्षण सहाय्यक या वर्गामध्ये टाकलं जातं.
शिशुपाल बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या कामावर ३०० रुपये रोजाने मजुरी करत होते पण “दोन महिन्यांपूर्वी मी जिथे काम करत होतो, तिथलं काम पूर्ण झालं. जवळपास दुसरं कुठलंच काम सुरू नव्हतं. गेले काही महिने आम्ही माझ्या पत्नीच्या पगारावरच सगळं भागवत होतो.”
एप्रिल महिन्यात १५, १९, २६, २९ अशा चार टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशातल्या महाप्रचंड अशा निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यासाठी हजारो शिक्षकांना निवडणुकीची कामं नेमून देण्यात आली होती. सुरुवातीला शिक्षक एका दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गेले आणि त्यानंतर दोन दिवस मतदानाच्या कामावर – एक दिवस पूर्वतयारी आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान. त्यानंतर २ मे रोजी परत एकदा हजारो शिक्षकांना मतमोजणीच्या कामावर बोलावण्यात आलं. हे काम सक्तीचं करण्यात आलं होतं आणि निवडणुका पुढे ढकलाव्यात या शिक्षक संघटनांच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं.
यूपी शिक्षक महासंघाने मरण पावलेल्या एकूण १,६२१ शिक्षकांची यादी केली आहे. त्यातले १९३ शिक्षा मित्र आहेत. यात मंजूंप्रमाणे इतर ७२ स्त्रिया आहेत. पण १८ मे रोजी उत्तर प्रदेश बेसिक शिक्षा विभागाने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार कामावर मृत्यू झालेल्या तीन शिक्षकांची कुटुंबं नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात. शिक्षकांसाठी याचा अर्थ काय तर जे त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी परतत असताना मरण पावले केवळ तेच शिक्षक. प्रेसनोटमध्ये म्हटलं आहेः “कोणत्याही कारणाने या कालावधीत मरण पावलेल्यांना नुकसान भरपाई मिळू शकते आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे त्यासाठी मान्यता दिली जाईल.”








