दररोज सकाळी आकिफ एस के हॅस्टिंग्जमधल्या पुलाखालच्या आपल्या तात्पुरत्या झोपडीवजा घरातून निघतो आणि कोलकात्यातल्या पर्यटकांची वर्दळ असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियलला जातो.
वाटेत तो राणी आणि बिजलीला सोबत घेतो. या दोन पांढऱ्या शुभ्र घोड्या म्हणजे त्याच्या पोटापाण्याचा आधार. “आमि गाड़ी चालाई [मी टांगा चालवतो],” आकिफ म्हणतो. हॅस्टिंग्जमध्ये या दोघींना एका तबेल्यात ठेवतो आणि सकाळी १० च्या सुमारास त्यांना व्हिक्टोरियाला घेऊन येतो. कोलकात्याच्या मध्यवर्ती भागातली ही संगमरवरी इमारत आणि खुल्या मैदानांचा भाग याच नावाने ओळखला जातो. इंग्रज सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ उभारलेली ही इमारत १९२१ साली सामान्यांसाठी खुली करण्यात आली.
आकिफ हा टांगा भाड्याने चालवतो. व्हिक्टोरिया मेमोरियलजवळच्या क्वीन्स वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर तो टांगा उभा करतो. दहा टांग्यांमधल्या आपल्या टांग्याकडे बोट दाखवत तो म्हणतो, “तो सोनेरीवाला माझा.” खरं तर इथल्या जवळपास सगळ्याच टांग्यांचा रंग एकसारखा आहे. त्यावरची फुला-फुलांची नक्षी आणि पक्षी देखील सारखेच. सगळे टांगे राजेरजवाड्यांच्या मेण्यांसारखे दिसतात. पण आकिफचा टांगा त्यातही उठून दिसतो. रोज सकाळी दोन तास तो टांगा साफ करतो, त्याला चकाचक पॉलिश करतो. लोकांना इंग्रज राजवटीतल्या राजेशाही आयुष्याची झलक मिळायला पाहिजे ना.
तिथे रस्त्याच्या पलिकडे व्हिक्टोरिया मेमोरियलच्या प्रवेशद्वारापाशी लोकांची गर्दी गोळा व्हायला लागलीये. “पूर्वीच्या काळी इथे राजेरजवाडे रहायचे आणि ते आपापल्या टांग्यांमधून, बग्ग्यांमधून फिरायचे. आता इथे व्हिक्टोरिया पहायला पर्यटक येतात आणि त्या काळाचा अनुभव घेऊ पाहतात,” आकिफ सांगतो. २०१७ सालापासून तो टांगा चालवतोय. तो पुढे म्हणतो, “जोपर्यंत व्हिक्टोरिया [स्मारक] आहे तोपर्यंत इथले घोड्याचे टांगे कुठे जात नाहीत.” आणि त्याच्यासारख्या टांगाचालकांचं कामही. या भागात सध्या किमान ५० टांगे फिरत असतात.











