“मी सोनेरी बॉर्डर लावेन आणि त्याला काही चुण्या घालेन. आपण बाहीवर काही कटआऊट पण लावू शकतो, पण त्याचे आणखी ३० रुपये लागतील.”
शारदा मकवाना हिचं तिच्या ग्राहकांशी नेहमीचं हे संभाषण आहे, काहींना बाहीची लांबी, लेसचा प्रकार आणि पूर्ण पाठ उघडी असली तरी ब्लाउज नीट बांधून ठेवणाऱ्या नाड्यांना जोडलेल्या गोंड्यांविषयी त्या माहिती देत असतात. “मी कापडापासून फुलंही बनवू शकते आणि तीही शोभेसाठी जोडू शकते,” तिने तिच्या कौशल्याविषयी कौतुकाने सांगितलं आणि ती हे काम कसं करते तेही दाखवलं.
शारदा आणि तिच्यासारख्या ब्लाउज शिवणाऱ्या स्थानिक स्त्रिया कुशलगढच्या स्त्रियांच्या फॅशन सल्लागार आहेत. जवळपास सर्वच तरुण मुली आणि इतर वयोगटातील स्त्रिया ज्या साड्या नेसतात, त्यांच्यासाठी ८० सेंटीमीटर कापडाचा ब्लाउजपीस लागतोच.
पुरुषप्रधान समाजात जिथे स्त्रियांना सार्वजनिक सभांमध्ये बोलता येत नाही आणि जिथे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ८७९ स्त्रिया (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, NFHS-5) अशी चिंताजनक परिस्थिती असलेल्या भागात, महिला त्यांच्या कपड्यांची आवडनिवड जपतायत ही एक आनंदाची बाब आहे.
राजस्थानच्या बंसवाडा जिल्ह्यातलं हे छोटंसं शहर शिवणकामाच्या दुकानांनी भरलेलं आहे. पुरुषांचे कपडे शिवणारे शिंपी कपडे आणि पँट शिवतात आणि कुर्त्यासारखे लग्नाचे पोषाख बनवतात, तसेच हिवाळ्यातील लग्नांसाठी वरांसाठी कोटदेखील शिवतात. दोन्हीही बाजूचे लोक हलके रंग वापरतात, अधूनमधून हलका गुलाबी किंवा लाल रंग वापरतात त्यापेक्षा वेगळे रंग वापरण्याचे धाडस ते करत नाहीत.










