दर वर्षी लक्ष्मीबाई काळेंचं थोडं तरी पीक हातचं जातंच. अतिवृष्टी, दुष्काळ, किंवा शेतीच्या अगदी प्राथमिक तंत्रामुळे नाही काही. “आमच्या पिकाची नासधूस होते,” साठीच्या लक्ष्मीबाई सांगतात, “कारण पंचायतीचे लोक गुरं आमच्या रानात चरायला सोडू देतात. किती नुकसान झालं त्याची मोजदाद करायचं आता सोडून दिलंय मी.”
लक्ष्मीबाई आणि त्यांचेपती वामन कसतात ती नाशिक जिल्ह्याच्या मोहाडी गावातली पाच एकर जमीन गायरानाचा भाग आहे – जनावरांना चरण्यासाठीच्या या जमिनी शासनाच्या अखत्यारीत येतात. या जमिनीत ते तूर, बाजरी, ज्वारी आणि साळी करतात. “आम्ही जर गावातल्या जनावरांना इथे चरायला मनाई केली तर आमच्या विरुद्ध केस करतील असं पंचायतीचे लोक म्हणतात,” त्या सांगतात.
लक्ष्मीबाई आणि दिंडोरी तालुक्यातल्या त्यांच्या या गावातले इतरही शेतकरी १९९२ पासून त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी लढत आहेत. “ही जमीन कसणारी आमची ही तिसरी पिढी आहे, तरीही अजून जमीन आमच्या नावावर झालेली नाही,” त्या म्हणतात. “२००२ साली आमच्या जमिनीच्या हक्कासाठी आम्ही सत्याग्रह केला, जेल भरो आंदोलन केलं.” त्यांना आठवतंय की जवळपास १५०० शेतकरी, ज्यात बहुसंख्य बाया होत्या, १७ दिवस नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात होत्या.
जमिनीची मालकी नाही त्यामुळे लक्ष्मीबाईंना पिकाच्या नुकसानीसाठी कसलीही भरपाई मिळत नाही. त्या लोहार जातीच्या आहेत, आणि महाराष्ट्रात त्यांची नोंद इतर मागासवर्गीय प्रवर्गात होते. “आमची जमीन आमच्या नावावर नाही, त्यामुळे पीक विमा किंवा कर्ज मिळत नाही,” त्या सांगतात. मग हे नुकसान भरून काढण्यासाठी त्या शेतमजूर म्हणून काम करतात. कधी कधी तर एका दिवसात आठ तासाच्या दोन पाळ्या करून त्या वरचा थोडा पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात.
५५ वर्षांच्या विजयाबाई गांगुर्डे भिल्ल आदिवासी आहेत आणि विधवा आहेत. त्यांची परिस्थितीही वेगळी नाही. मोहाडीतल्या आपल्या जमिनीतून निघणाऱ्या उत्पन्नावर भागणं शक्य नाही. “दिवसाचे आठ तास मी माझ्या दोन एकर रानात राबते. त्यानंतर आठ तास [दुसऱ्याच्या रानात] मजुरीला जाते,” विजयाबाई सांगतात. सकाळी सात वाजता सुरू होणार दिवस असा दोन पाळ्यांत विभागलेला असतो.
“पण सावकाराकडून काही मी कर्ज घेतलेलं नाही,” त्या सांगतात. “सावकार शेकडा १० रुपये व्याज लावतो आणि त्याची फेड महिन्याच्या शेवटपर्यंत करावी लागते.” लक्ष्मीबाई सुद्धा कर्ज देणाऱ्यांपासून चार हात लांबच राहतात. “आमच्या आजूबाजूच्या गावात या सावकारांनी विधवा बायांचा फार छळ केलाय,” त्या म्हणतात.








