“सर्वात पहिल्यांदा मला हंगुल दिसला तेव्हा मी इतका भारावून गेलो की माझं पाऊलच तिथून हलेना,” शाबिर हुसैन भट सांगतो. काश्मीरमध्येच दिसणाऱ्या आणि आता विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या काळविटासारख्या प्राण्याचं (Cervus elaphus hanglu) दर्शन व्हावं म्हणून तो पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत राहिला.

आज वीस वर्षांनंतरही काश्मीरमधल्या या १४१ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या अभयारण्यातल्या पशु-पक्षी आणि झाडझाडोऱ्याचं त्याचं वेड बिलकुल कमी झालेलं नाही. “त्या हंगुलने माझ्यात काही तरी चेतवलं. आणि हो हिमालयी अस्वलानेसुद्धा.”

या अभयारण्यात त्याची ओळख ‘दाचिगमचा विश्वकोष’ अशीच आहे. “आजवर मी झाडांच्या ४०० प्रजाती, पक्ष्यांच्या २०० हून अधिक आणि या भागात आढळणाऱ्या सगळ्या प्राण्यांच्या प्रजाती ओळखल्या आहेत,” तो सांगतो. या अभयारण्यात कस्तुरीमृग, हिमालयातलं तपकिरी अस्वल, हिमबिबट्या आणि सुवर्णगरूडसुद्धा आढळतात.

PHOTO • Muzamil Bhat
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः दाचिगम अभयारण्यातल्या गर्द वनराजीत शाबिर आणि त्याच्या सोबत चाललेले काही पर्यटक. उजवीकडेः अभयारण्यातले पर्यटक

PHOTO • Muzamil Bhat
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः दाचिगम अभयारण्यातल्या ओक पॅच या ठिकाणी आलेला हंगुल माद्यांचा कळप. उजवीकडेः मरसर सरोवरात उगम पावणारी दागवान नदी या अभयारण्यातून वाहत जाते आणि तीच महत्त्वाचा जलस्रोत आहे

दाचिगम अभयारण्यात बॅटरीवर वाहनं चालतात. त्यातल्याच एका वाहनाचा चालक म्हणून शाबिर काम करायचा. हळूहळू त्याच्याकडची माहिती वाढत गेली आणि मग तो गाईड म्हणून काम करू लागला. २००६ सालापासून तो राज्य वन्यजीव विभागामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

पूर्वी झन्स्कार पर्वतरांगांमध्ये हंगुल सर्वत्र आढळायचे. पण २००९ साली वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार शिकार, अधिवासांमध्ये अडथळा आणि ऱ्हास या कारणांमुळे १९४७ मध्ये २००० इतकी संख्या असलेली ही हरणं आज १७०-२०० इतकीच उरली आहेत. आणि आज ती केवळ दाचिगम अभयारण्य आणि काश्मीर खोऱ्यातल्या इतर काही अभयारण्यांच्या क्षेत्रातच पहायला मिळतात.

शाबिर श्रीनगरच्या निशात परिसरात राहतो आणि या अभयारण्यापासून त्याचं गर केवळ १५ किमी लांब आहे. घरी आई-वडील, पत्नी आणि दोघं मुलं असा परिवार आहे. तो पर्यटक आणि वन्यप्रेमींसोबत पूर्ण दिवस अभयारण्यात असतो. “तुम्हाला नुसतं दाचिगम अभयारण्य पहायचं असेल तर तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळी येऊ शकता. मात्र प्राणी बघायचे असतील तर मात्र अगदी पहाटे किंवा सूर्योदयाच्या आधी तुम्ही इथे यायला हवं,” शाबिर सांगतो.

PHOTO • Muzamil Bhat

पूर्ण वाढ झालेली हंगुल मादी

PHOTO • Muzamil Bhat

नदीवर आलेला काश्मिरी हंगुल

PHOTO • Muzamil Bhat

अभयारण्यात दिसलेलं हिमालयीन काळं अस्वल

PHOTO • Muzamil Bhat
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः हिमालयीन करडं माकड. उजवीकडेः दाचिगम अभयारण्यात एका झाडावर दिसलेलं पिवळ्या गळ्याचा मुंगुसवर्गीय प्राणी – यलो थ्रोटेड मार्टेन

PHOTO • Muzamil Bhat

शाबिर आलेल्या पर्यटकांना विविध प्रजातींचे पक्षी दाखवतोय

PHOTO • Muzamil Bhat
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः स्वर्गीय नर्तक. उजवीकडेः करडा धोबी

PHOTO • Muzamil Bhat
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः खाटिक पक्षी. उजवीकडेः व्हेरियगेटेड लाफिंग थ्रश

Muzamil Bhat

ମୁଜାମିଲ୍ ଭଟ ହେଉଛନ୍ତି ଶ୍ରୀନଗରରେ ବାସ କରୁଥିବା ଜଣେ ମୁକ୍ତବୃତ୍ତ ଫଟୋ ସାମ୍ବାଦିକ ଓ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ନିର୍ମାତା ଏବଂ ସେ 2022 ର ପରୀ ଫେଲୋ ଥିଲେ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Muzamil Bhat
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ