जुलैच्या मध्यावर असंच एकदा, कोलियारी-खरेंगा गावच्या रस्त्यावर, घमतरीहून सुमारे १५ किलोमीटरवर, आम्ही शेतमजुरांच्या आणखी एका टोळीला भेटलो. “आम्ही काम केलं नाही, तर आम्ही उपाशी मरू. [कोविड-१९ चा धोका आहे म्हणून] घरीच बसून राहण्याची चैन आम्हाला परवडण्यासारखी नाही,” धमतरी तालुक्यातल्या खरेंगा गावची भुखीन साहू सांगते. २४ जणांच्या टोळीची ती प्रमुख, ठेकेदारीण आहे. “आम्ही कष्टकरी आहोत. आमच्यापाशी केवळ हात आणि पाय आहेत. पण काम करताना आम्ही एकमेकांत अंतर ठेवतोय...”
ती आणि इतर सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसल्या होत्या. घरनं आणलेला डाळ-भात आणि भाजी असं जेवण सुरू होतं. त्या पहाटे ४ वाजता उठतात, स्वयंपाक करतात, घरची काम उरकतात, सकाळची न्याहरी करून ६ वाजेपर्यंत शेतात पोचतात. १२ तासांनी, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्या घरी परततात. त्यानंतर परत स्वयंपाक आणि इतर कामं, भुखीन तिच्या आणि इतर बायांच्या दिनक्रमाबद्दल सांगते.
“आम्ही रोज दोन एकर भातलावणी करतो आम्हाला एकरी ३,५०० रुपये मिळतात,” भुखिन सांगते. एकरी किती मजुरी मिळते त्याचा दर ३,५०० ते ४,००० (धमतरीमध्ये यंदाच्या हंगामात) असा असतो. अर्थात टोळीत किती जण आणि त्या कशा प्रकारे वाटाघाटी करतात त्यावरही ही रक्कम ठरते.
भुखीनचा नवरा काही वर्षांपूर्वी भोपाळला मजुरीसाठी म्हणून गेला तो परतलाच नाही. “तो आम्हाला इथे गावी सोडून गेला. त्याचा आमच्याशी काहीच संपर्क नाहीये,” ती सांगते. तिचा मोठा मुलगा कॉलेजला आहे आणि त्या दोघांचं पोट भरण्याचा एकमेव स्रोत म्हणजे भुखिनची मजुरी.
त्याच मार्गावर आम्हाला मजुरांची आणखी एक टोळी भेटली. बहुतेक बायाच, काही गडी. खाचरात लावण करायला भाताची रोपं घेऊन निघाले होते. “यातनंच आमचं पोट भरतंय. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागतं. आम्हीच काम केलं नाही तर पिकवणार कोण? प्रत्येकाच्याच पोटाला खाणं पाहिजे ना,” सबिता साहू म्हणते. धमतरी तालुक्याच्या दर्री गावातली ती ठेकेदारीण आहे. “आम्ही करोनाला घाबरून बसलो तर आम्हाला कामच करता येणार नाही. मग आमच्या लेकरांना खायला कोण घालील? तसंही आमचं कामच असं असतं की [भाताच्या खाचरात] एकमेकांपासून अंतर राहतंच.” मी त्यांना भेटलो तेव्हा जुलैच्या मध्य उजाडला होता. सबिता आणि तिच्या टोळीतल्या ३० जणांनी २५ एकरात भातलावणी केली होती. एकरी ३,६०० रुपये मजुरीवर.