पावसाळा ओसरत आलाय. बडगाव खुर्द गावातल्या स्त्रिया आसपासच्या शेतांमधून आपल्या मातीच्या घराला लिपारा करण्यासाठी ओली माती आणतायत. भिंती मजबूत करण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठीही हे अधून मधून केलं जातं, खास करून सणसमारंभाआधी.
२२ वर्षांच्या लीलावती देवीलाही इतर बायांसोबत माती आणण्यासाठी जायचं होतं. पण तिचा तीन महिन्यांचा तान्हा मुलगा रडत होता आणि झोपीच जात नव्हता. तिचा नवरा २४ वर्षांचा अजय ओराउँ जवळच्याच त्याच्या किराणा दुकानात गेला होता. ती बाळाला कुशीत घेऊन होती आणि थोड्या थोड्या वेळाने त्याच्या कपाळावर तळवा ठेवत होती, ताप पाहिल्यासारखा. “त्याला काही झालं नाहीये, मला तरी तसं वाटतंय,” ती म्हणते.
२०१८ साली लीलावतीच्या मुलीला ताप आला आणि त्यातच ती वारली. “फक्त दोन दिवस ताप आला होता, जास्त पण नव्हता,” लीलावती सांगते. आपली मुलगी कशाने गेली हे याहून जास्त काही त्यांना माहित नाही. दवाखान्याच्या नोंदी नाहीत, औषधं लिहून दिलेल्या चिठ्ठ्या नाहीत, औषधं देखील नाहीत. अजून काही दिवस ताप उतरला नाही तर या दोघांनी तिला त्यांच्या गावाहून ९ किलोमीटरवर असलेल्या कैमूर जिल्ह्यातल्या अधौरा तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जायचं ठरवलं होतं. पण तसं काहीच झालं नाही.
कैमूर अभयारण्याला अगदी लागून असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाराला कुंपणाची भिंत नाही. बडगाव खुर्द आणि शेजारच्याच बडगाव कालनमधले रहिवासी (दोन्ही गावांसाठी हेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे) आवारात येणाऱ्या जंगली जनावरांच्या – अस्वलं, बिबटे आणि नीलगाय – गोष्टी सांगतात. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अगदी आरोग्य कर्मचारी देखील इथे काम करायला त्यामुळे जरा नाखुशच असतात.
“इथे [बडगाव खुर्दमध्ये] उपकेंद्र देखील आहे, पण ती इमारत तशीच पडून आहे. शेरडं आणि इतर प्राण्यांचं घर झालंय ते,” फुलवासी देवी सांगतात. २०१४ पासून त्या आशा म्हणून काम करतायत – त्यांच्याच फूटपट्टीप्रमाणे फार काही यश येत नसलं तरीही.






