झाकिर हुसैन आणि महेश कुमार चौधरी लहानपणापासूनचे मित्र आहेत. आज चाळिशीतही त्यांची मैत्री एकदम घट्ट आहे. झाकिर अजना गावी राहतो आणि पाकूरमध्ये बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करतोय महेशसुद्धा याच गावात एक छोटी खानावळ चालवतो.
“पाकूर (जिल्हा) फार शांत निवांत आहे. इथले लोक सलोख्याने राहतात,” महेश सांगतो.
“हे हिमांता बिस्वा सर्मांसारखे बाहेरचे लोक येतात आणि भाषणं करून लोकांना भडकवतात,” झाकिर सांगतो. त्याचा मित्र महेश शेजारीच बसलाय.
पाकूर संथाळ परगणा या झारखंडच्या अगदी पूर्वेकडच्या प्रांतात येतो. २० नोव्हेंबर २०२४ रोजी इथे मतदान होईल. एकूण ८१ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१९ साली इथे झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपची सत्ता उलथवून टाकली होती.
हीच सत्ता परत खेचून आणण्यासाठी भाजपने आसामचे मुख्यमंत्री आणि इतरांनाही इथे प्रचारासाठी आणि मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पाठवून दिलं आहे. भाजपच्या नेत्यांनी इथे येऊन मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण करण्याचं काम केलं आहे. ‘बांग्लादेशी घुसखोर’ असं लेबल त्यांना लावण्यात आलं.
“माझ्या घराशेजारी हिंदू राहतात. ते माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी जातो,” झाकिर सांगतो. “हिंदू-मुस्लिम वाद केवळ निवडणुकांच्या वेळीच उपटतो. त्याशिवाय ते [भाजप] जिंकणार कसे?”
सप्टेंबर २०२४ मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या भाषणात घुसखोरीच्या मुद्द्याची री ओढली. “संथाल परगण्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटतीये. जमीन बळकावली जातीये. घुसखोर पंचायतीच्या जागांवर कब्जा करतायत,” ते म्हणाले होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अशाच प्रकारची भाषणं केली आहेत. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये देखील “आम्ही बांग्लादेशातून झारखंडमध्ये होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलू आणि आदिवासी समुदायांच्या अधिकारांचं रक्षण करू” असं म्हटलं आहे.












