“किती तरी वेळा हत्तींनी माझा पाठलाग केलाय, पण मला कधीही त्यांनी दुखापत केली नाहीये,” रवी कुमार नेताम हसत हसत सांगतो.
छत्तीसगडच्या उदंती सीतानदी व्याघ्र प्रकल्पात २५ वर्षीय रवी हत्तींचा माग काढण्याचं काम करतो. गोंड आदिवासी असणारा रवी आणि मी अरसीकन्हार रांगामधल्या जंगलवाटेवरून चालत होतो. हत्तीची लीद आणि पायाच्या ठशांवरून रवी हत्तींचा माग काढतो.
“माझा जन्म जंगलात झालाय. मी इथेच लहानाचा मोठा झालोय. या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी मला शाळेत जायची गरज नाही,” रवी सांगतो. धमतरी जिल्ह्याच्या थेनही गावच्या रवीने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर वन खात्यात फायर गार्ड म्हणून काम करायला लागला. चार वर्षं हे काम केल्यानंतर तो सध्याचं काम करी लागला.
हत्तीचा माग काढत आम्ही जंगलात शिरलो आणि तिथे भरून राहिलेले सगळे आवाज आम्हाला ऐकू यायला लागले. किड्यांची किरकिर, साल आणि साग वृक्षांमधून वाहत जाणाऱ्या वाऱ्याची शीळ, मधूनच पक्ष्याची हूल आणि एखाद्या प्राण्याच्या पावलाखाली मोडणारी फांदी. हत्तीच्या मागावर असाल तर फक्त डोळे नाही तर कान पण उघडे असायला लागतात.












