सुनीता भुरकुटेंची मातृभाषा आहे कोलामी पण कपाशीची शेती करणाऱ्या सुनीताताई दिवसभर मराठीतच जास्त बोलतात. कपास विकायची तर बाजाराची भाषा यायला पाहिजे ना, त्या म्हणतात.
यवतमाळ जिल्ह्यातलं हे कोलाम आदिवासी कुटुंब घरी कोलामीमध्येच बोलायचं. सुनीताला आजही आठवतं की सुर देवी पोड या त्यांच्या माहेरी सगळे कोलामीच बोलायचे. गावात बोलली जाणारी मराठी बोलायचीच अडचण होती. त्यांनी कुठे कधी शाळाच पाहिली नाही. ते तोडकं मोडकं बोलायचे, त्या सांगतात.
पण त्यांच्या कुटुंबातले जास्तीत जास्त लोक बाजारात कापूस विकायला जाऊ लागले आणि हळूहळू त्यांनी मराठी शिकायला सुरुवात केली. आज भुलगड या त्यांच्या पोडावरचे सगळे कोलाम आदिवासी बहुभाषिक झाले आहेत. मराठी बोलतायत, हिंदीतली काही वाक्यं आणि कोलामी तर त्यांना येतेच.
कोलामी ही द्रविडी भाषा असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि छत्तीसगडमध्ये ती बोलली जाते. युनेस्कोच्या जगातील धोक्यात असलेल्या भाषांच्या नकाशानुसार कोलामी भाषा खात्रीलायकरित्या धोक्यात असल्याची नोंद केली आहे. याचा अर्थ असा की लहान मुलं आता ही भाषा मातृभाषा म्हणून शिकत नाहीत.
पण आमची भाषआ कमी होत नाही. आम्ही वापरतात, ४० वर्षीय सुनीता ताई सांगतात.














