झारखंडच्या बोरोटीकामध्ये एका स्त्रीला गर्भधारणेतील गुंतागुंतीसाठी डॉक्टरला भेटायचं तर सीमा पार करून ओडिशाला जावं लागतं.
आणि ही फक्त तिची एकटीची गोष्ट नाहीये. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर स्त्री रोग तज्ज्ञ किंवा सर्जनकडे जाण्याची शक्यता मुळात खूप कमी असते. सद्य परिस्थितीत, सामुदायिक आरोग्य केंद्रांमधे (सी. एच. सी.), आवश्यक प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची ७४.२ टक्के कमतरता आहे.
एका तरुण आईला आपल्या आजारी बाळासाठी सीएचसीमध्ये बालरोगतज्ज्ञ मिळणं कठीण ठरतं, कारण या पदांपैकी ८०% पदं सध्या रिकामी आहेत.
ही सर्व माहिती ग्रामीण आरोग्य आकडेवारी 2021-22 मध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इतर महत्त्वाचे अहवाल, शोधनिबंध आणि विदा, कायदे आणि नियम हे पारी हेल्थ अर्काइव्हच्या माध्यमातून उपलब्ध आहेत व ते भारतीय महिलांचं स्वास्थ्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरवतात.
पुढील भाग ग्रामीण भारतातील महिलांच्या आरोग्याच्या बिकट स्थितीवर प्रकाश टाकतो. प्रजनन स्वास्थ्यापासून ते लैंगिक हिंसा, मानसिक आरोग्यापासून ते कोविड-19 साथीपर्यंत, पारी हेल्थ अर्काइव्ह महिलांच्या आरोग्याच्या विविध पैलूंचा समावेश करते – आणि साध्यासुध्या लोकांचं रोजचं जगणं कसं आहे ते समजून घेण्याच्या प्रयत्नाला बळ देते.









