“ये बारा लाखवाला ना? इसी की बात कर रहे है ना?” ३० वर्षांचा शाहिद हुसैन त्याच्या फोनवरचा एक व्हॉट्सॲप मेसेज माझ्या डोळ्यासमोर धरत विचारतो. बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याबद्दलसा तो मेसेज होता. बंगळुरूतल्या एका मेट्रोलाइनवर नागार्जुना कन्स्ट्रस्शन कंपनीसाठी शाहिद क्रेनचालक म्हणून काम करतो.
“हे १२ लाखाचं फारच कानावर येतंय सध्या,” तिथेच काम करणारा ब्रजेश यादव म्हणतो. “इथल्या कुणाचीही कमाई वर्षाला साडेतीन लाखांहून जास्त नाहीये.” विशीतला ब्रजेश उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्याच्या डुमरियाहून इथे बिगारीच्या कामावर आला आहे.
“हे काम सुरू आहे तोपर्यंत महिन्याला ३०,००० रुपये मिळतील,” शाहिद सांगतो. तो बिहारच्या कैमूर (भाबुआ) जिल्ह्याच्या बिउरचा रहिवासी आहे. कामाच्या शोधात आजवर तो अनेक राज्यांत जाऊन आला आहे. “हे काम झालं की कंपनी आम्हाला दुसरीकडे कुठे तरी पाठवते किंवा आम्हीच १०-१५ रुपये जास्त मिळतील या आशेने दुसरं काही तरी काम शोधतो.”






