केवलबाई राठोड, वय ६०. एका हातपंपावर जोर लावून पाणी भरतायत. दर वेळी तो जडच्या जड दांडा दाबताना घशातून आवाज येतोय, हाताच्या शिरा फुगतायत आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिकच गहिऱ्या होतायत. इतका सगळा जोर लावूनही कसंबसं थेंबथेंब पाणी हंड्यात पडतंय. त्यांच्यामागे गावकऱ्यांची रांग लागलीये. पंपाचं पाणी कधी जाईल, सांगता येत नाही.
तासभरात, संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत केवळबाईंचे फक्त दोन हंडे भरून झालेत. त्यांचे पती रामू, वय ६५, पलिकडे एका खडकावर, हवेत नजर लावून बसलेत. “झाला रे,” केवलबाई आवाज देतात, रामू उठून उभे राहतात, पण जागचे हलत नाहीत. त्या एक हंडा उचलून त्यांना नेऊन देतात. ते आपल्या खांद्यावर जपून हंडा ठेवतात, केवलबाई दुसरा हंडा घेतात. रामूचा हात आपल्या खांद्यावर ठेवतात आणि दोघं घराकडे जायला निघतात. “त्यांना दिसत नाही,” माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून केवलबाई सांगतात.
‘त्यांना दिसत नाही,’ केवलबाई सांगतात. काशिराम सोमलातल्या घरी आपल्या पतीला, रामूला वाट दाखवत घेऊन जातात. त्यांनी कष्टाने भरलेलं पाणी दोघं मिळून घरी नेतात, पुढची खेप करायला परततात
महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातल्या उद्गीर तालुक्यातला डोंगराळ भागातला काशिराम सोमला तांडा. बोअरवेलवर बसवलेला हातपंप तांड्याच्या पायथ्याला. पाण्याची प्रत्येक खेप म्हणजे टेकडीची १५ मिनिटाची चढण चढायची. हंड्यात एका खेपेला १२ लिटर पाणी मावतं. म्हणजे भरल्यावर त्याचं वजन १२ किलो भरतं. या खडकाळ वाटेनं केवलबाई रामूंसोबत दिवसातून किती तरी खेपा करतात. “आमचं सात जणांचं कुटुंब आहे,” टेकडीवरती टोकाला असलेल्या आपल्या घरी पोचता पोचता केवलबाई सांगतात. “मला तीन पोरं आहेत, दोघांची लग्नं झालीयेत. ते सगळेच कामाच्या शोधात – शेतात मजुरी किंवा उद्गीर शहरात बांधकाम - सकाळीच घर सोडतात. त्यामुळे पाणी भरायचं काम आमच्या दोघांच्या माथी.”
त्यांच्याकडे शेतजमीन नाही आणि जनावरंही नाहीत. पोरं आणि सुनांच्या मजुरीवरच त्यांचं घर चालतं. “दिवसाला १० हंडे भरायचे असं आम्ही ठरवितो. दोघं मिळून आम्ही अशा पाच खेपा करतो. आम्हाला स्वयंपाक, भांडी, कपडे आणि अंघोळीलाच काय ते पाणी लागतं. ज्याच्याकडं शेत हाय, जनावरं हायती, त्यांना पाण्यापायी लईच कष्ट करावे लागतात.”
डावीकडेः केवलबाई , ६० पाणी भरण्याआधी हंडे घासून घेतायत . उजवीकडेः त्यांचं पाणी भरेस्तोवर त्यांचे पती , रामू शेजारी बसून राहिलेत
मी ४० वर्षांच्या शालूबाई चव्हाणांना सकाळी ११.३० वाजता त्यांच्या घरी भेटलो, तेव्हा त्या गेले पाच तास पाणी भरत होत्या. त्या बंजारा समाजाच्या, घरात पाच माणसं आणि दोन एकर रान. “आमची सगळी कमाई दुधात आहे,” त्या सांगतात. “आमच्याकडं दोन बैलं, तीन गाई आणि चार म्हशी हायता. त्यांचं करायला लई पाणी लागतं. दिवसाला २० हंडे बी पुरंनात.”
काशिराम सोमल्याच्या टेकडीवरच्या रस्त्याच्या वळणावरच शालूबाईचं घर आहे. हातपंपाच्या रस्त्याला पोचण्यासाठी तिला काही मिनिटं चालावं लागतं. घराबाहेर धुणं धुता धुता शालूबाई सांगतात, “उन्हाळा सुरू झाला तेव्हा दोन हातपंप चालू होते. त्यातला एक बंद पडला. आता आमच्या तंड्यावरची चारशे माणसं या एकट्या हातपंपाच्या भरोशावर आहेत. ही असली गरमी आहे. पण या तलखीतही घोटभर पाणी प्यायलं तर माझंच मन मला खातं. कलेक्टरने टँकरने पाणी द्यायला सुरू केलंय, पण त्यांचा काय नेम नाही. त्यांच्या भरोशावर कसं रहावं?”
म्हणूनच पहाटेच्या आधीपासूनच हातपंपासमोर हंड्याच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. “सूर्य डोईवर आला की पारा ४०च्या वर जातो. तेव्हा पाणी भरायला लई त्रास होतो,” शालूबाई सांगतात. त्या पहाटे ३ वाजल्यापासून ४ हंडे घेऊन पाण्याच्या रांगेत उभ्या आहेत. “लाइन संपतच नाही. मी सकाळी १२-१५ हंडे भरते आणि मग संध्याकाळी ४ ते ७च्या दरम्यान ५-८ हंडे. माझी बारी येईपर्यंत तीन घंटे लागतात आणि पाण्याच्या एका खेपेला दोन तास. आता ९ वाजलेत. अजून घरची कामं सुरू बी केली नाहीयेत.”
शालूबाईचे आठ तास पाणी भरण्यात जातात आणि बाकीचे घरकाम आणि कुटुंबाची काळजी घेण्यात
सकाळचे पाच आणि संध्याकाळचे तीन तास – शालूबाईचे दिवसातले आठ तास घरासाठी पाणी भरण्यात जातात. आणि हे फार काही वेगळं नाहीये. राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका अहवालानुसार ग्रामीण भागात बायांना दिवसातले ६ ते ९ तास पाण्याच्या कामात घालवावे लागतात. शेतात आठ तास मजुरी केली तर शालूबाईला इथल्या दराप्रमाणे दिवसाला २०० रुपये रोज मिळेल. उन्हाळ्याच्या या तीन महिन्यात – मार्च ते मे – तिचे दर वर्षी १८,००० रुपये बुडतात असं समजायचं.
या अंग पिळवटून काढणाऱ्या कामामुळे जाणारा वेळ आणि बुडणारी कमाई ही नुकसानीची एक बाजू. ग्रामीण भागात पाण्याचं काम हे बहुतकरून बाया आणि मुलीच करतात, त्यांच्या आरोग्यावरचा आणि मुलींच्या शिक्षणावरचा परिणाम हे नुकसानही लक्षात घ्यायला हवं. स्त्रिया शेतीशी संबंधित बरीच कामं करत असल्या तरी घरचं पाणी भरण्याची मुख्य जबाबदारी त्यांचीच समजली जाते. २०१२ च्या राष्ट्रीय नमुना पाहणीत (NSSO; 69 th round, 2012) असं नमूद करण्यात आलं आहे की जेव्हा लांबनं पाणी आणावं लागतं तेव्हा ग्रामीण भागात ते काम करणाऱ्यांपैकी ८४.१% स्त्रिया आणि १४.१% पुरुष असं प्रमाण आढळून येतं.
डावीकडेः पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईचा परिणाम शालूबाईच्या घरच्या जनावरांवर होतो आहे . उजवीकडेः त्यांच्या अंगणातला लहानसा हौद कोरडा पडू लागला आहे
शालूबाईंचे पती, राजाराम अंघोळीसाठी शालूबाईंनी आणलेलं पाणी वापरतात आणि शेतात निघतात. “यंदाच्या वर्षी आठ तासानंतर किमान मला पाणी तरी मिळतंय” शालूबाई सांगतात. “गेल्या साली लईच हाल होते. तास न् तास चालूनदेखील रिकामे हंडे घेऊन परतायला लागायचं. एकदा तर आमच्या जनावरांसाठी चारा आणायला मला २० किलोमीटर चालायला लागलं होतं.”
पाण्याच्या सकाळ संध्याकाळच्या खेपांमध्येही शालूबाईंना कसलाच आराम मिळत नाही. “माझी दोन पोरं शाळंला आहेत. मला त्यांचं बघावंच लागतं, त्यांना तयार करायचं, शाळेला धाडायचं. सगळ्यांचा स्वयंपाक, धुणी-भांडी, घरचं सगळं बघावंच लागतं की,” शालूबाई सांगतात.
व्हिडिओ पहाः ‘ मी पहाटे चारला घर सोडते आणि रांगेत उभी राहते ,’ आपला दिवस कसा सुरू होतो , ते शालूबाई सांगतयात
उद्गीरपासून १५० किलोमीटरवरच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ताकविकी गावच्या प्रयागाबाई डोलारेंना वेगळ्याच समस्या आहेत.
प्रयागाबाई सत्तरीच्या असतील. दलित म्हणून त्यांना आयुष्यभर भेदभाव सहन करावा लागला आहे. “गेल्या काही वर्षात सुधरलंय जरा,” रानातनं वाट तुडवत पाण्याला जाता जाता त्या बोलतात. “किती तरी ठिकाणी मला पाणी भरु द्यायचे नाहीत. माझा नंबर नेहमीच शेवटचा. गावात आजही एका विहिरीवर मला प्रवेश नाही.”
प्रयागाबाईंच्या घरी फक्त पाण्याचीच नाही कमवायची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. “आम्हाला मूलबाळ नाही,” त्या सांगतात. उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पदर डोक्याला गुंडाळलेला. पारा ४५ डिग्री सेल्सियसला पोचलाय. “माझा नवरा अधू आहे. त्यांना चालायला येत नाही. मजुरी तरी कशी करावी त्यांनी?”
आठवड्याचे तीन दिवस प्रयागाबाईंचे चार पाच तास पाणी साठवण्यावर जातात. आठवड्याभराचं पाणी भरायचं असतं. “३०-३५ हंड्यात भागतं आमचं,” त्या सांगतात. त्या जिथनं पाणी भरतात ती खाजगी बोअरवेल त्यांच्या घरापासून १ किलोमीटरवर आहे. “एका वेळी मी एक हंड्यापेक्षा जास्त नेऊ शकत नाही. आता माझ्या वयाला, एका खेपेला अर्धा तास तरी लागतोच.”
आठवड्यातले बाकीचे दिवस प्रयागाबाई शेतात मजुरीचं काम करतात. त्यांच्या वयामुळे त्यांना दिवसाचे १०० रुपयेच मिळतात. “कसं तरी करून दिवस रेटतोय आम्ही. पण माझे हातपाय चालेनासे झाल्यावर आमचं कसं व्हावं?” जे तीन दिवस त्यांना पाणी भरावं लागतं, त्यांचा रोज बुडतो. आठवड्याला जेवढी कमाई होऊ शकते, त्याच्या निम्मी बुडते.
व्हिडिओ पहाः ‘ मी माझा हात तिच्या खांद्यावर ठेवतो आणि आम्ही जातो . पाण्याचे हईच हाल हायेत यंदा . पर काय करावं ?’ रोजच्या हातपंप ते घर अशा फेऱ्यांबद्दल रामू सांगतात
मराठवाड्यातल्या बाकी आठ जिल्ह्यातल्या बहुतेक गावांसारखीच ताकविकीची स्थिती आहे. उन्हाळ्यात सगळ्या विहिरी, तळी, तलाव आणि धरणं आटतात आणि पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य सुरू होतं. हा असा काळ आहे जेव्हा काही करून पाणी मिळावं म्हणून शेतकरी इथे तिथे बोअर पाडायचा प्रयत्न करतायत. जर एखाद्या कुटुंबाचं नशीब चांगलं असेल तर त्यांना पाणी लागतं. पाण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि भरीस भर चांगली कमाईदेखील सुरू होऊ शकते.
मराठवाड्यातले किती तरी जण या दुष्काळात १२-१५ लिटरचा एक हंडा २-४ रुपयाला विकून आपली पोळी भाजून घेतायत. प्रयागाबाई एका हंड्याला दोन रुपये देतात. “म्हणजे आठवड्याला सत्तर रुपयाचं पाणी झालं,” त्या सांगतात. आठवड्याच्या त्यांच्या कमाईचा जवळ जवळ चौथा हिस्सा. तर पाण्याची टंचाई आणखी तीव्र झाली तर त्यांना याहून जास्त खर्च करावा लागणार.
ताकविकीहून २५० किलोमीटर उत्तरेला दिवसाला जवळ जवळ ३० लाख लिटर पाणी निव्वळ ४ पैसे लिटर भावाने मिळतंय. औरंगाबादच्या १६ बिअर आणि दारूच्या कारखान्यांना. एमआयडीसीचे अधिकारी सांगतात की ते ४२ रुपये दराने पाणी देतात, पण ते हे सांगायला विसरतात की हे १००० लिटर पाण्यासाठीचे पैसे आहेत.
प्रयागाबाईंना मात्र १००० लिटर पाण्यासाठी याच्या तिपटीहून जास्त पैसे खर्च करावे लागतील आणि ते वाहून आणण्यासाठी ३५ तास पायपीट करावी लागेल.
डावीकडेः रोज सकाळी काशीराम सोमला तंड्याच्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडते . उजवीकडेः हातपंप कधीही कोरडा पडू शकतो या भीतीने ही तरुणी बादलीत गढूळ पाणी भरतीये
एप्रिल २०१६ मध्ये भयंकर दुष्काळाचा सामना केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बिअर कारखान्यांच्या पाणी पुरवठ्यात ५०% कपात करण्याचे आदेश दिले. हे सगळे कारखाने मिळून दिवसाला ५० लाखाहून जास्त लिटर पाणी ओरपत होते. “एकीकडे लोकांना आठवडाभर पाणी पहायला मिळत नाहीये आणि दुसरीकडे हे कारखाने अशा पद्धतीने हे अमूल्य पाणी लुटतायत हे खरंच अमानुष आहे.”
तिथे काशीराम सोमल्यात केवलबाईंनी दोन हंडे पिंपात ओतलेत. त्यांच्या आजूबाजूचं रान ओस पडलंय, पण हातपंपाजवळ मात्र नेहमीप्रमाणे गर्दी गोळा झालीये. रामूंचा हात हातात घेतात, दुसऱ्या हातात दोन रिकामे हंडे घेऊन टेकडी उतरून पाण्याची आणखी एक खेप करायला केवलबाई निघतात.
फोटोः पार्थ एम एन