“मला नाही वाटत मी एक चित्रकार आहे. एखाद्या चित्रकारात असणारे गुण माझ्यात नाहीत. पण माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. माझ्या कुंचल्याच्या मदतीने याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्या कुंचल्याच्या रेषा किंवा फटकारे अगदी अचूक आहेत असं काही माझं म्हणणं नाहीये. खरं सांगायचं तर मी फक्त गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या चित्रकारांचं काम समजून घेण्याचा आणि अभ्यासण्याचा प्रयत्न करतीये. नाही तर मला यातलं काहीही माहीत नव्हतं. मी फक्त गोष्ट सांगण्यासाठी चित्र काढत होते. आणि ती गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगता आली की मलाच छान वाटतं. एखादं कथानक पुढे सरकत जातं तसं मी चित्रात रंग भरत जाते.”
ही आहे लाबोनी. पश्चिम बंगालच्या नाडिया या अगदी ग्रामीण जिल्ह्यातल्या धुबुलिया गावातली एक कलाकार, चित्रकार. दुसऱ्या महायुद्धादरम्यान या भागात सैन्याचा आणि हवाईदलाचा एक तळ होता. इंग्रजांनी जेव्हा हे तळ बांधले तेव्हा या मुस्लिमबहुल गावाची बरीचशी जमीन त्यामध्ये गेली. त्यानंतर फाळणी झाली आणि या गावातले बरेचसे लोक सीमापार गेले. “पण आम्ही नाही गेलो,” लाबोनी सांगते. “आमच्या आज्या-पणज्यांना जायचं नव्हतं. आमचे पूर्वज याच मातीत दफन झाले आहेत. आम्हालाही इथेच रहायचंय आणि इथेच मरायचंय.” या भूमीशी असलेलं नातं, आणि त्याच मायभूमीच्या नावावर जे काही आजूबाजूला घडत असतं त्या सगळ्यातून लाबोनी लहानाची मोठी होत गेली, तिचं भावविश्व घडत गेली.
चित्रं काढण्याची प्रेरणा लाबोनीला आपल्या वडलांकडून मिळाली. लहान असताना सुरुवातीची काही वर्षं ते तिला एका शिक्षकाकडे घेऊन जायचे. दहा भावंडांमध्ये शिक्षण घेणारे ते एकटेच आणि त्यांच्या घराण्यातली शिकणारी त्यांची पहिलीच पिढी. त्यांनी गावपातळीवर वकिली करत करत शेतकरी आणि श्रमिकांसाठी सहकारी संस्था स्थापन केल्या. पण त्यातून फारसे पैसे कमावले नाहीत. “त्यांना जे काही थोडेफार पैसे मिळायचे, त्यातून ते माझ्यासाठी पुस्तक विकत आणायचे,” लाबोनी सांगते. “मॉस्को प्रेस, रादुगा पब्लिशर्सची लहान मुलांसाठीची भरपूर पुस्तकं असायची. ही पुस्तकं बंगालीतून आमच्यापर्यंत पोचायची. त्या पुस्तकांमधली चित्रं मला फार आवडायची. चित्रं काढावीत हे सगळ्यात आधी वाटलं असेल ते याच पुस्तकांमुळे.”
अगदी लहान वयात गिरवलेले चित्रकलेचे धडे दीर्घकाळ टिकले नाहीत. पण चित्रांसाठी असलेलं प्रेम २०१६ साली पुन्हा चेतवलं गेलं. पण कारण फार वेगळं होतं. हा असा काळ होता जेव्हा शब्दांनी साथ सोडली होती. याच काळात झुंडीने बळी घेण्याच्या घटना वाढत चालल्या होत्या. शासनसंस्थेची अनास्था आणि अल्पसंख्याकांचं हेतुपुरस्सर शिरकाण केलं जात होतं. पण तरीही बहुसंख्याकांनी मात्र सोयीस्कररित्या या सर्व गुन्ह्यांकडे काणाडोळा केला होता. कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठात एमफिल करत असलेल्या लाबोनीला देशातल्या या परिस्थितीने फार अस्वस्थ केलं होतं. तरीही आपल्या मनातली तगमग शब्दांत मांडता येत नव्हती.
“अस्वस्थता होती खूप,” ती सांगते. “त्या काळापर्यंत मला लिहायला खूप आवडायचं. मी बांग्लामध्ये काही लेख लिहिले होते, ते छापूनही आले होते. पण अचानक असं वाटायला लागलं की शब्द तोकडे पडतायत. सगळ्या सगळ्या गोष्टींपासून पळून जावंसं वाटत होतं. तेव्हाच मी चित्रं काढायला, रंग भरायला सुरुवात केली. मिळेल त्या चिटोऱ्यावर मी समुद्र आणि समुद्राच्या विविध भावभावना रंगवायचे. जलरंगांमध्ये. एकानंतर एक असं करत मी त्या काळात [२०१६-१७] समुद्राची इतकी सारी चित्रं काढली होती. या सगळ्या अनिश्चित दुनियेमध्ये शांतता शोधण्याचा तेवढा एकच मार्ग होता माझ्यापाशी. चित्रं.”
आणि अगदी आजही लाबोनी एक स्वयंभू कलाकार आहे.




























