कडवटपणा, खेद, दुःख आहे का? साठ वर्षांपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडली आणि दोघांनी वेगळी वाट निवडली. पक्षातली ही फूट फार सहजसोपी नव्हती.
“तसं असलं तरी आम्ही अनेक मुद्द्यांवर, अनेक लढ्यांमध्ये एकत्र काम केलंय,” नल्लकन्न सांगतात. “आणि एकमेकांविषयी मनात असलेली भावना पूर्वीसारखीच. तशीच.”
“आम्ही दोघं भेटतो ना,” संकरय्या म्हणतात, “तेव्हा आजही आम्ही एकाच पक्षाचे असतो.”
आजचा धार्मिक उन्माद, द्वेष आणि हिंसेकडे तुम्ही कसं पाहता? हा देश एकसंध राहणार का? ज्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच देशाचं काय होणार?
“स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही कधी कधी परिस्थिती फार बिकट व्हायची,” नल्लकन्न सांगतात. “लोक म्हणायचे, तुम्ही नाही जिंकू शकणार. जगातल्या सगळ्यात बलशाली साम्राज्याला तुम्ही आव्हान देताय. आमच्यातल्या काही जणांच्या घरच्यांना लोक सांगायचे की यांना अशा लढ्यात पाठवू नका. पण त्या सगळ्या धमक्या, इशाऱ्यांवर मात करत आम्ही पुढे जात राहिलो. आणि म्हणूनच आज आपण इथे आहोत.”
आज व्यापक स्तरावर एकजूट व्हायला हवी असं दोघांनाही वाटतं. पूर्वीसारखं एकमेकांना साद घालण्याची, एकमेकांकडून शिकण्याची आज गरज आहे. “मला तर वाटतं ईएमएस [नंबूदिरिपाद] सुद्धा आपल्या खोलीत गांधींचा फोटो ठेवत असत,” आरएनके म्हणतात.
सध्या सुरू असलेलं राजकारण आमच्यासारख्या लाखो लोकांची झोप उडवत असताना हे दोघं इतके स्थिरचित्त आणि आशावादी कसे काय असू शकतात? नल्लकन्न इतकंच म्हणतात, “याहून भयानक काळ आम्ही पाहिलाय.”
ता.क.
२०२२ साली स्वातंत्र्यदिनी तमिळ नाडू शासनाने आरएनकेंना मानाच्या तगइसल तमिळार पुरस्काराने सन्मानित केलं. द लास्ट हिरोजः फूटसोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम हे पुस्तक तेव्हा प्रकाशित होण्याच्या मार्गावर होतं. तमिळ नाडूचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. २०२१ साली राज्यासाठी आणि तमिळ जनतेसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या नावाजलेल्या तमिळ व्यक्तिमत्त्वाला हा पुरस्कार घोषित करण्यात आला. सेंट जॉर्ज किल्ल्याच्या ऐतिहासिक चिरेबंदी वास्तूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आरएनकेंना १० लाख रुपये रोख आणि हा पुरस्कार बहाल केला.
आणि अर्थातच आर. नल्लकन्न यांनी विनम्रपणे पुरस्कार स्वीकारला पण १० लाख रुपये लागलीच मुख्यमंत्री मदत निधीला दान करून टाकले. आणि चांगल्या कामासाठी म्हणून त्यामध्ये आपले स्वतःचे ५,००० रुपये घालायला ते विसरले नाहीत.