महातो ऑक्टोबरच्या मध्यापासून डिसेंबरपर्यंत पश्चिम बंगालमध्ये घालवतील आणि नंतर थोड्या काळ बिहारला परत येतील. फेब्रुवारीमध्ये, ते आसाममधील चहाच्या मळ्यांकडे रवाना होतील आणि पुढील सहा ते आठ महिने चहाची तोड होते त्या काळात ते तिथेच राहतील. “आसाममध्ये अशी एकही जागा नाही की जिथे मी गेलो नाही, दिब्रुगढ, तेजपूर, तिन्सुकिया, गोलाघाट, जोरहाट, गुवाहाटी,” ते मोठी शहरे आणि गावांची नावं सांगतात.
आसाममध्ये त्यांनी बनवलेल्या बांबूच्या टोपल्यांना ‘ढोको’ म्हणतात. डुलीपेक्षा, ‘ढोको’ उंचीने खूपच लहान असतात म्हणजे तीन फूट. चहाची पाने तोडून यात टाकली जातात. ते एका महिन्यात तब्बल ४०० टोपल्या बनवतात, अनेकदा चहाच्या मळ्यांकडून ऑर्डर दिल्यावर त्यांना कामासाठी बांबू पुरवले जातात आणि त्यांची राहण्याची सोयदेखील केलेली असते.
“बांस का काम किया, गोबर का काम किया, माटी का काम किया, खेती में काम किया, आइस्क्रीम का भी काम किया...” अष्टपैलू बबनने सांगितलं आणि त्यांच्या वर्षभराच्या कामाचे वर्णन केलं.
आसाममध्ये टोपलीच्या ऑर्डरचे काम कमी पडल्यास, ते राजस्थान किंवा दिल्लीमध्ये फिरतात आणि रस्त्यावर आइस्क्रीम विकतात. त्याच्या गावातले आणखी काही पुरुष आहेत जे असंच करतात, म्हणून जेव्हा गरज असेल तेव्हा मिरवणूकीच्या पुढे बॅण्डसाठी असलेली गाडीदेखील चालवतात. “माझं संपूर्ण आयुष्य राजस्थान, दिल्ली, आसाम, बंगाल इथंच गेलंय,” त्यांनी सांगितलं.