“एमएसपी जाणार आणि हळूहळू ते बाजारसमित्या बंद करतील आणि आता तर विजेचंही खाजगीकरण सुरू आहे. आमच्या चिंता वाढणार नाही तर काय?” कर्नाटकाच्या शिवमोग्गा जिल्ह्यातले शेतकरी डी. मल्लिकार्जुनप्पा म्हणतात. चिंता त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेली आहे.
एकसष्ट वर्षीय मल्लिकार्जुनप्पा हुळुगिनकोप्पाहून २५ जानेवारी रोजी बंगळुरुला आले होते. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर मोर्चात भाग घेण्यासाठी. शिकारपूर तालुक्यातल्या आपल्या गावाहून त्यांनी ३५० किलोमीटरचा प्रवास केला होता. “बड्या कंपन्यांचं ऐकत बसण्यापेक्षा त्यांनी [केंद्र सरकार] बाजारसमित्यांमध्ये सुधार करायला पाहिजेत जेणेकरून आम्हाला योग्य भाव मिळेल,” ते म्हणतात.
नव्या कृषी कायद्यांनी त्यांच्या चिंतेत भरच पडलीये – किमान हमीभाव आणि जिथे धान्याच्या खरेदीची शाश्वती होती त्या बाजारसमित्या अशा दोन्हींना या कायद्यात दुय्यम स्थान दिलं गेलं आहे.
आपल्या १२ एकरांपैकी ३-४ एकरात मल्लिकार्जुनप्पा भाताची शेती करतात. बाकी जमिनीत सुपारी. “गेल्या साली सुपारीचं पीक फार काही चांगलं नव्हतं आणि भातातूनही फारसं उत्पन्न निघालं नाही,” ते म्हणतात. “मला बँकेचं १२ लाखांचं कर्ज फेडायचंय. त्यांनी [राज्य सरकार] सांगितलं होतं की ते कर्जमाफी करतील. पण बँका मला अजूनही नोटिसा पाठवतायत आणि दंड लावण्याचा इशारा देतायत. त्या सगळ्याचीच चिंता आहे,” ते म्हणतात. त्यांच्या आवाजातला संताप वाढत जातो.
मल्लिकार्जुन यांच्यासारखे अनेक शेतकरी कर्नाटकाच्या दूरदूरच्या जिल्ह्यांमधून परेडच्या आदल्या दिवशी बंगळुरूला आले होते. पण मंड्या, रामनगर, तुमकुर आणि शेजारच्या जिल्ह्यांमधले शेतकरी मात्र २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत आपले ट्रॅक्टर, कार आणि बसमधूनही बंगळुरू शहरात पोचले. मध्य बंगळुरूमधल्या गांधीनगर परिसरातल्या फ्रीडम पार्कमध्ये दुपारपर्यंत पोचून त्यांना दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडच्या समर्थनात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी व्हायचं होतं. २६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडचं आयोजन केलं होतं.







