“आता वादळ शमलंय ना, आम्हाला इथनं जायला सांगितलंय,” कालिदासपूर गावच्या रहिवासी असणाऱ्या अमीना बीबींनी मे महिन्याच्या अखेरीस मला सांगितलं होतं. “पण आम्ही जावं तरी कुठे?”
पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या अमीना बीबींच्या गावापासून १५० किलोमीटर दूर अम्फान चक्रीवादळ धडकलं त्याच्या आदल्याच दिवशी स्थानिक अधिकाऱ्यांनी अनेक गावातल्या कुटुंबांना निवारा शिबिरांमध्ये हलवलं होतं. या वर्षी १९ मे रोजी अमीना आणि त्यांच्या कुटुंबियांना शेजारच्या गावातल्या तात्पुरता निवारा असलेल्या खोल्यांमध्ये हलवण्यात आलं होतं.
अमीना बीबींचं मातीचं घर वादळात पार धुऊन गेलं. सुंदरबनमधल्या गोसाबा तालुक्यातल्या त्यांच्या गावाची लोकसंख्या ५,८०० इतकी आहे. अमीना, वय ४८, त्यांचे शौहर मोहम्मद रमझान मोल्ला, वय ५६ आणि वय वर्ष २ ते १६ वयाची त्यांची सहा मुलं कसं तरी करून सुरक्षित राहिले.
मोहम्मद मोल्ला वादळ धडकण्याच्या दोनच आठवडे आधी घरी परतले होते. त्या आधी ते पुण्यातल्या एका मॉलमध्ये सफाईचं काम करून महिन्याला १०,००० रुपये कमावत होते. या वेळी त्यांनी घरीच थांबून जवळच्याच मोल्ला खाली बाझारात एक चहाचं दुकान थाटायचं ठरवलं होतं.
घरचं सगळं काम उरकलं की अमीना जवळच्याच गोमोर नदीत खेकडे आणि इतर मासे धरायचं काम करून घरच्या कमाईत भर घालत होत्या. त्या त्यांच्याकडे असलेली मोजकी मासळी बाझारात विकायच्या. “त्याचे मला दिवसाला १०० रुपये देखील मिळायचे नाहीत,” त्यांनी मला सांगितलं होतं.
२०१८ साली त्यांच्या सर्वात थोरल्या मुलाने, राकिब अलीने वयाच्या १४ व्या वर्षी शाळा सोडली. “अब्बा घरी पाठवतात तेवढ्या पैशात आमचं काय भागणार?” तो म्हणतो. “त्यामुळे मग मी कामासाठी बाहेर पडलो.” राकिबला कोलकात्यात एका शिंप्याच्या दुकानात काम करून महिन्याला ५,००० रुपये मिळत होते. कोविड-१९ च्या टाळेबंदी दरम्यान अम्फान येऊन धडकलं आणि तो घरी परतला.
मातीचं, गवताने शाकारलेलं त्यांचं घर गोमोर नदीच्या तीरावर होतं. या आधी आलेल्या प्रत्येक वादळानंतर नदी इंच इंच करत आत सरकत गेली – सिद्र (२००७), आयला (२००९) आणि बुलबुल (२०१९). हळू हळू त्यांची अख्खी तीन बिगा (एक एकर) जमीन नदीने गिळंकृत केली. त्या आधी ते वर्षातून एकदा भाताचं पीक घ्यायचे, काही भाज्या पिकवायचे. अम्फान धडकलं तोपर्यंत त्यांच्याकडे काहीही राहिलं नव्हतं.















