“या ओटीपीची लई भीती वाटते बघा! सहा आकडे आणि पैसा गायब,” एसटी स्टँडच्या गोंगाटात अनिल ठोंबरे मला सांगतात. येणाऱ्या जाणाऱ्या बसचे आवाज, पाणी आणि खायचे पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांचे आवाज, कंट्रोल रुमचे पुकारे अशा सगळ्या आवाजात ठोंबरे काकांच्या फोनवर ओटीपी आला आणि त्यासाठी त्यांनी माझी मदत मागितली.
त्यांनी बजेटबद्दल थोडं काही तरी ऐकलंय. अर्थसंकल्प हा शब्द त्यांच्या परिचयाचा आहे. “३१ जानेवारीला रेडिओवर काही तरी बातमी होती. कसंय, सरकार प्रत्येक विभागासाठी काही तरी तरतूद करतं. मला माहीत आहे. सगळं नाही तरी रुपयात दहा पैसे तर नक्कीच!” अडकित्त्याने सुपारी कातरत ठोंबरे काका मला सांगतात.
या गोंगाटापासून दूर शांत ठिकाण म्हणजे एसटी कँटीन. तिथे जाण्यासाठी ते, खरं तर त्यांच्या हातातली लाल पांढरी काठी वाट काढत पुढे जाते. ठोंबरे काका दृष्टीहीन आहेत. पण या एसटीस्टँडवरचे सगळे फलाट, इथली गर्दी, कँटीनचा काउंटर आणि आतल्या पायऱ्या असं सगळं काही त्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. “मी एक महिन्याचा असताना गोवर फुटला आणि त्यात माझे डोळे गेले असं सांगतात,” काका सांगतात.



