जानेवारी महिन्यातली थंडगार दुपार. दिल्लीतल्या आपल्या घरून कमार भाई आपल्या आईशी फोनवर बोलत होते. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातलं बारी फुलवरिया हे त्यांचं गाव. हजारेक किलोमीटर दूर असलेल्या ७५ वर्षीय शमीमा खातून यांच्याशी त्यांचं बोलणं सुरू होतं.
फोनच्या दोन टोकांवर असलेल्या मायलेकांचा संवाद सुरू होतो. कमारभाई आपल्या शुद्ध ऊर्दूत आईला विचारतात, “अम्मी, जरा ये बताइयेगा, बचपन में जो मेरे सर पे जख्म होता था ना, उसका इलाज कैसे करते थे?”
“सिर में जो हो जाहाई – तोरोहो होला रहा – बतखोरा कहा हयी ओको इधर. रेह, चिकनी मिट्टी लगाके धोलिया रहा, मगर लगा हयी बहुत. ता छूट गेलायी,” शमीमा खातून सांगतात. त्याचा अर्थ असा – डोक्याला जखम होते ना तीच तुला पण व्हायची. तिला इथे बतखोरा म्हणतात. मी खारी माती आणि चिकण मातीनी तुझं डोकं धुऊन काढायचे. खूप आग व्हायची. पण त्यानेच ती बरी झाली. आपला घरगुती उपाय सांगताना त्यांना हसू आवरत नाही. त्यांची भाषा कमारभाईंच्या ऊर्दूपेक्षा पूर्णपणे निराळी.
कमारभाईंना मात्र यात काहीही वावगं वाटत नाही कारण हे दोघं मायलेक असेच एकमेकांशी बोलत आले आहेत. दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये.
“मला तिची बोली पूर्ण समजते. पण मी बोलू शकत नाही. माझी ‘मातृभाषा’ ऊर्दू आहे असं जरी मी सांगत असलो तरी प्रत्यक्षात माझी आई वेगळीच भाषा बोलते,” कमारभाई सांगतात. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनासंबंधी पारीभाषाच्या चर्चेत हा मुद्दा येतो. “तिच्या भाषेला काय म्हणतात, कुणालाच माहित नाही. अम्मीला नाही, माझ्या घरच्या कुणाला नाही किंवा खरं तर ही भाषा बोलणाऱ्या एकालाही तिचं नाव माहित नाही,” ते सांगतात. ते स्वतः, त्यांचे वडील आणि भाऊसुद्धा कामासाठी गाव सोडून शहरात गेले. इतरही पुरुष मंडळी ही भाषा कधीच बोलत नाहीत. कमारभाईंची मुलांची तर गोष्टच सोडा. त्यांना त्यांच्या आजीची भाषा समजतही नाही.



















