ती नेहमीसारखी इतर आदिवासी स्त्रियांबरोबर रानात काम करत होती. इतक्यात तिच्या सलिहा गावचा एक तरुण धावत आला, ओरडला, “त्यांनी गावावर हल्ला केलाय. तुझ्या वडलांना मारलंय, त्यांनी आपली घरं पेटवून दिलीयेत.”
‘ते’ म्हणजे शस्त्रधारी इंग्रज पोलिस. इंग्रज राजवटीला जुमानत नाही म्हणून अखख्या सलिहा गावावर त्यांनी हल्ला केला होता. इतरही काही गावं बेचिराख केली होती, जाळपोळ करून धान्य लुटून नेलं होतं. बंडखोरांना त्यांची पायरी दाखवायसाठीचा हा सगळा खेळ होता.
हे ऐकताच देमती देई शबर, शबर जमातीची एक आदिवासी स्त्री इतर ४० तरुण स्त्रियांना घेऊन सलिहाच्या दिशेने धावली. “माझे वडील जमिनीवर पडले होते, त्यांच्या पायाला गोळी लागली होती, रक्त भळाभळा वाहत होतं”, म्हातारी देमती देई सांगते.
एरवी फारसं नसणारं तिचं भान या आठवणीनं लख्ख जागं होतं. “मला राग अनावर झाला आणि मी त्या बंदुकधारी पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्या काळी रानात किंवा जंगलात जाताना आमच्याकडे सगळ्यांकडे लाठ्या असायच्या. जंगलात कोणताही प्राणी आडवा आला तर हातात काही नको?”
तिने केलेला हल्ला पाहिला आणि बाकीच्या ४० जणींनी आपापल्या हातातल्या काठ्या इतर पोलिसांवर उगारल्या. “त्या नालायकाला हाकलून लावलं मी. असा मारला, असा मारला, पळणं सोडून त्याला दुसरं काही सुचलंच नाही. ढुंगणाला पाय लावून पळाला” संतापाची किनार होती तरी खुदखुदत ती आठवण देमती देई सांगते. अख्ख्या गावभर त्याला मारत मारत पळवलं तिनं. नंतर वडलांना तिकडून दुसरीकडे नेलं. पुढे दुसऱ्या एका उठावाच्या वेळी मात्र त्यांना अटक झाली. त्या भागात इंग्रजांविरोधात उठाव करण्यात कार्तिक सबर अग्रणी होते.



