दिल्ली
हमारी
हैं!
देश
पर
वही
राज
करेगा,
जो
किसान
मजदूर
की
बात
करेगा!
देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर गुरुवार १४ मार्च २०२४ रोजी आयोजित किसान मजदूर महापंचायतीसाठी जमलेल्या हजारो शेतकऱ्यांचं हे घोषवाक्य होतं.
"आम्ही तीन वर्षांपूर्वी [२०२०-२१] वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान टिकरी सीमेवर आलो होतो," रामलीला मैदानावर जमलेल्या पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी पारीला सांगितलं. "गरज पडली तर आम्ही पुन्हा येऊ.”
मैदानाजवळील रस्यांवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथून शेतकऱ्यांना घेऊन येणाऱ्या बसच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ९ वाजता या ऐतिहासिक मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या बसेसच्या मागे फूटपाथवर स्त्री-पुरुषांचे छोटे गट लाकूड-विटा रचून भाजलेल्या रोट्यांचा नाश्ता उरकून घेत होते.
या रोमांचक सकाळी पुरुष आणि महिला शेतकरी झेंडे घेऊन रामलीला मैदानावर कूच करत होते. ‘किसान मजदूर एकता जिंदाबाद’च्या आरोळ्या वातावरणात घुमत होत्या. सकाळी १०:३० वाजेपर्यंत जमिनीवर पसरलेल्या हिरव्या पॉलिथिनच्या जाळ्या पद्धतशीर भरल्या गेल्या; शेकडो शेतकरी आणि शेतमजूर किसान मजदूर महापंचायत सुरू होण्याच्या तयारीत बसले होते.
मैदानावर पाणी साचल्याचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी रामलीला मैदानाचे दरवाजे सकाळीच उघडले. सभेत अडथळे आणण्यासाठी जाणीवपूर्वक जमिनीत पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशात काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी हा मेळावा ५,००० लोकांपुरताच मर्यादित ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, त्यापेक्षा जवळपास दहापट शेतकरी मैदानावर जमले होते. प्रसारमाध्यमांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
भटिंडा जिल्ह्यातील बल्लोह गावातील शेतकरी शुभकरण सिंह याला श्रद्धांजली देऊन अधिवेशनाची सुरुवात. २१ फेब्रुवारी रोजी पतियाळा येथील धाबी गुजरन येथे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रूधूर आणि रबर बुलेटचा मारा केला त्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
महापंचायतीचे पहिले वक्ते डॉ. सुनीलम यांनी शेतकरी संघटना, संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) संकल्प पत्राचं वाचन केलं. मंचावर एसकेएम आणि सहयोगी संघटनांचे २५ हून अधिक नेते होते; मेधा पाटकर यांच्यासह तीन महिला नेत्या हजर होत्या. एमएसपीसाठी कायदेशीर हमी आणि इतर मागण्यांवर प्रत्येकजण ५ ते १० मिनिटे बोललं.
पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर फेब्रुवारी २०२४ मध्ये सरकारच्या दडपशाही तसेच निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. वाचा: ‘ शंभू सीमेवर मला कैदेत टाकल्यासारखं वाटतंय ’
सरकारने शेतकऱ्यांच्या राजधानीत प्रवेश करण्यावर घातलेल्या भौतिक अडथळ्यांना आणि निर्बंधांना उत्तर म्हणून एका वक्त्याने ज्वलंत आव्हान केलं: “दिल्ली हमारी है, देश पर वही राज करेगा, जो किसान मजदूर की बात करेगा!” [दिल्ली आमची आहे, जो शेतकरी आणि कामगारांच्या हिताची काळजी करील, तोच देशावर राज्य करील].
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी ‘कॉर्पोरेट, सांप्रदायिक, हुकूमशाही राजवटीच्या’ विरोधात सध्याच्या शासनाला धडा शिकवण्याची मागणी केली.
“२२ जानेवारी २०२१ नंतर सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा केलेली नाही. जेव्हा कोणतीही चर्चा झाली नाही, तेव्हा प्रश्न कसे सुटतील?" राकेश टिकैत यांनी आपल्या भाषणात सांगितलं. टिकैत हे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते आणि एसकेएमचे नेते आहेत.
“२०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी सरकारने सी टू + ५० टक्के वर एमएसपीची [किमान आधारभूत किंमत] कायदेशीर हमी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यांनी कर्जमाफी दिली जाईल, अशी हमी दिली होती, जी आजपर्यंत अंमलात आणली नाही,” डॉ. विजू कृष्णन, अखिल भारतीय किसान सभेचे (एआयकेएस) सरचिटणीस म्हणाले. पारीचं शेतकरी आंदोलनाचं
संपूर्ण वार्तांकन
वाचा.
कृष्णन यांनी व्यासपीठावरून बोलताना वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनांमध्ये मरण पावलेल्या
७३६ हून अधिक
शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचं आणि त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्याचं आश्वासन सरकारने अजूनही पूर्ण केलं नाही, याचा उल्लेख केला. "विद्युत कायद्यातील दुरुस्ती मागे घ्यायची होती, तीही अजून झाली नाही," त्यांनी महापंचायतीमध्ये पारीशी बोलताना अशी पुस्ती जोडली.
नंतर, कृष्णन यांनी अजय मिश्र तेनी यांनी अजूनही केंद्रात मंत्रीपदावर कायम राहण्यास एसकेएमचा विरोध दर्शवला. त्यांचा मुलगा, आशिष मिश्र हा उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे पाच शेतकरी आणि एका पत्रकाराला चिरडल्याच्या घटनेत आरोपी आहे.
टिकैत म्हणाले की, देशभरात अनेक ठिकाणी सुरू असलेली आंदोलनं "आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही पक्ष निवडून आला तरी शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत सुरूच राहतील.”
राकेश टिकैत यांनी आपल्या छोटेखानी भाषणाच्या शेवटी महापंचायतीचे ठराव मंजूर करण्यासाठी सर्वांनी हात वर करण्याचं आवाहन केलं. दुपारी १:३० वाजता तिथे जमलेल्या हजारो शेतकरी आणि कामगारांनी झेंडे घेऊन हात वर केले. ऐतिहासिक रामलीला मैदानावर तळपत्या सूर्याखाली नजर जाईल तिथपर्यंत लाल, पिवळ्या, हिरव्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या पगड्या, पंचे, टोप्या दिसून येत होत्या.
राकेश टिकैत यांनी आपल्या छोटेखानी भाषणाच्या शेवटी महापंचायतीचे ठराव मंजूर करण्यासाठी सर्वांनी हात वर करण्याचं आवाहन केलं. दुपारी १:३० वाजता तिथे जमलेल्या हजारो शेतकरी आणि कामगारांनी झेंडे घेऊन हात वर केले. ऐतिहासिक रामलीला मैदानावर तळपत्या सूर्याखाली नजर जाईल तिथपर्यंत लाल, पिवळ्या, हिरव्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या पगड्या, पंचे, टोप्या दिसून येत होत्या.