“माझी आई आणि मी काल रात्रीच यावरून भांडलो,” एकवीस वर्षांची आशा बस्सी सांगते. “साडेतीन वर्षं झाली. माझे आई-वडील शिक्षण सोडून द्यायच्या आणि लग्न लावायच्या मागे लागले आहेत.”
यवतमाळ शहरातील सावित्री ज्योतिराव
सामाजिक विद्यालयात अंतिम वर्षाची विद्यार्थिनी, आशा सामाजिक कार्य विषयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. औपचारिक
शिक्षण घेतलेली तिच्या कुटुंबातील ती पहिली सदस्य. “ज्या मुली लवकर लग्न करतात त्यांचं कौतुक केलं
जातं,” ती
म्हणते. "पण मला मात्र शिकायचंय. या सगळ्यातून
सुटण्याचा, मुक्तीचा,
शिक्षण हा माझ्यासाठी एकच मार्ग आहे.”
यवतमाळ जिल्ह्यातल्या जेवली गावाची
रहिवासी असलेली आशा मथुरा लभान समाजाची आहे. राज्यामध्ये या समुदायाची नोंद
विमुक्त जातींमध्ये केली जाते. तिचे आई-वडील शेतकरी आहेत. जेवलीमध्ये आपल्या शेतात
ते सोयाबीन, कापूस, गहू आणि बाजरी घेतात.
आशाला दोन बहिणी आणि एक भाऊ. या चार
मुलांचं पालनपोषण करण्यासाठी हे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. आशा सर्वात थोरली. आशा
यवतमाळ शहरात तिच्या मामा आणि मामीसोबत राहते आणि पदवीचं शिक्षण घेते.
गावातल्या काही शिक्षकांनी आग्रह
केला म्हणून आशाच्या पालकांनी तिला वयाच्या ७ व्या वर्षी घराजवळच्या जिल्हा परिषदेच्या
शाळेत दाखल केलं. तिसरीपर्यंत तिथे शिकल्यानंतर ती जेवलीपासून ११२ किलोमीटर दूर
यवतमाळ शहरात शिकायला गेली. तिथे तिने महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत शिक्षण घेतलं
आणि त्यानंतर जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.
“आमच्या समाजातील मुली साधारणपणे ७वी पर्यंत शिकतात, त्यानंतर त्यांना हळूहळू शाळा सोडायला लावली जाते. फार कमी मुली कॉलेजपर्यंत शिकतात,” आशा सांगते. तिच्या धाकट्या बहिणीचंही तीन वर्षांपूर्वी लग्न झालं.
आशा म्हणते, “आमचा समाज जुन्या विचारांचा आहे. मुलगी भविष्यात प्रेमात पडेल किंवा
इतर जातीच्या मुलासोबत लग्न करेल ही भीती लोकांच्या मनात असते. त्यामुळे अनेकदा मुलींवर कमी वयात
लग्नासाठी दबाव टाकला जातो. जर एखादी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली तर तिच्या
मैत्रिणींनाही शाळेतून काढून टाकलं जातं.” आशा सांगते.
“जातीबाहेर लग्न केलेली माझ्या
समाजातील एकही मुलगी मला माहीत नाहीये."
आशा सांगते की कोविड-१९ महामारीच्या
काळात ती जेवलीला परतली होती. त्या दरम्यान तिच्यावर लग्न करण्यासाठीचा दबाव वाढला
होता. तिने काही स्थळंही पाहिली. ती सांगते, “कोविड-१९ साथीच्या काळात, माझ्या
इथल्या तीसेक मुलींची लग्नं झाली. त्यांचं वय २१ वर्षांपेक्षा कमी होतं.”
जेवलीमध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाला
प्रोत्साहन नसल्यामुळे उशीरा लग्न करण्यासाठी हे कारण फारसं कुणाला पटत नाही.
“माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आहे आणि माझं
नाही, यामुळे लोक माझ्याकडे संशयाने
पाहतात.”
“[शिक्षणासाठी] जे काही करायचं ते
सर्व मी स्वतःचं स्वतः करते,” आशा सांगते. तिच्या आवाजातली निराशा लपत नाही. उच्च शिक्षण घेणारी ती
तिच्या कुटुंबातील पहिलीच असल्याने तिला तिच्या कुटुंबाकडुन फारसं मार्गदर्शनही
मिळत नाही. तिचे वडील बालसिंग बस्सी यांनी अकरावीपर्यंत आणि आई विमल बस्सी यांनी
इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. “आताही
त्यांना माझ्या शिक्षणाकडून फारशा अपेक्षा नाहीत कारण मी मुलगी आहे,” आशा म्हणते. आशाच्या शब्दात शिक्षण घेणे आता तिच्यासाठी
“लोटायचं काम” झाले आहे – असं काम ज्यामध्ये खूप शारीरिक आणि मानसिक संघर्ष करावा
लागतोय.
“माझ्या शिक्षणात घरातील कोणीही
सहभागी नव्हतं. मला
फार वाटते की माझ्या आईने माझ्या सोबत उभे राहावं, मला सांगावं की ‘तू अभ्यास कर, मी तुझ्या पाठीशी आहे.’ पण मला माझ्या आईसोबतच या विषयावर सर्वात जास्त
भांडावे लागते,” ती म्हणते.
जेवलीपासून सर्वात जवळचं कॉलेज १२ किलोमीटर अंतरावर बिटरगावला आहे. शाळेत येता-जाता मुलींना एकटीने प्रवास करावा लागतो. आणि मग पालकांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी लागून राहते. त्यामुळे, मुली सहसा एकत्र प्रवास करतात. शिक्षणविषयक पायाभूत सुविधा मुलींच्या शिक्षणासाठी किती मोलाच्या आहेत हेच यातून लक्षात येतं. “एका मुलीने जरी शाळा सोडली, तरी इतर पालकही त्यांच्या मुलीला प्रवासासाठी सोबत जास्त कुणी नाही म्हणून शाळा सोडायला लावतात.”
आशा सांगते की शाळेसाठी यवतमाळ शहरात
जाणं सोपं नव्हतं. ती मथुरा लभान भाषा बोलायची. तिच्या शाळेत शिक्षणाचे माध्यम
म्हणून वापरल्या जाणाऱ्या मराठीपेक्षा ती वेगळी होती. यामुळे वर्गात किंवा शालेय
कार्यक्रमात भाग घेणं कठीण व्हायचं. “माझ्या वर्गातली मुलं-मुली माझ्या बोलीभाषेची थट्टा करायचे. मी
वर्गात माझ्या बोलीत बोलले तर ते माझ्यावर हसतील अशी सारखी भीती वाटत रहायची.”
या संकोचामुळे आशाची शाळेतील प्रगती
अत्यंत संथ गतीने झाली. “इयत्ता
सहावीपर्यंत मला फक्त मराठी अक्षरे लिहिता येत होती. पूर्ण वाक्यंही मराठीत लिहिता येत नव्हती. मला ‘कुत्रा’
आणि ‘मांजर’सारखे साधे साधे शब्दही पाचवीपर्यंत येत नव्हते.”
पण बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत तिला
७९ टक्के गुण मिळाले आणि तिच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. आणि अगदी
ठामपणाने तिने आपल्या मामाला पुढे अभ्यास करू देण्यासाठी राजी केलं. बारावीत तिला
६३ टक्के गुण मिळाले.
असं असूनही आशाची शैक्षणिक कामगिरी तिच्या लोकांसाठी फारशी महत्त्वाची
नाही - “माझे आई-वडील कधीही अभिमानाने सांगू शकत नाहीत
की त्यांची मुलगी शहरात पदवीचे शिक्षण घेत आहे. कारण मुलीने जास्त शिकणं आमच्या
समाजात फारसं काही भारी मानलं जात नाही.”
लवकर लग्न करण्याच्या रिवाजामुळे मुलींचा
शिक्षणाचा उत्साह कमी होतो. "जर
वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न होणार हे ठरलेलं असेल तर मुली शिक्षणासाठी का कष्ट घेतील?” आशा विचारते. एवढ्या बिकट परिस्थितसुद्धा आशाच्या महत्त्वाकांक्षा जाग्या
आहेत. आपल्या शिक्षणाचं मोल काय याची पूर्ण जाणीव असल्याने ती म्हणते, “मी
सुरक्षित आणि स्वावलंबी भविष्याची स्वप्नं पाहू शकते. आणि त्याचं कारण केवळ शिक्षण
हेच आहे.”
आशाला वाचनाची आवड आहे. सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ आणि सुनीता बोर्डे यांचं ‘फिंद्री’ ही तिची काही आवडती पुस्तकं. ही पुस्तकं उपेक्षित महिलांच्या जीवनावर आधारित आहेत. तिला स्त्री अभ्यास या विषयात पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे आणि तिची यापूर्वीच सोनिपतच्या अशोका विद्यापिठात यंग इंडिया फेलो म्हणून निवडही झाली आहे.
यवतमाळ शहरात जाणं आशाचा आत्मविश्वास वाढण्यासाठी महत्त्वाचं ठरलं. “माझ्या नातेवाईकांना सोशल वर्कमधली पदवी कमी वाटत असली तरी माझ्यासाठी ती खूप फायद्याची ठरली आहे,” ती म्हणते. जेवलीमध्ये मथुरा लभान समाजाचा तांडा मुख्य वस्तीपासून दूर होता. “या तुटलेपणामुळे आपल्याला आधुनिक, पुरोगामी विचारांशी जोडून घेणं कठीण जातं,” आशा सांगते. महाविद्यालयातील तिच्या शिक्षकांनी तिला परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केलं. विशेषत: मराठी शिकवणारे प्राध्यापक घनश्याम दरणेंनी तर खूपच.
“स्त्रिया काहीही साध्य करण्यास
सक्षम नसतात असंच सगळ्यांना वाटतं,” आशा म्हणते. दु:खापेक्षा तिच्या आवाजात संताप असतो. ती म्हणते, “मला
ते बदलायचं आहे. मी काही तरी मोठं केल्यावर मला माझ्या गावात परत यायचंय आणि मुलींना
पुढे घेऊन जाणारा बदल घडवून आणायचाय. मला पळून जायचं नाही.”
पण त्या आधी तिला येऊन घातलेली लगीनसराई पार करावी लागेल. या
दरम्यान तिच्या कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव वाढेल. आशा म्हणते, “मला हा काळ तरुन
जाण्यासाठी खूप ताकद लागणार आहे.”