या भागात अगदी नव्वदच्या दशकापर्यंत दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेली माणसंच नव्हती. तिथून पुढे एक पिढी हळूहळू शिकू लागली. म्हणजे समजा पहिल्या इयत्तेत २५ वारली विद्यार्थी शिकत असतील, तर दहावीपर्यंत केवळ आठ (८) विद्यार्थीच पोचतात. एवढं गळतीच प्रमाण आहे. दहावीला समजा आठ विद्यार्थी बसले तर त्यातील पाच किंवा सहाच विद्यार्थी पास होतात. तिथे पण नापास झाल्यामुळे गळती झाली की अकरावी बारावीला जाईपर्यंत तीन किंवा चार विद्यार्थी राहतात. त्यानंतर बारावीत सुद्धा गुणवत्ता नसल्यामुळे काही विद्यार्थी तिथेही गळतात. तर तिथून पुढे डिग्रीपर्यंत जाणारे अगदी तीनच विद्यार्थी उरतात.
डिग्री शिक्षण तालुका पातळीपर्यंत आहे. इथून पुढे दहा किलोमीटर अंतरावर महाविद्यालय आहे. पण डिग्रीनंतर शिकण्यासाठी इथे सोय नाही. त्यामुळे ठाणे, नाशिक किंवा पालघर मध्ये जाऊन पुढील शिक्षण घ्यावं लागतं. आज जर तालुक्याचा विचार केला तर डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण अगदी ३% पर्यंतच आहे.
वारली समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय अल्प आहे. ते वाढण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. आम्ही देखील खूप प्रयत्न करतो आहोत. गावोगावी लोकांच्या भेटी घेतो. भेटी घेत असताना त्यांच्याच भाषेमध्ये बोलतो. त्यांना आमची ओळख पटवून देतो. असे प्रयत्न चालू आहेत.
मुलाखत: मेधा काळे
या वार्तांकनासाठी आरोहन संस्थेच्या हेमंत शिंगाडे यांची मोलाची मदत झाली. त्यांचे मनापासून आभार.
भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत आणि सामान्य माणसांच्या शब्दांत नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे.
वारली इंडो-आर्यन भाषा असून ती गुजरात, दिव-दमण, दादरा नगर हवेली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यामध्ये राहणाऱ्या वारली आदिवासींची भाषा आहे. युनेस्कोच्या ॲटलस ऑफ लँग्वेजेसनुसार (भाषांचा नकाशासंग्रह) भविष्यात धोक्यात येऊ शकणाऱ्या भारतीय भाषांमध्ये वारली भाषेचा समावेश होतो.
महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी वारली भाषा नोंदवण्याचा आमचा प्रयत्न आहे.