त्या रात्री डोंगराचा अख्खा कडाच खाली कोसळला.
रात्रीचे ११ वाजले होते. अंकिता बाकडे झोपल्या होत्या. त्यांच्या १७ जणांच्या एकत्र कुटुंबाची शेजारीच ४-५ घरं आहेत. सगळे जण झोपी गेलेले होते. “जोरात काही तरी कोसळल्याचा आवाज आला आणि आम्हाला जाग आली. काय झालं ते लगेचच आमच्या लक्षात आलं,” त्या सांगतात. “आम्ही अंधारातच घराबाहेर पळ काढला. तोपर्यंत आमच्या शेजारची घरं पडली होती.”
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात, सह्याद्रीच्या रांगामधलं मिरगाव हे अंकितांचं गाव. त्या दिवशी डोंगर खचला त्यात त्यांचं घर वाचलं पण त्यांच्या एकत्र कुटुंबातले ११ जण २२ जुलैच्या रात्री गतप्राण झाले. गेलेल्यांमधला सगळ्यात लहान युवराज सात वर्षांचा होता आणि यशोदा बाकडे ८० वर्षांच्या.
दुसऱ्या दिवशी आपत्ती सुरक्षा दलाचे लोक त्यांची सुटका करण्यासाठी आले. दुपारपर्यंत अनिता आणि त्यांच्या गावातल्या इतरांना इथून सहा किलोमीटरवर असलेल्या कोयनानगरच्या जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आलं होतं. कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्पापासून मिरगाव फक्त पाच किलोमीटर लांब आहे.










