२०२३ हे आमच्यासाठी फार धावपळीचं वर्ष होतं.
जानेवारी ते सप्टेंबर या काळात भारतात जवळपास दररोज निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. सप्टेंबर महिन्यात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभा आणि विधानसभांमध्ये अधिकाधिक महिला याव्यात यासाठी आणलेल्या या विधेयकाची अंमलबजावणी मात्र २०२९ मध्ये होणार आहे! राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये महिलांविरोधात केलेल्या गुन्ह्यांची संख्या ४,४५,२५६ इतकी आहे. ऑगस्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लिंगभेदी साचेबद्ध प्रतिमा बदलाव्यात यासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली. यामध्ये रुळलेल्या काही साचेबद्ध संज्ञा बदलण्याचं आवाहन करत असताना याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांच्या विरोधात निवाडा दिला. नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. धार्मिक, जातीय दंगली भडकल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या. मार्च २०२२ ते जुलै २०२३ या काळात भारतातल्या अब्जाधीशांची संख्या १६६ वरून १७४ पर्यंत गेली. जानेवारी ते सप्टेंबर या काळात १५-२९ या वयोगटासाठी बेरोजगारीचा दर १७.३ होता.








