लिंबडी महामार्गाचा एक फाटा मोटा टिंबला गावी जातो. १०-१२ किलोमीटर आत. आणि गावाच्या वेशीवरच वणकरवास नजरेला पडतं. गावातले दलित समाजाच्या विणकरांची घरं आहेत इथे. खट खट, खट खट मागाचा आवाज हवेत भरून राहिलाय. अरुंद गल्लीमध्ये जुन्या धाटणीची कौलाची घरं, काही नुसतीच गवताने शाकारलेली. मागाच्या आवाजात मधूनच एखाद्या माणसाच्या बोलण्याचा आवाज येतो. जरा कान देऊन ऐकलंत ना तर कष्टाचे हुंकारही ऐकू येतील. आणि नीट कानोसा घेतलात तर मागाच्या त्या खटखटीत अवघड नक्षी विणणारा एक सुस्काराही कानावर पडेल. रेखा बेन वाघेलांच्या गोष्टीची नांदी असल्यासारखा.
“आठवीत होते. तीनच महिने झाले होते. लिंबडीच्या एका वसतिगृहात रहायचे मी. चाचणी परीक्षा झाल्यावर घरी आले होते. तेव्हाच आईने सांगितलं की आता मला पुढे शाळेत जाता यायचं नाही. माझ्या मोठ्या भावाला गोपाल भाईला मदतीची गरज होती. पोटासाठी काम करणं गरजेचं होतं म्हणून पदवीचं शिक्षण त्याने मध्येच सोडलं होतं. माझ्या दोन भावांसाठी आमच्या घरच्यांकडे कधीच पुरेसा पैसा नसायचा. मी पटोळाचं काम सुरू करण्यामागचं हे कारण.” रेखा बेन अगदी सरळ बोलतात. टोकदार. गरिबीचा स्पर्श झालेल्या सगळ्याच गोष्टी होतात तसं टोकदार. आज चाळिशीत असलेल्या रेखा बेन गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या मोटा टिंबला गावातल्या निष्णात विणकर आहेत. पटोळा म्हणजेच सुप्रसिद्ध पटोला साडी. (इथून पुढे वाचकांच्या सोयीसाठी पटोला असाच उल्लेख केला आहे.)
“माझ्या नवऱ्याला दारू, सट्टा, पान-मसाला आणि तंबाखूची लत होती,” त्या सांगतात. लग्नानंतरच्या आपल्या आयुष्याचा आणखी एक धागा. हा फारसा सुखावह नाहीच. किती तरी वेळा त्या माहेरी परत यायच्या. पण काही तरी समजूत घालून त्यांना नांदायला सासरी धाडून दिलं जायचं. त्यांच्या दैन्याला पारावार नव्हता. तरीही त्यांनी ते सगळं सहन केलं. “तो चांगला माणूस नव्हताच,” त्या आता सांगतात.
“तो कधी कधी मला मारहाण करायचा, अगदी पोटात मूल असतानाही,” त्या सांगतात. त्यांच्या आवाजात आजही त्या वेदना ताज्या आहेत. “त्याचं एक प्रकरण सुरू होतं ते मला माझ्या मुलीच्या जन्मानंतर समजलं. तरीही मी वर्षभर तशीच त्याच्या बरोबर राहिले. तेव्हाच [२०१० साली] गोपाल भाई अपघातात मरण पावले. आणि त्यांचं पटोलाचं सगळं काम बाकी होतं. गोपाल भाईंनी व्यापाऱ्याकडून माल घेतला होता आणि त्याचं देणं होतं. मग मी पाच महिने माघारीच राहिले [माहेरी] आणि त्यांचं सगळं काम पूर्ण केलं. त्यानंतर माझा नवरा मला घेऊन जायला आमच्या घरी आला,” त्या सांगतात.
पुढची काही वर्षं अशीच गेली. आपण खूश आहोत या समजुतीत. मुलीची काळजी घेण्यात आणि खोल पोटातली वेदना सहन करत. “माझी मुलगी साडेचार वर्षांची झाली तेव्हा मात्र मला तो सगळा छळ सहन करण्यापलिकडे गेला होता,” रेखा बेन सांगतात. शाळा सुटल्यानंतर पटोला विणकामाचं कौशल्य त्या शिकल्या होत्या. घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेच कौशल्य त्यांच्या मदतीला आलं. गरिबीचे ओरखडे जरासे मिटू शकले आणि त्यांनी नव्या दमाने आयुष्य पुन्हा एकदा सुरू केलं. आणि ही सुरुवात चांगलीच दमदार होती.


















