आई वऱ्हांड्यातल्या तुळशीजवळ रोज एक लहानसा दिवा लावते. मला आठवतं तेंव्हापासून ती रोज संध्याकाळी हे करत आलीये. आता वयाची सत्तरी ओलांडली असल्याने पार्किन्सनच्या आजाराने तिचे हातपाय थरथरतात, मन भ्रमिष्ट झालंय, तिला वाटतं तिचा दिवा अंधारला आहे. इमारतीतील इतर वऱ्हांड्यांमध्ये दिवाळी असल्यागत दिवे लागलेत. आज दिवाळी तर नाही? तिला वाटून जातं. तिच्या स्मृतीवर आता भरवसा ठेवता येत नाही. पण आता सगळं परत अंधारून आलंय, पूर्वीपेक्षा जास्त. तिला ओळखीचे वाटणारे मंत्रोच्चार ऐकू येतात; काही गायत्री मंत्रासारखे वाटतात. की हनुमान चालीसा? आत्ता कोणी 'पाकिस्तान मुर्दाबाद' म्हणालं का?
निस्तेज आभाळाकडे पाहून तिचा थरकाप उडतो. अचानक तिच्या डोक्यात आवाज घुमू लागतात आणि तिला वेडावून सोडतात. विटाळलेल्या ब्रेड विकणाऱ्या मुस्लिम बेकरीवाल्यांविरुद्ध बजावणारे आवाज. आजार पसरावा म्हणून भाज्यांना थुंकी लावणाऱ्या मुस्लिम भाजीवाल्यांचा निषेध करायला सांगणारे आवाज. एकतेचे दिवे लावायला सांगणारे आवाज. अथांग रस्त्यांवर भुकेने गुरगुरणाऱ्या पोटांचे आवाज. प्रेम आणि करुणेचा पाठ देणाऱ्या ग्रंथांचे पुसटसे आवाज. तिचा दिवा विझवू पाहणाऱ्या अंधाऱ्या वाऱ्याचा आवाज. तिला ग्लानी येतेय, तिला आपल्या पलंगावर जाऊन झोपावंसं वाटतंय, पण परत जायला फार अंधारून आलंय. आपल्या थरथरत्या बोटांनी आपला दिवा ती परत एकदा लावू पाहते ....
अंधारलेला दिवा
मी एक दिवा लावला
तर किती अंधारून आलं
आतापर्यंत लपून बसलेला
गुपचूप एका कोपऱ्यात
आणि आता कसा करतोय तांडव
डोळ्यापुढे नाचतोय अंधार !
दाबून दडपून ठेवला होता
अगदी खालच्या तळाशी
डोकं वर काढू नये म्हणून ठेवलं
शरमेचं भारी वजन त्याच्या माथी
तोंडांतही कोंबला होता
एक जाडसर बोळा
दरवाजा उघडू नये म्हणून
आठवणीने केला होता बंद
तरी कशी काय तोडून मर्यादा
फिरतोय खुलेआम
हा निर्लज्ज अंधार?
इवल्या इवल्या लवलवत्या
झुकून पाहतो पणत्या
प्रेमज्योतीला घुसून करतो
मलीन, काळी, लाल,
विषारी, रक्तरंजित.
जी कधी होती
पिवळी, प्रेमळ आणि उजळ
कोणी काढला डोक्यावरचा दगड?
कोणी काढला तोंडातला बोळा?
कोणी केली ह्याची जीभ सैल?
कोणास ठाऊक दिवा लावून
पसरेल सर्वत्र अंधार?
ध्वनी: सुधन्वा देशपांडे हे जन नाट्य मंचाशी निगडित अभिनेता व दिग्दर्शक आहेत आणि लेफ्टवर्ड बुक्स मध्ये संपादक आहेत.
फोटो: राहुल एम.
अनुवाद: कौशल काळू