मीनाचं लग्न आता कधी पण होऊ शकेल. कारण काय तर तिच्याच शब्दात सांगायचं तर काही महिन्यांपूर्वीच “मी समस्या झालीये.” मीनानंतर काही आठवड्यांनी समस्या हा किताब मिळवणारी सोनू देखील लग्नाच्या रांगेत आहे. मुलींची पाळी सुरू झाली की त्या ‘समस्या’ होतात.
१४ वर्षांची मीना आणि १३ वर्षांची सोनू बाजेवर एकमेकींच्या शेजारी बसून बोलतायत. बोलताना त्या एकमेकींकडे पाहतात पण बहुतेक वेळा त्यांची नजर मीनाच्या घरातल्या मातीच्या जमिनीवर लागलेली असते. माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीशी या बदलाबद्दल म्हणजेच पाळीबद्दल बोलायला त्यांना लाज वाटतीये. त्यांच्या मागच्या खोलीत एक करडू खुंटीला बांधून घातलंय. बैथकवाच्या आसपास फिरणाऱ्या वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे त्याला मोकळं सोडता येत नाही. उत्तर प्रदेशच्या कोराँव तालुक्यातली ही एक वस्ती आहे. त्यामुळे त्याचा मुक्काम घरातच असल्याचं त्या सांगतात. मीनाचं हे लहानसं घर इतर घरांच्या दाटीवाटीत आहे.
या मुलींना पाळी म्हणजे काय ते आता आता उमजू लागलंय. पाळी म्हणजे ज्याची लाज वाटावी असं काही तरी हे त्या जाणतात. आणि एक प्रकारची भीती देखील जी त्यांना त्यांच्या आईवडलांकडून जन्मतःच मिळाली आहे. एकदा का मुलगी शहाणी झाली की लग्नाआधी तिला दिवस जाण्याची भीती आणि मुली व स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयीची चिंता यामुळे प्रयागराज (पूर्वीचं अहालाबाद) जिल्ह्यातल्या या वस्तीवर मुलींची लवकर लग्नं लावून दिली जातात. काही वेळा तर अगदी १२व्या वर्षी देखील.
“एकदा का आमच्या मुली मोठ्या झाल्या, दिवस जायच्या वयात आल्या की आम्ही त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं?” मीनाची आई, २७ वर्षीय राणी विचारते. तिचं स्वतःचं लग्न १५ व्या वर्षी झालंय. सोनूची आई चंपा आता अंदाजे २७ वर्षांची असेल तिचं लग्न वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे सोनूचं वय आता जेवढं आहे त्या वयात झालंय. तिथे जमा झालेल्या सहाही स्त्रियांचं म्हणणं हेच होतं की १३ व्या किंवा १४ व्या वर्षी लग्न करणं हीच रीत आहे. त्यात वावगं असं काहीच नाही. “हमारा गांव एक दूसरा जमाना में रहता है. आमच्या हातात काहीही नाही. आम्ही काहीच करू शकत नाही,” राणी म्हणते.
देशाच्या मध्य आणि उत्तर भागातल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आयसीआरडब्ल्यू (इंटरनॅशनल सेंटर फॉर रीसर्च ऑन विमेन) व युनिसेफ यांनी २०१५ साली केलेल्या जिल्हास्तरीय संयुक्त अभ्यासानुसार “या राज्यातल्या दोन तृतीयांशाहून अधिक जिल्ह्यांमधल्या ५० टक्क्यांहून अधिक स्त्रियांचा विवाह कायद्याने मान्य वयाच्या आधी झाला आहे.”
बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ नुसार मुलीचा विवाह १८ वर्षांअगोदर आणि मुलाचा विवाह २१ वर्षांअगोदर करण्यास बंदी आहे. अशा पद्धतीने लग्न लावल्यास किंवा त्याला मदत केल्यास दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि रु. १ लाखापर्यंत दंड होऊ शकतो.












