गडद निळा कुर्ता, कशिदा केलेली लुंगी आणि अंबाड्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा. एम. पी. सेल्वी आपल्या भटारखान्यात दाखल होतात. या जागेचं नाव आहे करम्बकडइ एम. पी. सेल्वी बिर्याणी मास्टर. तिच्याकडे कामाला असलेले सगळे जण मान उंचावून तिच्याकडे पाहतात. गप्पाटप्पा विरतात. एक जण तिला रामराम करते आणि तिच्या हातातली पिशवी आपल्याकडे घेते.
सेल्वी अम्मा बिर्याणी मास्टर आहे. साठेक लोक काम करत असलेल्या या भटारखान्यात तिचा एक वेगळाच दबदबा आहे. काही क्षणांत सगळे जण आपापल्या कामाला लागतात. एका लयीत, फटाफट हात कामाला लागतात. चुलीचा धूर, निखारे किंवा ठिणग्यांचा काहीही परिणाम इथल्या कुणावर होत नाही.
सेल्वी अम्मा आणि तिच्या हाताखालचे हे सगळे आचारी गेल्या तीसेक वर्षांपासून ही सुप्रसिद्ध बिर्याणी बनवतायत. इथली दम मटण बिर्याणी खास असते. इतर बिर्याणासारखं इथे भात आणि मटण वेगवेगळं शिजवत नाहीत. सगळा मालमसाला इथे एकत्र शिजवला जातो.
“कोइम्बतूर दम बिर्याणी माझी खासियत आहे,” ५० वर्षीय सेल्वी अम्मा सांगते. ती पारलिंगी आहे. “सगळं काही मी एकटी करते. सगळं काही माझ्या मनात मी पाठ करून ठेवलेलं असतं. कधी कधी तर सहा सहा महिन्यांच्या ऑर्डर आलेल्या असतात.”
आमच्याशी बोलता बोलता कुणी तरी तिच्या हातात बिर्याणीसाठीचं वाटण असलेला मोठा डाव देतं. अम्मा वाटण चाखून पाहते आणि मानेनेच ‘ओके’ सांगून टाकते. चाखून पाहण्याची ही सगळ्यात महत्त्वाची पायरी. अम्मानेच ठीक आहे म्हटल्यावर सगळेच हुश्श असा सुस्कारा टाकतात असं वाटतं.
“सगळे मला इथे ‘सेल्वी अम्मा’ म्हणतात. एका तिरुनंगईसाठी [पारलिंगी स्त्री] अम्मा म्हटलं जाणं फार आनंद देऊन जातं,” हसत हसत अम्मा सांगते.























