“अम्मी, माझी शाळा परत कधी सुरू होणार?” मुनिया विचारते. तागाची झाडं विरळ करण्याचं काम सुरू आहे. सहारा आपल्या १० डेसिमल जमिनीत काम करण्यात मग्न आहे. मुनियाच्या प्रश्नांना उत्तर देण्याइतका वेळ काही तिच्यापाशी नाही.
“शाळा का उघडत नाहीयेत...!” चिमुकली मुनिया वेगवेगळ्या पद्धतीने त्याच प्रश्नाचा विचार करतीये. सहारा क्षणभर थांबते आणि आपल्या आवाजात कणही वैताग न जाणवू देता म्हणते, “देखिश ना की गरोम [पाहतीयेस ना किती उकाडा आहे ते]. आठ महिने झाले पाऊस झाला नाहीये.”
“मग आपण एसी का नाही लावत?” मुनियाचे प्रश्न काही थांबत नाहीत.
“सरकारकडे पैसे नाहीत ना,” आता सहाराचा संयम सुटत चाललाय.
“मग इंग्रजी शाळेतल्या 'बोरोलोकां'कडे इतके सारे एसी कसे काय असतात?”
आता सहारा एकदम गप्प होते आणि संध्याकाळ होईपर्यंत अगदी शांत शांत काम करत राहते. आज तिला तिचं काम अर्धं टाकून मुनियाबरोबर परत घरी यावं लागलं होतं. मतदानाचा दिवस आहे आज. प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर मत देण्यासाठी ती लगबगीने निघते. तिची चिमुकली लेक तिच्या मागे.
“अम्मी, आपण मत का देतो?” आज मुनियाचे प्रश्न काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पण आता विषय वेगळीकडे आल्यामुळे सहाराचा जीव भांड्यात पडतो. खरं तर आपल्या मुलीशी गप्पा मारण्याचं त्राणच तिच्यात राहिलं नाहीये.
“त्या दिवशी मी टीव्हीवर ऐकलं. एक मोठा माणूस म्हणत होता की त्यांना मुसलमानांच्या मतांची गरज नाही! आपण मुस्लिम आहोत ना अम्मी. मग मत का द्यायचं?”
सहाराचे पाय जिथल्या तिथे खिळून राहतात. नजर लेकीकडे लागते. ती करडी आणि कोरडी नजर मुनियाच्या ओळखीची आहे. ती एकदम गप्प होते.


