मुरलीधर जवाहिरे एकदा काम करायला बसले की मग चुकीचा किंवा लक्ष विचलित व्हायचा सवालच नाही. त्यांचे हात झपाट्याने काम करत असतात, तोरणाच्या सांगाड्याचे कोने जुळतात, धाग्याने बांधले जातात. दररोज ही तोरणं तयार होत असतात. सत्तरीतल्या जवाहिरेंची काया कृश असली तरी आणि त्यांचं चित्त मात्र एकाग्र, अढळ आहे.
महाराष्ट्राच्या इचलकरंजीत त्यांच्या घराबाहेर त्यांचं कामाचं वेगवेगळं साहित्य पडलेलं दिसतं. बांबूच्या कामट्या, रंगीत कागद, जिलेटिनेचे कागद, वर्तमानपत्र आणि इतरही बरंच काही साहित्य निळ्या-मोरपंखी रंगाच्या घरभिंतींसमोर उठून दिसतंय. थोड्याच वेळात, काही तासांतच या सगळ्या वस्तूंमधून नक्षीदार तोरणं तयार होतील आणि गावातल्या घरांना, देवळांना साज चढवतील.
आपल्या सुरकुतल्या बोटांनी जवाहिरे काका बांबूच्या कामटीचे झटक्यात एकाच लांबीचे ३० तुकडे करतात. त्यानंतर नऊ समभुज त्रिकोण तयार करून, तेही कसलंही मोजमाप न करता, केवळ अंदाजाने, ३ ते १० फूट लांब बांबूच्या पट्टीला चिकटवले जातात.
अधून मधून काका जरमेलच्या पोचे पडलेल्या भांड्यात, चिंचोक्याच्या खळीत बोटं बुडवत असतात. त्यांच्या पत्नी, साठी पार केलेल्या शोभा यांनी सकाळीच खळ करून ठेवलीये.
“काम सुरू असलं की ते चकार शब्द काढत नाहीत, कुणी मध्ये काही बोलायचं पण नाही,” त्या सांगतात.
जवाहिरे काका काही न बोलता बांबूच्या कामट्यांची चौकट तयार करतात. तेवढ्या वेळात शोभा ती सजवण्यासाठी इतर काही सजावट तयार करतात – जिलेटिनच्या कागदाचे तुकडे ओवून रंगीत माळ तयार होते. “घरकामातून जरा सवड मिळाली की मी हे करायला लागते. डोळ्यावर लई ताण येतोय,” त्या म्हणतात.
खळीसाठी लागणारे चिंचोके पायलीला (पाच किलो) ४० रुपये दराने मिळतात. त्यांना दर वर्षी २-३ पायल्या चिंचोका लागतो. तोरण सजवण्यासाठी जवाहिरे काकांकडे जुन्या वर्तमानपत्राच्या कागदाच्या छोट्याशा छत्र्या, नारळ आणि राघूंचा साठा आहे. “आम्ही हे स्वतः घरीच करायचो, पण आता वयामुळे जमत नाही. त्यामुळे बाजारातून विकत आणतोय,” शोभा सांगतात. “९० नारळ आणि राघूंचे १०० रुपये पडतात.” एकदा का चौकट तयार झाली की मुरलीधर त्याच्यावरचं नक्षीकाम सुरू करतात.
जवाहिरे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून, किमान गेली १०० वर्षं ही तोरणं तयार करतंय. “माझे वडील सांगायचे की आमची ही कला कमीत कमी १५० वर्षं जुनी आहे म्हणून,” मुरलीधर सांगतात. त्यांच्या आवाजातला अभिमान लपत नाही. ते तांबट समाजाचे आहेत (महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट) आणि पूर्वापारपासून तोरणं बनवणं, तोट्या दुरुस्त करणं आणि तांब्या-पितळ्याच्या भांड्यांना कल्हई करणं ही त्यांची कामं आहेत.
त्यांचे वडील 'चाव्या' (तांब्या पितळ्याच्या टाक्यांच्या तोट्या) बसवायचे, बंब दुरुस्त करायचे आणि भांड्याला कल्हई करायचे. पण कल्हई करण्याची कला वीसेक वर्षांपूर्वीच कालबाह्य झाली, ते म्हणतात. “आजकाल तांब्याची, पितळ्याची भांडी कोण वापरायला लागलंय? आता नुस्तं स्टील नाही तर प्लास्टिक. त्याला काय कल्हई लागत नाही.”
आता तर कोल्हापूरच्या इचलकरंजीत हाताने तोरणं बनवणारेही ते शेवटचेच असल्याचं ते सांगतात. “आता हे बनवणारे केवळ आम्हीच राहिलोत,” हेच काम १० वर्षांपूर्वी किमान १० कुटुंबं करत होती. ते म्हणतात, “आजकाल तर या कलेबद्दल विचारायला सुद्धा कुणी येईना. शिकणं तर लांबच.”
तरीही, दर्जा राखायचाच. त्याच्याशी तडजोड नाही. “काहीच बदल नाही. तीच क्वालिटी, तोच नमुना,” ते म्हणतात.
जवाहिरे १० वर्षांचे होते तेव्हापासून तोरणं बनवतायत. ते शिकले ते आपल्या वडलांचं पाहून. कोणतंही उपकरण न वापरता तोरण तयार करण्यामागे “किती तरी दशकांचा सराव आहे,” ते सांगतात. “जातीच्या कारागिराला पट्टीची गरज लागत नाही हो,” ते म्हणतात. “आमच्यापैकी कुणीच मोजमाप करायला काहीच वापरलं नाही. आम्ही मोजतच नाही. सगळं ध्यानात आहे.”
तोरण कसं असेल हे देखील कुठे लिहून ठेवलेलं नाही. “कशाला पाहिजे?” पण अचूक काम आणि कौशल्य मात्र हवंच. सुरुवातीला त्यांच्याही काही चुका व्हायच्या. पण आता मात्र एक बांबूची चौकट फक्त २० मिनिटात तयार होते.
त्या दिवशी तोरण बनवायचं त्यांचं काम सुरू आहे. बांबूच्या चौकटीला ते एक कागदी छत्री बांधतात त्यानंतर मोराची दोन चित्रं लटकवतात. इथून २८ किलोमीटरवर असलेल्या कोल्हापुरातून त्यांनी ही विकत घेतली आहेत. त्यानंतर जवाहिरे आणि शोभाताई एका आड एक त्रिकोणात हिंदू देव देवतांची चित्रं लावतात. ही चित्रं देखील कर्नाटकातल्या निपाणीतून किंवा कोल्हापुरातून आणली आहेत. “आम्हाला जर फोटो मिळाला नाही, तर आम्ही जुनी कॅलेंडर, लग्नाच्या पत्रिका आणि वर्तमानपत्रांमधनं चित्रं शोधतो,” जवाहिरे सांगतात. किती चित्रं वापरायची असं काही ठरलेलं नसतं. “कारागिराच्या मनावर आहे,” ते म्हणतात. या फोटोंवर नंतर पारदर्शी रंगीत जिलेटिनचा कागद लावला जातो.
त्यानंतर बाकी चौकट देखील छापील रंगीत कागदाने सजवली जाते. ३३ बाय ४६ इंचाचा एक अख्खा कागद ३ रुपयाला पडतो. चांगल्या तोरणासाठी जवाहिरे वेलवेटचा कागद वापरतात. तोरणाच्या चौकटीला सगळ्यात खाली दोन कागदी राघू अडकवतात. आणि कामट्यांच्या प्रत्येक त्रिकोणाला सोनेरी कागद गुंडाळलेला एकेक नारळ आणि जिलेटिनच्या माळा लटकवल्या जातात.
“१० फुटाचं तोरण बनवायला ५ तास लागतात,” मुरलीधर सांगतात. पण आजकाल त्यांच्या कामाच्या वेळा काही निश्चित नाहीत. “आओ जाओ, घर तुम्हारा,” आपल्या मनाप्रमाणे वाटेल तेव्हा काम करायचं या अर्थाने ते म्हणतात.
वेळा नक्की नसल्या तरी कामातली अचूकता मात्र पक्की आहे. तासंतास मेहनत घेऊन तयार केलेल्या तोरणातलं काहीही वाया जात नसल्याचा त्यांना अभिमान आहे. “ही नवी तोरणं बघा, फक्त प्लास्टिक आणि इतर काय काय साहित्य वापरतायत. पर्यावरणासाठी सगळं घातक आहे.”
त्यांची तोरणं ३ ते १० फूट लांबीची असतात. लहान तोरणांना सगळ्यात जास्त मागणी असते. किंमत सुद्धा १३० रुपयांपासून १,२०० रुपयांपर्यंत असू शकते. ९० चं दशक सरता सरता हीच किंमत रु. ३० ते रु. ३०० इतकी खाली आली होती.
लग्नात नवरा नवरी घालतात ती नक्षीदार बाशिंगं देखील जवाहिरे तयार करतात. बाशिंग जत्रांमध्ये गावदेवाला देखील चढवलं जातं. कागदाच्या बाशिंगाची एक जोडी तयार करण्यासाठी त्यांना दीड तास लागतो आणि त्याचे १५० रुपये मिळतात. विक्री कशी होईल हे किती मागणी आहे आणि लग्नाचा किंवा जत्रांचा काळ आहे का त्यावर ठरतं. दर दिवाळीत जवाहिरे बांबूच्या कामट्या आणि जिलेटिनच्या कागदाचे आकाशकंदील देखील तयार करतात.
“लग्नाच्या विधीत लागतंय म्हणून बाशिंगाची मागणी काही कमी झालेली नाही,” जवाहिरे सांगतात. “तोरणं कसंय लोक दिवाळीला, लग्नाला किंवा घराची वास्तुशांत असेल तेव्हाच घेतात ना हो.”
जवाहिरे त्यांच्या या वस्तू व्यापाऱ्याला मात्र कधीच विकत नाहीत. त्यांना आपल्या कलेची कदर नाही असं त्यांचं मत आहे. “ते [तीन फुटी तोरणाला] फार तर ६० किंवा ७० रुपये देतात. त्यातून आम्हाला काहीच सुटत नाही आणि पैसे पण वेळेत देत नाहीत,” ते म्हणतात. आपल्या घरी येऊन थेट खरेदी करणाऱ्या गिऱ्हाइकांना तोरणं विकणंच त्यांना जास्त पसंत आहे.
बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकत्या तोरणांमुळे मात्र त्यांच्या कलेला घरघर लागली आहे. ही तोरणं स्वस्त आहेत, झटपट बनतात, ते म्हणतात. आता त्यांची महिन्याची कमाई कशीबशी ५,००० ते ६,००० रुपयांवर आली आहे. कोविड-१९ ची महासाथ आणि टाळेबंदीमुळे या संकटात भरच पडली आहे. “कित्येक महिने मला एकही ऑर्डर आलेली नाही. गेल्या वर्षींच्या टाळेबंदीत पाच महिने कुणीदेखील तोरण विकत घ्यायला घरी आलं नाही,” ते सांगतात.
१९९४ सालच्या प्लेगमध्ये आपलं सगळं कुटुंब घर सोडून बाहेर मुक्कामी गेल्याचं त्यांना आठवतं. “आम्ही त्या महामारीच्या काळात शेतात रहायला गेलो होतो आणि आता या करोनामध्ये सगळ्यांना घराच्या आत रहायला सांगतायत. काळ कसा बदलतो बघा,” ते म्हणतात.
काळ खरंच बदललाय. जवाहिरे हे कौशल्याचं काम त्यांच्या वडलांचं पाहून शिकले. पण त्यांच्या मुलांना मात्र ही नक्षीदार तोरणं बनवण्यात बिलकुल रस नाही. “त्यांनी खळीत बोटसुद्धा बुडविलं नाही,” ते म्हणतात. “ही कला त्यांना काय समजावी?” त्यांचा मुलगा, योगेश, वय ३६ आणि महेश, वय ३४ लेथ यंत्रावर कामगार म्हणून काम करतात. मुलगी योगिता, वय ३२ गृहिणी आहे.
गेली साठ वर्षं अनेकांचे दरवाजे त्यांच्या तोरणांनी सजले, अनेकांच्या लग्नात त्यांनी बनवलेली बाशिंगं कपाळावर बांधली गेली, पण आता मात्र त्यांची ही कला पुढे नेणारं कुणीही नाही. “आम्हीच आता भंगारात गेलोय,” कसनुसं हसून ते सांगतात.