“आम्ही शेठकडून १००० रुपये उसने घेतलेत, इथे यायला. त्या बदल्यात आम्ही त्यांच्या शेतात ४-५ दिवस काम करू,” ४५ वर्षांच्या विजयाबाई गांगुर्डे सांगतात. त्या २३ जानेवारी रोजी दुपारी नाशिकला आल्या. मुंबईला निघणाऱ्या जत्थ्यात सहभागी होण्यासाठी शहरातल्या गोल्फ क्लब मैदानात येणाऱ्या वाहनांपैकी अगदी सुरुवातीला पोचलेल्या एका निळ्या आणि नारिंगी रंगात रंगवलेल्या टेम्पोने त्या इथे पोचल्या.
विजयाबाईंच्या ४१ वर्षांची बहीण, जाराबाई जाधव देखील नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडीहून त्यांच्यासोबत आल्या आहेत. २००-२५० रुपये मजुरीवर त्या दोघीही शेतमजुरी करतात.
या दोघी बहिणी नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी इथून १८० किलोमीटरवर मुंबईच्या आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इथे आल्या आहेत. मुख्यतः नांदेड, नंदुरबार, नाशिक आणि पालघरचे सुमारे १५,००० शेतकरी इथे जमले आहेत. “आम्ही आमच्या उपजीविकेसाठी मोर्चा काढतोय,” ताराबाई सांगतात.
दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी २५-२६ जानेवारी रोजी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने मुंबईत धरणे आंदोलन आणि राज्यपालांचं निवास स्थान असणाऱ्या राजभवनावर मोर्चा असं आंदोलन आयोजित केलं आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांमधून शेतकरी मुंबईतल्या या आंदोलनासाठी जमले आहेत.









