गाईचं शेण, चिकणमाती आणि बांबू. माजुलीमध्ये मुखवटे बनवतात, त्यासाठी या तीन गोष्टी अशा काही गुंफल्या जातात, की सुंदर चेहरे तयार होतात. ब्रह्मपुत्रेतल्या या बेटावर राहाणार्या या कलाकारांच्या कित्येक पिढ्या हे कौशल्य दाखवत मुखवटे तयार करत आल्या आहेत, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा देत आल्या आहेत. ‘‘आमच्या संस्कृतीत हे मुखवटे खूप महत्त्वाचे आहेत. आमचं कुटुंब हे मुखवटे बनवणार्या काही शेवटच्या कुटुंबांपैकी एक आहे.’’ कलाकार अनुपम गोस्वामी सांगतात. इथे तयार होणारे अगदी साधे आणि खूप कलाकुसर असलेले, असे दोन्ही प्रकारचे मुखवटे माजुलीमध्ये होणार्या वार्षिक नाट्यप्रयोगांमध्ये आणि देशभरात अनेक महोत्सवांमध्ये घातले जातात.
‘‘आता आमच्या कुटुंबाची ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे,’’ पंचवीस वर्षांचा अनुपम म्हणतो. त्याच्या कुटुंबाच्या कित्येक पिढ्या हा व्यवसाय करतायत. अगदी आताही नऊ जणांच्या या कुटुंबातला प्रत्येक जण या कलेशी संबंधितच काही ना काही करतोय.
‘‘जगभरातले पर्यटक माजुली बेट बघायला येतात आणि इथली आठवण म्हणून मुखवटे घेऊन जातात,’’ धिरेन गोस्वामी सांगतात. ते अनुपमचे काका. गोस्वामी कुटुंबाचा मुखवटे बनवण्याचा छोटा कारखाना आहे आणि त्याला लागूनच तयार झालेले मुखवटे विकण्यासाठी दुकान आहे. ४४ वर्षांचे धिरेन या दुकानात मुखवटे विकतात. एक साधा मुखवटा साधारण ३०० रुपयांना मिळतो. पण त्याचा आकार, मागणी आणि गरजेनुसार त्यात भरलेले अनेक तपशील, यामुळे त्यांची किंमत १०,००० रुपयांपर्यंतही जाऊ शकते.
माजुली हे भारतातलं नदीत असलेलं सर्वात मोठं बेट आहे. २०११च्या जनगणनेनुसार आसाममधल्या वैष्णव धर्मियांचं ते मुख्य केंद्र आहे. वैष्णवांचे ६२ सत्रा, म्हणजे मठ तिथे आहेत.
मुखवटे बनवण्यासाठी जे साहित्य लागतं, त्यापैकी चिकणमाती आणि बांबू तर ब्रह्मपुत्राच देते. माजुली हे नदीतलं भलं मोठं बेट आहे. त्यावरची नदीवर आधारित असलेली परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी नदी परिसंस्था आहे. १,९४,४१३ चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. हिमालयातला वितळणारा बर्फ आणि प्रचंड पाऊस यामुळे नदीला भरपूर पाणी असतं आणि त्यामुळे इथे वारंवार पूर येतात. माजुली आणि इतर आसपासच्या बेटांची त्यामुळे प्रचंड धूप होते आणि हा धोका इथे कायमच असतो.
याचा परिणाम मुखवटे बनवणार्या कलाकारांनाही जाणवतो. ‘‘इथल्या जमिनीची सतत धूप होते, त्यामुळे मुखवटे बनवण्यासाठी चिकणमाती मिळणं दिवसेंदिवस खूप कठीण होतं आहे.’’ धिरेन गोस्वामींनी ‘इंडिया डेव्हलपमेंट रिव्ह्यू’मध्ये लिहिलंय. जवळच्या बाजारपेठेतून चिकणमाती किंवा कुंभाराची माती खरेदी करण्यासाठी त्यांना क्विंटलला १५०० रुपये खर्च करावे लागतात.
या कलेचं मूळ कुठे सापडतं? धिरेनने घेतलेल्या शोधानुसार ते आहे महापुरुष श्रीमंत संकरदेव यांच्या एका नाटकाच्या प्रयोगात. ‘‘पौराणिक नाटकांमधल्या काही व्यक्तिरेखा केवळ मेकअपमधून उभ्या करणं खूपच कठीण होतं. त्यामुळे संकरदेवांनी मुखवटे तयार केले, ते कलाकारांनी घातले आणि अशा रीतीने ही परंपरा सुरू झाली.’’
गोस्वामी कुटुंबाचं संगीत कला केंद्र आहे समागुरी सत्रामध्ये. हा सत्रा १६६३ मधला आहे. सत्रा म्हणजे समाजसुधारक आणि संत महापुरुष श्रीमंत संकरदेव यांनी पारंपरिक ललित कलांच्या सादरीकरणासाठी उभी केलेली केंद्रं.
‘आमच्या संस्कृतीत मुखवट्यांना खूप महत्त्व आहे. आजही मुखवटे तयार करणाऱ्या काही मोजक्याच कुटुंबांपैकी आमचं एक कुटुंब,’ अनुपम गोस्वामी सांगतात
गोस्वामी कुटुंबाच्या घरापासून जेमतेम दहा पावलांवर मुखवटे बनवण्याच्या त्यांच्या कार्यशाळेच्या दोन खोल्या आहेत. भलामोठा आणि अद्याप पूर्ण न झालेला हत्तीच्या मुखवट्याचा बांबूचा सांगाडा पूर्ण होण्याची वाट पाहात कोपर्यातल्या एका टेबलावर विसावला आहे. मुखवटे बनवण्याची ही कार्यशाळा उभारल्याबद्दल आणि एकूणच या कलेतल्या त्यांच्या योगदानासाठी धिरेन गोस्वामी यांचे वडील कोशा कांता देवा गोस्वामी यांना २००३ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता.
कार्यशाळेतल्या एक्झिबिशन हॉलच्या भिंतींवर काचेच्या कपाटांमध्ये वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे मुखवटे असतात. दहा फूट उंचीच्या संपूर्ण शरिराच्या मुखवट्यासारखे काही मुखवटे मात्र बाहेरच असतात. धिरेन आम्हाला गरुडाच्या संपूर्ण शरिराचा भलामोठा मुखवटा दाखवतात. हे मुखवटे कलेतून धर्मिक संदेश देणारा ‘भाओना’ किंवा कृष्णाची नृत्यं असलेला ‘रास महोत्सव’ यासारख्या उत्सवांमध्ये वापरले जातात.
‘‘२०१८ मध्ये कधीतरी या आकाराच्या मुखवट्यांची ऑर्डर आम्हाला थेट अमेरिकेतल्या एका म्युझियममधून मिळाली होती. पण हा आकार पाठवण्यासाठी खूपच बोजड होता आणि त्यामुळे आम्हाला त्याचं डिझाइनच बदलावं लागलं,’’ अनुपम सांगत असतो.
या कलेतल्या नावीन्याची, बदलाची ही सुरुवात होती. त्यानंतर कलाकारांनी घडी घालता येतील, सहज इकडून तिकडे पाठवता येतील आणि सहज जोडता येतील असे मुखवटे बनवायला सुरुवात केली. ‘‘मुखवटे कसे आणि कशासाठी वापरायचे, त्यानुसार आम्ही ते बनवण्याची पद्धत बदलली. एकदा काही पर्यटक आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे वॉल हँगिंगसारखे बनवून हवे आहेत, भेट देण्यासाठी. आम्ही मग त्या पद्धतीने मुखवटे बनवले. काळाप्रमाणे प्रत्येकाने बदलायलाच हवं!’’ परंपरा मोडली अशी आपल्यावर टीका करणार्यांना अनुपम परस्पर उत्तर देऊन टाकतो.
आता या मुखवट्यांची विक्री मुख्यतः पर्यटनावर आणि पर्यटकांवर अवलंबून असते. अनुपम चिंतेने म्हणतो, ‘‘पैसे मिळवण्याकडे आम्ही फारसं कधी लक्षच दिलं नाही. पर्यटनाच्या मोसमातही आम्हाला आर्थिक स्थैर्य नसतं.’’
या सगळ्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत अनुपमने दिब्रूगढ विद्यापीठातून टूरिझममधू्न मास्टर्स केलंय. आता या क्षेत्रात काही नवी संधी मिळते का, या शोधात तो आहे. ‘‘आमचा पारंपरिक व्यवसाय कसा वाढवावा याच्या माझ्याकडे वेगवेगळ्या कल्पना आहेत, खूप स्वप्नं आहेत माझी त्याबद्दल. पण मला माहीत आहे, त्यासाठी मला आधी माझ्याकडची जमापुंजी वाढवावी लागेल, बचत करावी लागेल.’’
मुखवटे बनवण्याची कला शिकण्याची इच्छा असलेल्या कुणालाही हे कुटुंब ही कला शिकवतं. ‘‘वर्षाला दहाएक विद्यार्थी असतात आमच्याकडे. आजुबाजूच्या गावातल्या शेतकरी कुटुंबातून ही मुलं आलेली असतात. पूर्वी स्त्रियांना मुखवटे बनवण्याची परवानगी नव्हती. आता ती परिस्थिती बदलली आहे,’’ अनुपम म्हणतो. या विद्यार्थ्यांनी तयार केलेले मुखवटे कला केंद्रात विकायला ठेवलेले असतात. त्यांना त्यांच्या विक्रीतून येणारी काही टक्के रक्कम मिळते.
गौतम भुयान हा विद्यार्थी सध्या कार्यशाळेत आहे. ऑर्डरसाठी तो एक मुखवटा बनवतोय. २२ वर्षांचा हा तरुण कमलाबारी तालुक्यात पोतियारी गावात राहातो. त्याच्या कुटुंबाची आठ बिघा (साधारण दोन एकर) जमीन आहे आणि त्यावर ते भाताचं पीक घेतात. ‘‘इथे लोक मुखवटे बनवतात ते मी पाहायचो. मला ते आवडायला लागलं, उत्सुकता वाटायला लागली त्याबद्दल. मग शालेय शिक्षण झाल्यावर शेतीच्या कामात मदत करण्याऐवजी मी इथे येऊन ही कला शिकायला सुरुवात केली,’’ तो सांगतो.
गौतमने आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून स्वतंत्रपणे ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आहे. तो म्हणतो, ‘‘माझं उत्पन्न ऑर्डरवर अवलंबून असतं. इथे मोठी ऑर्डर असली तर मी इथेही कामाला येतो.’’ पैशाव्यतिरिक्त बरंच काही आपल्याला या कलेकडून मिळालं, हे सांगताना तो हळूच हसतो. ‘‘हे मुखवटे घालून आपल्या देशात जिथेजिथे नाटकांचे प्रयोग होतात, त्या ठिकाणी मला जायला मिळतं. एवढंच नाही, मला भरपूर व्ह्यूज मिळालेल्या बॉलीवूड म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली!’’
गौतम आणि अनुपम, दोघांनीही अलीकडेच एका बॉलीवूड म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं. या व्हिडीओला ४५ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. अनुपमने या व्हिडीओमध्ये रामायणातल्या दहा तोंडी रावणाची भूमिका केली आहे आणि स्वतःच तयार केलेला रावणाचा मुखवटा त्याने घातला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीचाच शॉट त्याच्यावर आहे. ‘‘मला त्यात एका ओळीचंही क्रेडिट मिळालं नाही. मला नाही, माझ्याबरोबर ज्या दोघा कलाकारांनी काम केलं, या परफॉर्मन्ससाठी कपडेपट तयार केला, त्यांनाही नाही,’’ तो सांगतो.
पारीचे माजी इंटर्न्स सबझारा अली, नंदिनी बोहरा आणि वृंदा जैन यांनी या स्टोरीसाठी मदत केली. त्यांचे आभार.