उन्हाच्या तलखीचा कसलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही. किमान पन्नास वर्षांपूर्वी स्वतःच निर्माण केलेल्या या कोल्हापुरातल्या बंधाऱ्यावरच्या लहानशा पुलावर ते निश्चल बसले आहेत. थोड्या वेळापूर्वीच जेवताना आम्ही त्यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची ते निवांतपणे उत्तरं देतायत. अगद उत्साहात झटपट चालत ते आमच्याबरोबर पुलावरून फेरफटका मारतात आणि १९५९ साली तयार झालेल्या या बंधाऱ्याचं काम कसं चालतं ते आम्हाला समजावून सांगतात.
साठ वर्षं उलटलीत. गणपती ईश्वरा पाटील यांची सिंचन विषयावरची पकड आणि शेतकरी आणि शेतीची समज तसूभरही कमी झालेली नाही. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास माहितीये – ते स्वतः त्यात सामील होते. आज त्यांचं वय १०१ वर्षं आहे आणि भारतातल्या हयात असलेल्या काही अखेरच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी ते एक आहेत.
“मी फक्त एक निरोप्या होतो,” १९३० पासून आजवरच्या आपल्या आयुष्याबाबत विलक्षण विनम्रतेने आणि साधेपणाने ते सांगतात. “इंग्रजांच्या विरोधात सुरू असणाऱ्या भूमिगत कारवायांचा एक निरोप्या.” बंदी घातलेले साम्यवादी क्रांतीकारी गट, समाजवाद – आणि काँग्रेस पक्षाचा (१९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी) यात समावेश होता. आणि त्यांच्या कामात ते नक्कीच माहीर असणार – कारण ते एकदाही पकडले गेलेले नाहीत. “मी तुरुंगात काही गेलो नाही,” ते म्हणतात, जवळ जवळ खेदानेच. आम्हाला इतरांकडूनच कळतं की १९७२ नंतर सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांना देण्यात येणारं ताम्रपत्र किंवा पेन्शनही त्यांनी स्वीकारलं नाहीये.
‘मी तुरुंगात काही गेलो नाही,’ गणपती पाटील म्हणतात, जवळ जवळ खेदानेच. आम्हाला इतरांकडूनच कळतं की १९७२ नंतर सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांना देण्यात येणारं ताम्रपत्र किंवा पेन्शनही त्यांनी स्वीकारलं नाहीये
सिद्धनेर्लीच्या त्यांच्या मुलाच्या घरी आम्ही जेव्हा त्याविषयी विचारलं तेव्हा ते म्हणतात, “कसं करावं तसं? आमचं पोट भरायला आमच्यापाशी जमिनी होत्या ना.” त्या काळी त्यांच्या मालकीची १८ एकर जमीन होती. “त्यामुळे मी काही मागितलं नाही, अर्ज केला नाही.” डाव्या चळवळीतल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांकडून जे ऐकायला मिळतं तेच ते म्हणतातः “आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढलो, आम्हाला पेन्शन मिळावं म्हणून नाही.” आपला हातभार थोडा होता हे ते वदवून सांगतात – खरं तर जहाल क्रांतीकारी भूमिगत चळवळीमध्ये निरोप्याचं काम चांगलंच धोक्याचं होतं, खासकरून युद्धाच्या काळात जेव्हा वसाहतवादी सत्ता क्रांतीकारकांना मागचा-पुढचा विचार न करता फासावर चढवत होत्या.
कदाचित हे धोके माहित नसल्यामुळेच त्यांच्या आईने हे निरोप्याचं काम मान्य केलं असावं – चार लोकांत असं काही काम करताना दिसला नाही म्हणजे झालं. कागल तालुक्यातल्या सिद्धनेर्लीला आपल्या वडलांच्या घरी रहायला आल्यावर त्यांची आई वगळता सगळं कुटुंब प्लेगच्या साथीत मरण पावलं. त्या वेळी, २७ मे, १९१८ रोजी आपल्या आजोळी कर्नूरमध्ये जन्मलेले गणपती पाटील फक्त “साडेचार महिन्यांचे” होते.
त्यांच्या वडलोपार्जित कुटुंबाचे ते एकटे वारस झाले आणि – त्यांच्या आईच्या मते – त्यांनी कोणत्याही कारणासाठी आपला जीव धोक्यात घालून चालणार नव्हतं. “जेव्हा मी खुल्याने कार्यक्रमात भाग घ्यायला लागलो, मोर्चे काढायला लागलो [१९४५ च्या सुमारास] तेव्हा कुठे लोकांना मी राजकारणात काही तरी करतोय ते कळायला लागलं.” १९३० आणि १९४० च्या दशकात ते आपल्या सिद्धनेर्लीच्या रानात गपचूप कार्यकर्त्यांच्या मिटिंगा घ्यायचे. “मी आणि माझी आई, घरात आम्ही दोघंच – बाकी सगळे वारलेले – त्यामुळे लोकांना पण आमच्याबद्दल कळवळा होता, त्यांना माझी काळजी असायची.”
त्यांच्या काळातल्या इतर लाखो लोकांप्रमाणे या सगळ्याची सुरुवात झाली जेव्हा वयाच्या १२ व्या वर्षी त्यांची गाठ तेव्हा त्यांच्याहून पाचपट वयाच्या एका व्यक्तीशी पडली. पाटील सिद्धनेर्लीहून २८ किलोमीटर चालत सध्या कर्नाटकात असलेल्या निपाणीला चालत गेले – केवळ मोहनदास करमचंद गांधींचं भाषण ऐकायला. आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कार्यक्रम संपला तेव्हा लहानग्या गणपतीने गर्दीतून वाट काढत मंचावर जाऊन “महात्म्याच्या अंगाला स्पर्श केला त्याचा मला आनंद झाला.”
पण त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी मात्र १९४१ उजाडलं. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात होत होती. इतर राजकीय शक्तींसोबतही त्यांच्या कारवाया सुरूच होत्या. १९३० साली ते जेव्हा निपाणीला गेले तेव्हापासून, काँग्रेसमध्ये प्रवेश घेईपर्यंत पक्षातल्या समाजवादी गटाशी त्यांचे संबंध होते. १९३७ साली त्यांनी बेळगावमधल्या अप्पाची वाडी इथे एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी आयोजित केलेल्या एका शिबिरात भाग घेतला होता. भविष्यातले साताऱ्याचे प्रति सरकार नागनाथ नायकवडी यांनीही शिबिरात आलेल्यांना मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यांनाच, गणपती पाटलांसकट, थोडं फार शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण मिळालं होतं.
१९४२ मध्ये, ते सांगतातः “भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकलेले नेते जसं संतराम पाटील, यशवंत चव्हाण [काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण नव्हेत], एस. के. लिमये, डी. एस. कुलकर्णी आणि इतर कार्यकर्त्यांनी मिळून नवजीवन संघटना स्थापन केली.” गणपती पाटील त्यांना सामील झाले.
त्या वेळी त्यांनी वेगळा पक्ष काढला नव्हता, मात्र त्यांच्या गटाला लोक लाल निशाण म्हणून ओळखू लागले. (१९६५ मध्ये राजकीय पक्ष म्हणून त्यांचा उदय झाला. १९९० मध्ये त्यांच्यात फूट पडली.)
स्वातंत्र्याआधीच्या या उलथापालथीच्या काळात गणपती पाटील सांगतात की “माझं काम म्हणजे आमच्या वेगवेगळ्या गटांना आणि कार्यकर्त्यांना निरोप पोचवायचं, कागदपत्रं, माहिती पोचवायची.” त्या सगळ्या कामात काही विशेष असल्याचं ते नम्रपणे नाकारतात आणि सांगत राहतात की त्यांचं काम काही फार महत्त्वाचं, केंद्रस्थानी नव्हतं. मात्र दुपारी जेवणाच्या वेळी कुणी तरी सांगतं की वयाच्या १२ व्या वर्षी जेव्हा त्यांनी निपाणीचा येऊन जाऊन ५६ किलोमीटरचा प्रवास केला तेव्हा निरोप्याचं काम हा मुलगा करू शकतो हे कुणी तरी हेरलं असणार, तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं (ते सुखावतात).
“स्वातंत्र्यानंतर,” पाटील सांगतात, “लाल निशाण पक्षाने शेतकरी कामगार पक्षाशी हातमिळवणी केली आणि कामगार किसान पार्टीची स्थापना केली.” या पक्षात फूट पडली आणि क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश घेतला. शेकापची फेरबांधणी झाली आणि लाल निशाण पक्षाची देखील परत जुळणी झाली. २०१८ साली लाल निशाणच्या ज्या गटाशी गणपती पाटलांचे संबंध होते तो भाकपमध्ये सामील झाला.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही चळवळींमध्ये पाटलांचं योगदान – जसं की कोल्हापुरातील भू सुधार कार्यक्रम – केंद्रस्थानी होतं. ते स्वतः जमीनदार असूनही त्यांनी शेतजमुरांना रास्त मजुरी मिळावी यासाठी संघर्ष केला आणि इतर शेतकऱ्यांनाही तशी मजुरी द्यायला प्रवृत्त केलं. त्यांनी सिंचनासाठी ‘कोल्हापूर पद्धतीचा बंधारा’ तयार केला – तशा पद्धतीचा पहिला बंधारा (ज्याच्यावर आम्ही बसलोय) आजही १०-१२ गावांना पाणी पुरवतोय आणि त्याचं व्यवस्थापन स्थानिक शेतकऱ्यांच्या हातात आहे.
“आम्ही जवळच्या २० गावातल्या शेतकऱ्यांना संघटित केलं आणि सहकारी पद्धतीने हा बांधला,” पाटील सांगतात. दूधगंगा नदीवरच्या या दगडी बंधाऱ्यामुळे ४,००० एकराहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आलं आहे. आणि, ते अभिमानाने सांगतात, त्यापायी कुणाला विस्थापित व्हावं लागलं नाही. आज या बंधाऱ्याची गणना राज्यस्तरीय मध्यम प्रकल्पात केली जाईल.
“अशा प्रकारचा बंधारा नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बांधला जातो,” अजित पाटील सांगतात. कोल्हापूरला अभियंता असणारे अजित, गणपती पाटलांचे जुने सहकारी (लाल निशाण पक्षाचे सह-संस्थापक) दिवंगत संतराम पाटील यांचे सुपुत्र. “यामध्ये बुडिताखाली जमिनी जात नाहीत, आणि नदीचा प्रवाह बेमाप अडवला जात नाही. वर्षभर पाणी साठून राहतं त्यामुळे भूजलात पात्राच्या दोन्ही बाजूस वाढ होते आणि थेट लाभ क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या विहिरींची देखील सिंचन क्षमता त्यामुळे वाढते. हा कमी खर्चात होतो, गावातल्या गावात त्याची देखभाल करता येते आणि पर्यावरणाला काही हानी पोचत नाही.”
आणि आम्ही हे पाहतच होतो, मे महिन्यात भर उन्हाळ्यात बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणी होतं आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडले जात होते. बंधाऱ्याच्या जलाशयामध्ये थोड्या फार प्रमाणात मत्स्यशेती देखील केली जात होती.
“आम्ही १९५९ साली हा बांधला,” गणपती पाटील सांगतात, अभिमानाने पण निर्लेपपणे. आम्ही विचारलं नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलंही नाही की बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा होईल अशी कित्येक एकर जमीन ते तेव्हा खंडाने कसत होते मात्र त्यांनी सरळ तो करार थांबवला आणि मालकाला जमीन परत देऊ केली. “हे काम मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी केलंय असं लोकाला वाटू नये” हे त्यांच्यासाठी हे फार मोलाचं होतं. ती पारदर्शकता आणि कोणतेही हितसंबंध ठेवले नसल्याने इतर शेतकऱ्यांना या सहकारी चळवळीसाठी संघटित करणं त्यांना सोपं गेलं. त्यांनी बँकेकडून १ लाखाचं कर्ज घेऊन बंधारा बांधला, रु. ७५,००० इतका खर्च आला – आणि उरलेले रु. २५,००० लागलीच परत करून टाकले. कराराप्रमाणे बँकेचं कर्ज तीन वर्षात फेडून टाकलं. (आज या स्तरावरच्या कोणत्याही प्रकल्पाचा खर्च ३-४ कोटींच्या घरात जाईल त्यानंतर तो अनेकदा फुगवला जाईल – आणि कर्जाची फेड अर्धवटच राहील).
तर, दिवसभर हा स्वातंत्र्य सेनानी नेता आमच्या सोबत हिंडत होता, मे महिन्यातल्या भर माध्यान्ही, उन्हाच्या कारात. पण थकव्याचा मागमूस नाही. आम्हाला त्यांनी हौसेने सगळीकडे हिंडवून आणलं, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अखेर, आम्ही पुलावरून उठलो आणि आमच्या वाहनाच्या दिशेने निघालो. त्यांच्याकडे आर्मीच्या जादा कोट्यातली जीप होती – त्यांच्या नातवाने किंवा भाच्याच्या मुलाने दिलेली. गंमत म्हणजे पुढच्या टपावर इंग्लंडचा झेंडा रंगवलाय आणि बॉनेटच्या दोन्ही बाजूला ‘USA C 928635’ असं छापलेलं आहे. पिढ्यांमधली तफावत ती ही अशी.
या जीपचं चाक ज्याच्या हाती आहे त्याने मात्र अख्खी जिंदगी खांद्यावर वेगळाच झेंडा घेतलाय. अगदी आजही.
अनुवादः मेधा काळे