“आओ आओ, सुनो अपनी भविष्यवाणी, सुनो अपनी आगे की कहानी...” जुहू बीचच्या संध्याकाळच्या सगळ्या गोंगाटात ही साद एखाद्या मंत्रासारखी हवेत भरून राहलेली असते. मुंबईच्या समुद्रावर सूर्य मावळत असताना २७ वर्षीय उदय कुमार लोकांना बोलावतोय आणि त्यांच्याच भल्याचं काही सांगतो म्हणतोय.
तो काही कुणी ज्योतिषी नाही, ना चिरो प्रॅक्टिशनर. त्याच्याकडे टॅरट कार्ड नाहीत आणि लाल कंठा असलेला पोपटही नाही आसपास. त्याच्याकडे आहे एक छोटासा, फूटभर उंचीचा रोबो. फोल्डिंग टेबलावर एका काळ्या खोक्यावर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेला रोबो. “त्याचं नाव आहे ज्योतिष कंप्यूटर लाइव्ह स्टोरी,” उदय कुमार रोबोची ओळख मला करून देतो.
या यंत्राला कुणाच्याही शरीरातलं कंपन समजतं असं सांगत आलेल्या एकाला तो त्याच्याकडचा हेडफोन देतो. आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसतं. काही क्षण गेल्यानंतर एका बाईचा आवाज हिंदीमध्ये त्या व्यक्तीची भविष्यवाणी सागंतो. फक्त ३० रुपयांत.
असा रोबो असणारा उदय हा इथला एकटाच आपले काका राम चंदर यांच्याकडून त्याला हा रोबो वारशात मिळाला आहे. काही दशकांपूर्वी ते बिहारच्या गेंधा या पाड्यावरून मुंबईला स्थलांतरित झाले. इथे शहरात त्यांना सगळे राजू म्हणून ओळखतात. काका गावी आले की शहरातल्या अनेक सुरस कथा सांगायचे. “चाचांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अजूबा आहे आणि तो भविष्य सांगतो. त्यातनंच त्यांची कमाई होत असल्याचं ते म्हणाले. बहुतेकांनी हे सगळं हसण्यावारी नेलं आणि म्हणाले काही तरी विनोद करतोय म्हणून. पण मला मात्र त्या सगळ्याची भुरळ पडली होती!” उदय सांगतो. राजूच्या कहाण्यांमुळे त्याच्या ११ वर्षांच्या पुतण्यावर मुंबई या महानगरीची आणि त्या अजूबाची जादू झाली होती.















