कारदगा गावात एखादं मूल जन्माला आलं की पहिली खबर सोमाक्कांना जाते. ९,००० लोकसंख्येच्या या गावात मेंढीच्या लोकरीचे कंडे करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी त्या एक. वाळ्यासारखा असणारा कंडा शुभ मानला जातो आणि नव्या बाळाच्या मनगटात घातला जातो.
“मेंढरं चारा हुडकत रानोमाळ हिंडत्याती. थंडी नको, वारा नको. कितकाली लोकं भेटत्याती त्यांना,” पन्नाशीच्या सोमाक्का पुजारी सांगतात. आणि म्हणूनच मेंढ्या काटक असल्याचं मानलं जातं आणि त्यांच्या लोकरीपासून बनवलेला कंडा बांधला की बाळाला नजर लागत नाही.
धनगर बाया पूर्वापारपासून हे कंडे तयार करत आल्या आहेत. कारदगा गावात आज धनगरांची मोजकी आठ कुटुंबंच ही कला जोपासून आहेत. “निम्म्या गावाला घातलं आहे,” सोमाक्का सांगतात. कारदगा महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या बेळगावी जिल्ह्यात आहे आणि इथले अनेक जण सोमाक्कांसारखंच मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा बोलतात.
“सगळ्या जाती-धर्माची लोकं येतात आमच्यापाशी कंडा घ्यायला,” सोमाक्का सांगतात.
लहानपणी आई कंडे बनवायची ते सोमाक्का मन लावून पहायच्या. किस्नाबाई बनकर म्हणजे त्यांची आई लई भारी कंडे बनवायच्या. “ती लोकरीचा केस न् केस निवडून घ्यायची आने मंगच कंडा बनवाया सुरुवात करायची,” त्या सांगतात. अगदी पातळ लोकर निवडून घेतल्याने ती वळायला सोपी जाते. मेंढी पहिल्यांदा भादरली की तीच लोकर वापरायची कारण ती जरा भरड असते. “शंभर मेंढरात एकाचीच लोकर कामी येते बगा,” सोमाक्का सांगतात.
सोमाक्का आपले वडील अप्पाजी बनकर यांच्याकडून कंडा कसा करायचा ते शिकल्या. १० वर्षांच्या सोमाक्कांनी ही कला शिकायला दोन महिने लागले. तेव्हापासून गेली चाळीस वर्षं त्या हे काम करतायत, ही कला जोपासतायत. पण आजकाल ती अस्ताला जात असल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवते. “आजकालची तरणी पोरं मेंढरं चारायला बी नेईनात. त्यांच्या लोकरीपासून काही करतात हे त्यांना समजावं तर कसं?”














