“एका धाग्यापासून सगळं सुरू होतं आणि शेवटही एकाच धाग्याने होतो,” रेखा बेन वाघेला म्हणतात. चेहऱ्यावर मंद हसू. गुजरातच्या मोटा टिंबला गावातल्या आपल्या घरी हातमागावर त्या इकत पटोला विणतायत. “सुरुवातीला आम्ही एकाच धाग्याने कांडी भरतो आणि शेवटी रंगवलेला धागा त्या कांडीवर गुंडाळला जातो,” रेखा बेन सांगतात. पटोला विणण्यासाठी ताण्याच्या उभ्या धाग्यांसाठी वापरलेल्या कांड्या तयार करण्याआधी आणि बाण्याचा धागा मागावर चढवण्याआधी काय काय प्रक्रिया पार पाडाव्या लागतात ते सगळं त्या समजावून सांगतात.
पटोलु किंवा पटोला म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या सुप्रसिद्ध रेशमी साड्या विणण्याचं काम सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या
वनकरवासमध्ये चालतं. आणि इथली प्रत्येक व्यक्ती या साडीच्या कुठल्या ना कुठल्या
कामात गुंतलेली असते. मात्र चाळिशीच्या रेखा बेन मात्र लिंबडी तालुक्यातल्या पटोला
विणणाऱ्या एकमेव दलित महिला आहेत. त्या एकेरी आणि दुहेरी इकत पटोला विणतात. (वाचाः
रेखा
बेनच्या आयुष्याचा ताणा आणि बाणा
)
सुरेंद्रनगरची पटोला झालावाडी पटोला
म्हणून ओळखली जाते. पाटणच्या पटोलापेक्षा ही जरा स्वस्त असते. एकेरी इकत नक्षीसाठी
प्रसिद्ध असलेले झालावाडचे वनकर विणकर आता दुहेरी इकतही विणू लागले आहेत. “एकेरी
इकतमध्ये नक्षी फक्त ताण्याच्या धाग्यावर असते. पण दुहेरी इकतमध्ये दोन्ही
धाग्यांवर, ताण्यावर आणि बाण्यावर नक्षी असते,” रेखा बेन या दोन प्रकारच्या
साड्यांमधला महत्त्वाचा फरक सांगतात.
ही नक्षीच या विणकामातली सगळ्यात क्लिष्ट प्रक्रिया आहे. रेखा बेन परत एकदा
मला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. “एकेरी इकत पटोलामध्ये ताण्याचे ३,५००
आणि बाण्याचे १३,७५० धागे असतात. दुहेरी इकतमध्ये ताण्याचे २,२०० आणि बाण्याचे
९,८७० धागे असतात,” रेखा बेन सांगतात आणि बोलता बोलता बाण्याचा धागा भरलेली कांडी
धोट्यातून सरकवतात.
सुताची कांडी पाहिली की मला ५५ वर्षांच्या गंगा बेन परमार डोळ्यासमोर येतात. “रेशमाची लड घ्यायची, ती मोठ्या चरख्यावर चढवायची आणि त्यानंतर चाक फिरवत रेशमाच्या धाग्याने कांड्या भरायच्या. चाकाशिवाय तुम्हाला कांडी भरताच येणार नाही,” लिंबडीच्या घांघरेतिया गावातल्या आपल्या घरी हे सगळं त्यांनी मला समजावून सांगितलं होतं.
“लक्ष कुठे आहे?” रेखा बेनच्या
आवाजाने मी परत मोटा टिंबलात परततो. आज दिवसभरात त्यांनी मला किती तरी वेळा पटोला
साडी विणण्यासाठी धागे कसे तयार करतात त्याची प्रक्रिया समजावून सांगितली असेल.
“लिहून घे,” माझ्या वहीवर नजर रोखत त्या मला सांगतात. थोडा काळ त्या माग थांबवतात
आणि मला खरंच सगळं नीट समजलंय याची खात्री करून घेतात.
या सगळ्या
प्रक्रियेत इतक्या सगळ्या पायऱ्या आहेत, किमान डझनभर तर असतील. मी सगळ्या लिहून
घेतो. किती तरी आठवडे हे सगळं काम चालतं आणि यात स्वतः विणकर सोडून इतर किती तरी
जणांचं काम असतं. रेशमाच्या लडीपासून २५२ इंची पटोला साडी विणली जात असताना या
सगळ्यांचे हात लागलेले असतात. सहा महिन्यांच्या कष्टांनंतर साडी तयार होते.
“कुठल्याही कामात एखादी जरी चूक झाली
तर पटोलु बिघडणार म्हणून समजा,” रेखा बेन सांगून टाकतात.